बाजींद भाग २७ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…
बाजींद भाग २७ – वाऱ्याच्या वेगाने जंगलातील हिंस्त्र प्राणी व किडा कीटक मुंग्यापासून ते बलाढ्य हत्ती पर्यंत सर्वच्या सर्व प्राणी बाजींद च्या हुकमाचे “बाजींद” होते..!
ज्यावर बाजींद ची तलवार रोखली जाईल त्याचा प्राण त्याच्या शरीरातून बाहेर काढणे हेच एकमेव काम त्यांचे होते.
वस्ताद काका व सूर्यराव बेरड यशवंतमाची वर हल्ल्याच्या वाटाघाटीत मश्गुल असताना दूरवर जंगली श्वापदांचा आवाज कानावर येऊ लागला, प्रत्येक क्षणी तो आवाज वाढतच होता.
त्या आवाजाने बेरड व काकांची तुकडी भयकंपित होऊन वर खाली आजू बाजू पाहू लागली.!
काही वीरांनी जुमानून उसण्या अवसानाने तलवारी उपसल्या… क्षण..दुसरा क्षण…मोठमोठी झाडे उपटून समोर दिसेल त्याच्यावर आदळत हत्तीचे कळप ,या झाडावरुन त्या झाडावर मुक्त झेपा घेत व त्याबरोबर आकाशपातळ दनानून सोडणाऱ्या डरकाळ्या फोडत वाघ सिंह दिसू लागले..सर्वच्या सर्व प्राणी बेफाम दौडत होते आणि मागोमाग बाजींद चे अश्वदल चौखूर दौडत येत होते..!
ते चित्र पाहताच भल्याभल्या सुरमा वीरांची छाती कचदिल होत होती..!
त्या वाघ सिंहाचा एका झेपत शेकडो वीर मरु लागले होते…हत्ती सोंडेत धरुन एका एका वीराला नारळ आपटून फोडतो तसे आपटत होते….!
केवळ मरणासन्न आर्त किंकाळ्या..आणि यातून जे वाचत होते ते बाजींद च्या तीरकमठयाचे शिकार बनत होते….!
अशा वेळी जो तो एकच शब्द बोलत होता…पळा..!
सारेच पळत सुटले होते…पण वेळ आणि काळ याचे गुणोत्तर इतके अचूक होते की पळणारा काही क्षणात भक्ष बनत होता.!
साराच गोंधळ..!
वस्ताद काका व सूर्यराव ला समजेना की काय प्रकार होत आहे…ते सुद्धा समजून घेण्याच्या अवस्थेत नव्हते…कुठेतरी गुप्त जागा शोधत ते सुद्धा धाऊ लागले….!
एक प्रचंड हत्ती सूर्यराव च्या मागे लागला.
त्याने त्याच्या घोड्याचा मागचा पाय उचलून घोड्याला हवेत भिरकावले.
सूर्यराव घोड्यावरून बाहेर फेकला गेला…!
सूर्यराव ने तलवार उपसली आणि त्या चवताळलेल्या हत्तीच्या सोंडेवर जोरदार हल्ला केला…!
सपदिशी झालेल्या वाराने हत्तीची सोंड तुटून पडली…!
शांतपणे वाहणारे नदीचे पाणी वादळी पावसाच्या पाण्याने लालभडक होऊन वहावे अगदी तसेच हत्तीच्या सोंडेतून रक्त पडू लागले…!
हत्ती ची ची ची ची करत मागे फिरला व गिरकी घेऊन खाली कोसळला… जागीच गतप्राण झाला होता..!
हत्ती मारला याचा उरात अभिमान घेऊन सूर्यराव ती रक्ताळ लेली समशेर घेऊन छाती फुगवून हसू लागला….
इतक्यात
बाजींद च्या तिर कमठयातुन सूर्यराव च्या मस्तकाचा वेध घेतलेला बाण सु सु सु करत आला व क्षणात सूर्यराव चे मुंडके धडावेगळे करत खाली कोसळला…!
इतक्या वेगाने आलेल्या बाणामुळे सूर्यरावला त्याचे शिर कधी तुटले हेच समजले नाही..!
शरीराशिवाय ते तलवार घेतलेले शरीर तसेच उभे होते.
ते दृश्य पाहून भल्याभल्यांची बोबडी वळाली.
आता सर्व संपल्यात जमा होते.
बाजींद ने सूर्यराव चा खात्मा करायची केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाली होती.
त्याच्या मुखावर समाधान होते की बाजींद च्या गूढ ज्ञानाचा साक्षीदार आता संपला आहे…!
वस्ताद काकांनी सूर्यराव चे शिरावेगळे धड पहिले आणि त्यांचे क्षत्रिय रक्त उचंबळून आले..!
त्यांनी दोन्ही हातात पट्टे चढवले आणि आता मारु मरु युद्धाची आरोळी ठोकली….!
सुदर्शन फिरावे तसा पट्टा फिरत होता..!
जो आडवा येत होता त्याची खांडोळी उडत होती.
