महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,630

बाजींद भाग २४ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 5938 8 Min Read

बाजींद भाग २४ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग २४ – सखाराम व त्याचे सवंगडी सर्वांगाचे कान करुन सावित्रीच्या तोंडून तीचा भूतकाळ ऐकत होते.
सावीत्री भरल्या नेत्रांनी तिच्या भूतकाळात रममाण झाली होती..!

“बाईसाहेब….पुढे काय झाले ?”

धाडस करुन मल्हारीने सावित्रीला प्रश्न केला.

पुढे..?
डोळ्यात आलेले अश्रू पुसत सावीत्री बोलली..!

“दैव अशी विचित्र परीक्षा का घेतो देव जाणे… जेव्हा असे वाटते की आयुष्यात सर्व संपले तेव्हा नवीन अध्याय समोर मांडते,तर जेव्हा वाटते की आता काही नको…अगदी त्याचवेळी नियतीची वाईट चपराक बसते..”

खंडोजी च्या मिठीत मी जग विसरले होते , सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी पहाटेचे शीतल चांदणे विरुन गेले, रायगड च्या बाजूने आलेल्या गार वाऱ्याने आम्हीं दोघेही भानावर आलो…

खंडोजी म्हणाला….साऊ..आता तुझा विरह सहन करणे मला अशक्य आहे…!
मी आजच बहिर्जी नाईकांच्या खासगीत वर्दी धाडून त्यांची भेट घ्यायला निघतो…बाजींद ची बहुमूल्य जबाबदारी त्यांच्या हाती सुपूर्द करुन मला तुला कायमचे घेऊन जायचे आहे…

खंडोजीची मिठी सैल करत साऊ बोलली….ठीक आहे…मलाही तुमच्याशिवाय जगणे आता मुश्किल आहे..मी पण आजच आबासाहेबांची समजूत काढते..घडलेले सर्व कथन करते..शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या पवित्र कामात आता शिरक्याची तलवार चालावी…मी नक्कीच आबांना समजून सांगेन…”

सावित्रीचे दोन्ही खांदे घट्ट पकडून खंडोजी बोलला…

साऊ.. असे जर घडले तर माझ्यावर नाईकांनी सोपवलेली कामगिरी फत्ते होईल…रक्ताचा थेंब न सांडता यशवंतमाची स्वराज्यात आली,तर तू आणि मी जन्मोजन्मी एकत्र राहू ही शपथ मी तुला देतो…मी त्वरित खेडेबाऱ्याकडे रवाना होतो…”

सवित्रीचा निरोप घेऊन घाईने खंडोजी तालमीकडे जाऊ लागला..”

दरम्यान, हत्यारबंद शिबंदी जंगलमार्गत पेरुन खंडोजी सोबत शेवटची वाटाघाटी करायच्या उद्देशाने वस्ताद काका रात्रीच यशवंतमाची च्या हद्दीत आले होते.

खंडोजी तालमीत आला व लपवून ठेवलेली ती गुढ वही घेतली, कमरेला तलवार, पाठीला ढाल अडकवली..ढालीच्या आत ती वही लपवली आणि क्षणभर जगदंबेचे समरण केले…आता पुढचे काही तास त्याच्यासाठी खूप महत्वाचे होते..!

तिकडे सूर्यराव बेरडाने यशवंतमाची वर निकराचा हल्ला चढवायचे नियोजन केले, आजवर च्या अपमानाचा बदला राजे येसजीरावांच्या रक्ताने धुतला जाईल असे त्याने मनोमन योजले.
यशवंतमाची व बाजींद ची ती गूढ ठेव दोघांचीही तहान त्याला लागली होती..ही तहान आता केवळ शिरक्यांच्या रक्ताने शमणार होती..!

पण, सूर्यराव चे मनसुबे धुळीस मिळवण्यास बाजींद ची चिवट फौज वाऱ्याच्या वेगाने जंगलात घुसली होती…घुसली नव्हे आलीच….!

हर हर महादेव च्या गर्जनेने जंगल दुमदुमून गेले..यशवंतमाचीकडे रोखलेले सूर्यराव चे भाले मागे वळाले….तुफानी युद्धास प्रारंभ झाला…!

हल्ला कोणी केला, का केला विचार करायला सूर्यराव ला सवडच मिळाली नाही…त्याने बाजींद च्या फौजीशी निकराची लढत द्यायला सुरवात केलली.
बाजींद च्या येण्याने जंगलातील सर्व प्राणी कमालीचे बिथरले होते..त्यांच्या गोंगाटाने आसमंत दुमदुमून गेला होता…समोरुन अनोळख्या शत्रूचा हल्ला व जंगलातील प्राण्यांनी, पक्ष्यांची, कीटकानी चालवलेला गोंगाट याने सूर्यराव ची फौज भेदरून गेली व वाट दिसेल तिकडे धावू लागले…सूर्यराव सर्वाना ओरडून थांबायचे आदेश देत होता, पण भीतीने गंगारलेली त्याची सेना काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती..!

इकडे खंडोजी तालमीतून बाहेर पडणार इतक्यात वस्ताद काकानी तालमीचे दार उघडले…!

काकांना पाहताच खंडोजी आनंदाने बेभान झाला..त्याने वेगाने जाऊन काकांच्या चरणांना स्पर्श केला ..काकांनी त्याला उठवत मिठी मारली..!

खंडू….कसा आहेस तू ?
आणि काय करुन बसला आहेस तू ?
आपण यशवंतमाची ची रसद पांगवून यशवंतमाची स्वराज्यात आणण्यासाठी येथे आलो होतो…पण तू, शिरक्यांच्या मुलीसाठी खुद्द बहिर्जी नाईकांचा आदेश डावललास ?
मी ज्या खंडू ला ओळखतो, तो नक्कीच तू नव्हेस…”

शांतपणे ऐकून घेत खंडोजी बोलला…वस्ताद काका मला माफ करा…मला माझे कर्तव्य पूर्ण माहिती आहे..पण..पण सावित्रीच्या प्रेमात मी आकंठ बुडालो आहे…मला कर्तव्य बजावू दे…मी सवित्रीशी लग्न करणार आहे..!

घडलेला सर्व वृत्तांत खंडेराय ने वस्ताद काकांना सांगितला…बाजींद ची गूढ वही ..सर्व काही त्याने वस्ताद काकांना कथन केले…खंडेराय चा वस्ताद काकांच्यावर खूप विश्वास होता…तो बोलला
मला त्वरित खेडेबऱ्याला पोहोच करा काका..माझी आणि नाईकांची भेट झाली पाहिजे लौकर…साऊ पण त्यांच्या वडिलांना सर्व समजून सांगून यशवंतमाची स्वराज्यात सामील करण्यास भाग पाडणार आहे…चला काका..सूर्यराव बेरडाचा निकराचा छापा कधीही यशवंतमाची वर पडणार आहे अशी खबर आहे..!

दीर्घ श्वास सोडत काका बोलले….खंडू…अरे केवळ मनपरिवर्तन करुन जर यशवंतमाची स्वराज्यात येणार असती, तर नाईकांना ही जीवघेणी कामगिरी तुझ्यावर का सोपवलिह असती…?
काही गोष्टी शब्दांनी नव्हे तर तलवारीने सुटत असतात…!
बाजींद च्या गूढ कथा आजवर मी ऐकून होतो, पण तू केलेल्या उलघड्यावरून मला तुझ्यावर कसा विश्वास ठेवावा हा प्रश्न पडला आहे..!

हे ऐकताच खंडोजीने कशाचाही विलंब न करता पाठीवर अडकवलेल्या ढालीतून ती गूढ वही काढून वस्ताद काकांच्या हाती ठेवली…काका..मी आजवर तुमच्याशी कधीही खोटे बोललो नाही..हे बघा हा पुरावा..!

त्या वहीचे अवलोकन करत वस्ताद काका कमालीचे गंभीर झाले..त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले…त्यांनी त्वरित खंडोजीला ती वही परत केली आणि बोलु लागले…

खंडोजी…खूप वेळ झाला तुझ्या येण्याला…काही क्षणात मराठ्यांची फौज यशवंतमाचीवर तुटून पडेल…तू इथे थांबू नकोस..तुला गिरफ्तार करायचे आदेश आहेत नाईकांचे….तू थांबू नकोस इथे….!

असे ऐकताच ज्वालामुखी भडकावा तसा खंडोजी भडकला…यशवंतमाचीची रसद न पांगवता जर हल्ला चढवायचा होता तर मला या कामगिरी वर का नियुक्त केले काका..?

मी सावित्रीला सांगून रक्ताचा थेंब न पडता माची स्वराज्यात आणणार होतो आणि नाईकांनी अशी आज्ञा दिलीच कशी…?

कशी दिली हे विचारायची पात्रता कोणाचीच नाही खंडोजी ..!

काका गर्जले….रक्त शिंपून उभे केलेले हे स्वराज्य असेतु हिमाचल असेच वाढावे यासाठी नाईकांनी सर्वस्वाची होळी केली आहे हे तू जाणतोस…आजवरच्या तुझ्या कामगिरीवरून तुला यशवंतमाचीची कामगिरी दिली…पण, मराठेशाहीचा शिरस्ता माहिती असूनदेखील तू स्त्री मोहात पडून कायदे मोडलेस ते कोणाला विचारून..?

ठीक आहे, तुझ्यासोबत जे घडले ते गूढ व विलक्षण आहे खंडेराय..पण..पण आता तू जर इथे मराठ्यांच्या हाती लागलास तर तुला गिरफ्तार केले जाईल…माझे एक…नाईकांचा निर्णय देव सुद्धा बदलत नाही..तिथे मी कोण आहे…वातावरण शांत होईपर्यंत तू बाहेर रहा..योग्य वेळ आल्यावर मी मध्यस्ती करीन…मग हा अनमोल ठेवा स्वराज्याच्या कामी येईल यासाठी प्रयत्न करु…!

मी निघतो आता….मला इशारत करुन फौजेला सांगावा धाडला पाहिजे….तू निघ इथून…उतरतीच्या डोंगरावर गुहेत रहा…तिथे मी येऊन भेटेन….!

असे बोलून वस्ताद काका निघून गेले होते..!

खंडोजी च्या मनात विचारांचे महावादळ सुरु झाले होते…!

इकडे सावित्रीने घडलेला सर्व वृत्तांत येसजीरावांच्या कानी घातला..व शिवाजी महाराजांना सामील होण्यासाठी कळकळून सांगितले…!

येसजीरावांच्या मनात बाजींद ची कथा ऐकून मोठी खळबळ सुरु झाली होती…!
त्याचे मन म्हणू लागले की किती वेळ महाराजांशी वैर धरायचे…सारा मुलुख शिवाजीराजांचा पोवाडा गातोय..आपणही सामील व्हावे….त्यांचे मन पालटू लागले…..पण, इतक्यात…

एक निशाणबारदार धावत आला….बोलू लागला…

राजे घात झाला…भगव्या झेंड्याच्या निशानाचची फौज यशवंतमाची वर तुटून पडली आहे…वेशीच्या रक्षकांची कत्तल उडवत ते आत घुसत आहेत…मराठ्यांचा छापा पडला आहे….

काही वेळापूर्वीच मराठ्यांना सामील होण्याचे स्वप्ने पाहणारे राजे सवित्रीवर ओरडले…पाहिलेंस…आणि तू त्यांना जाऊन मिळायला सांगत होतीस मला ?….आता मारु किंवा मरु… तू वाड्या बाहेर पडू नकोस….

असे बोलून राजे बाहेर पडले…युद्ध डँका वाजू लागला…शिरक्यांचा सेना सागर जमा झाला….

आता युद्ध….आता मोठमोठे अलंकारिक शब्द मौन राहतील…आता तलवारी बोलतील…तलवारीच चालतील…राजे येसजीरावांच्नी युद्धाचा पोषाख चढवून घोड्यावर स्वार झाले..पाठोपाठ शिरक्याची चिवट फौज….

क्रमशः – बाजींद भाग २४ | बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग २४

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a Comment