आसपास बिथरलेली जन्गली जनावरे सुद्धा त्या पट्ट्याच्या वर्तुळात जाऊ शकत नव्हती…!
वस्ताद काकांच्या आक्रमणामुळे बाजींद व काकांच्यातील अंतर कमी होऊ लागले..!
आता, बाजींद ला युद्धासाठी सज्ज व्हावे लागणार होते….त्यांनीही हातात पट्टे चढवले व काकांशी सामोरा गेला…!
पट्ट्या वर पट्टे आपटून ठिणग्या पडू लागल्या…कोण कोणाला कमी नव्हते…पण बाजींद ची निष्पाप श्रद्धा व तपश्चर्या नक्कीच काकांपेक्षा मोठी ठरली आणि एका वर्मी घावाने काकांचा पट्टा खोबणीतुन तुटला….!
संधी मिळताच काकांच्या छातीवर जोरदार लाथ घालून बाजींद उभा राहिला…!
त्या लाथेने तोल जाऊन काका खाली पडले….!
काका खाली पडते न पडते इतक्यात आसपास उभे असणाऱ्या वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे एकाच वेळी त्यांच्यावर तुटून पडले…काकांनी आता आपले जीवन संपले आशा आवेशात डोळे घट्ट मिटले आणि मृत्यूस तयार झाले…!
ति जनावरे आता काकांच्यावर हल्ला चढवणार…
इतक्यात
जंगलाच्या पूर्व दिशेला तोंडाला काळे अवलान बांधून पांढऱ्याशुभ्र घोड्यावर उभा असणाऱ्या एका धीरगंभीर योध्याने चित्रविचित्र आवाज काढून जन्गलातील त्या बिथरलेल्या प्राण्यांना जागीच स्तब्ध केले….अजून अधिक तीव्र व गूढ आवाज ऐकून ते सारे हिंस्त्र प्राणी गुमान मागे सरकू लागले….!
अजून काही वेळ गेला आणि ते सारे प्राणी दाट जंगतलात निघून गेले………
हे सारे दृश्य बाजींद पाहत होता..!
कोण…?
जो बाजींद च्या गूढ विद्येचा जाणकार आहे..?
जो मला माहिती नाही,पण बाजींद ची ती गूढ विद्या जाणतो….?
बाजींद ने हातातील पट्टे खाली टाकले आणि त्याच गूढ भाषेत केवळ त्या योध्याला समजेल असे विचारले…
“अरे, महान योध्या ?
तू कोण आणि काय तुझे नाव गाव….?
तुला हे बाजींद चे अती पवित्र ज्ञान कसे माहिती, जरा मला सांग कृपा करुन…”
त्याच्या प्रश्नावर त्या योध्याने त्याच भाषेत उत्तर दिले…..”
मी कोण हे तुला सांगायची गरज नाही..आणि तू जसे म्हणतोस की हे ज्ञान बाजींद चे आहे…तर तुझ्या माहितीसाठी सांगतो….मला कुठल्या बाजींद ने ही भाषा शिकवली नाही…..ही भाषा मला शिकवली आहे ते माझ्या आत लपलेल्या योध्याने…माझ्या प्राणप्रिय ध्येयाने…या भाषेचा उगमच जर विचारशील…..तर ऐक……..अश्या अनेक भाषा विद्या ज्या महान पुरुषापुढे थिटी पडतील असा पुरुष आहे…”राजा शिवछत्रपती “
“शिवछत्रपती……”
खंडोजीच्या अंगावर काटे व डोळ्यात पाणी तरळत होते जेव्हा त्याच्या मुखातून शिवाजी महाराजांचे नाव येत होते…!
एकाग्र मनाने सखाराम व त्याचे सवंगडी ती कथा ऐकत होते.
भरल्या डोळ्यांनी ती कथा सांगत खंडोजी रडू लागला होता…!
काही क्षणात तो सावरला …तो सावध झाला…..!
सखाराम बोलला….
खंडोजीराव…ज्या गूढ ज्ञानापाई तुमी सारं रामायण केलं ते गूढ ज्ञान बाजींद व्यतिरिक्त कुठल्या योध्याला माहिती होते ओ ??
कोण असा योद्धा होता जो वस्ताद काकांना वाचवायला एवढ्या जंगलात आला होता ज्याला पण बाजींद सारखी जनावरं बिथरुन टाकायची कला माहिती व्हती…?
खंडोजी शांतपणे सखाराम कडे पाहून हसू लागला….!
योद्धा….मी सांगतोय ना पहिल्या पासन….अरे त्यो योद्धा नव्हता….ना शिपाई होता….ना देव होता….ना राक्षस होता……तो साधा माणूसच होता रं…… फक्त त्याचा देव शिवाजी होता….त्या देवासाठीच त्यानं सार आयुष्य ओवाळून टाकलं होतं…..
ते होते…खुद्द बहिर्जी नाईक……
क्रमशः बाजींद भाग २७ | बहिर्जी नाईक यांची कहाणी
संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे
लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव