महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,732

बाजींद भाग ३० | बहिर्जी नाईक यांची कहाणी

Views: 6329
9 Min Read

बाजींद भाग ३० | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ३० – वस्ताद काकांचा शब्द निशाण धरलेल्या शिलेदाराला ऐकू जाताच त्याने ठासणीची बंदूक खाली करत खाली आवाज दिला….” ए खोल रं दिंडी दरवाजा….परवली चा शबुद बरोबर हाय…”

रायगड च्या चित दरवाज्याचा दिंडी दरवाजा उघडला गेला आणि एक मावळा बाहेर येत म्हणाला…”रामराम शिलेदार…..काय बेत गडावर येण्याचा…?

त्याच्याकडे हसत वस्ताद काका बोलले…बहिर्जी नाईकांची खास माणसे आहेत ही…परवली चा शब्द उंबर फुल हाय…”

उंबर फुल…बर बर मग तुमास्नी कोण आडीवणार…..या या आत या…असे म्हणत तो मावळा आत गेला पाठोपाठ वस्ताद काका व सखाराम सह त्याचे साथीदार आत गेले….!

आत प्रवेशाताच मावळयाने दिंडी दरवाजा आतून बंद करुन घेतला.

आत निमुळती होत गेलेल्या दिवडीत धिप्पाड भालाईत उभे होते.
तोफांची तोंडे चिखलाने लिपुन बंद केली होती.
बाजूला पाच पन्नास पहारेकरी हशम तलवारी कमरेला अडकवून कामात गुंग होते…!
शिवशाही ची शिस्त पाहण्यासारखी होती.
कोणीही बेशिस्त नव्हते..!
समोरच एका धिप्पाड धारकऱ्याने वस्ताद काका ला ओळखले व लगबगीने धावत तो जवळ आला आणि मुजरा करत बोलला….मुजरा वस्ताद काका…!
लई दिसान गडावर येन केलासा ..!
बरं वाटलं तुमचं दर्शन घेऊन…!

वस्ताद काका हसत बोलले..आरं नाईकांची खास माणस हायती सोबत…जरा खासगीत वर्दी देऊन महाराजांची भेट घालायची हाय…..

व्हय व्हय घाला घाला…नाईकांच्या माणसासनी कोण आडीवनार…आस म्हणत तो धारकरी बाजूला झाला आणि काका तरातरा चालू लागले…सोबत सखाराम व त्याचे साथीदार पण चालू लागले…!

भर पावसात रायगड चढणे म्हणजे साक्षात स्वर्गाच्या पायऱ्या चढत देवाच्या दर्शनाला जाणे होय…!
राजधानी ला साजेसा किल्ला म्हणजे रायगड..!
सह्याद्रीचा मूर्तिमंत अविष्कार…!
धो धो पावसाने रायगडचे अभ्यंगस्नान पाहणे म्हणजे पर्वणीच..!
वळणा वळणा वर छोटे छोटे धबधबे निर्माण झाले होते.
अश्या मावळी पावसात पण ठायी ठायी काथ्याच्या गोंणपाटाची गोची करुन हातात भाला घेऊन राजधानीचे रक्षण करणारे शिवशाहीचे धिप्पाड भालाईत हिंदवी स्वराज्याच्या शिस्तीचे प्रदर्शन करत होते..!

अशा पावसात रायगड चा चढ चढून धाप तर लागत होती मात्र पावसाच्या पाण्यात येणारा घाम सुद्धा वाहून जात होता..!

अश्या पडत्या पावसात सखाराम मात्र मनोमन आनंदी होता.
ज्या शिवरायांची कीर्ती सारा हिंदुस्थान गातोय त्या माझ्या राजाच दर्शन व्हणार ही सखाराम साठी साधी गोष्ट नव्हती.
सात पिढ्या जरी प्रयत्न केला असता तर स्वराज्याच्या राजधानीत प्रवेश सुद्धा मिळवता आला नसता.
त्यो कोण कुठल्या जन्मीचा सोबती म्हणून खंडोजी भेटला वाटेत म्हणून हे दिवस बघायला मिळत होते.
खरोखर सखाराम व त्याचे साथीदार खंडोजी ला मनोमन धन्यवाद देत होते…!

पण, त्याच्या आयुष्यात पुढे काय झालं हे मातूर ईचारायच राहिलंच… सखाराम ने अंदाज बांधला की बहुतेक सावीत्री आणि खंडोजी च लगीन झालं असलं आणि बहिर्जी नाईकांनी यशवंतमाची जिंकून खंडोजीलाच सरदार केला असलं तिथला…म्हणून तर रायगडच्या दऱ्या डोंगरात सारे शिर्के आणि खंडोजी फिरत बसल्यात…चला कायबी म्हणा..लक्ष्मी नारायणाची जोडी हाय खंडोजी आणि सावीत्रीची…!

लय खस्ता खाल्या बिचार्यांनी…पण, त्या “बाजींद” च्या वहीच काय झालं असलं पुढं….दिल असलं म्हणा ते बी खंडोजी नं परत बाजींद ला…तसा गप बसणारा नव्ह खंडोजी…”

विचारांची चक्रे फिरत होती आणि वस्ताद काका रायगडावरील सरकारी दफ़्तरात पोहोचले…!

अनेक जणांचे अनेक विषय ऐकत मोठमोठे हवालदार मश्गुल होते, तर टाक दवत समोर ठेऊन लिखाणाची कामे करणारी मुनिमजी पण व्यस्त होते…!

काका हेर खात्याच्या कक्षाकडे वळाले आणि अनेक हेर तिथे स्वराज्यातून आलेल्या माहितीची प्रतवारी करत बसले होते…!

वस्ताद काकांना पाहूंन समोर बसलेले पंत काका उठले व म्हणाले…वस्ताद यावे….काहीच वर्दी नसताना प्रत्यक्ष तुम्ही रायगडी येण्याची तसदी घेतली…नक्कीच कारण महत्वाचे असावे….!

पंतांच्या याबोलण्यावर काका म्हणाले….होय पंत… ही चार मंडळी गस्तीच्या हेरांना दिसली…चौकशी केली तर “उंबरफुल” हा परवली चा शब्द सांगितला…

उंबर फुल…..?
बापरे…..म्हणजे प्रत्यक्ष बहिर्जींच्या एकदम जवळची माणसे आहेत तर…..बोला काय करावे यांच्यासाठी…..

मग, वस्ताद काकांनी सखाराम च्या धनगरवाडी चे दुखणे, टकमक टोकाची व्यथा आणि नरभक्षक वाघांचा बंदोबस्त ही कहाणी सविस्तर सांगितली…व या लोकांना महाराजांना सुद्धा भेटायचे आहे….!

काकांनी टाक दवतेत बुडवून सारा मजकूर समोरच्या भूर्ज पत्रावर लिहला आणि सविस्तर मायना बनवला आणि खास बहिर्जी नाईकांचा शिक्का मारुन खाली परवली चा शब्द मोडी लिपीत लिहला आणि बोलले….

उद्या सकाळी महाराजांचा दरबार आहे… उत्तरेत पाठवलेल्या हेरांची माहिती आली आहे….त्याच्या जोडीलाच हा कागद महाराजांना दाखवतो….

आज रात्री सरकारी विश्रांती गृहात मुक्काम करुद्या या लोकांना….आपण चर्चा करु थोडी की टकमक टोकावरुन कडेलोट बंद करावी…!
कारण बऱ्याच तक्रारी आल्या ज्यांना शिक्षा झाली त्यांच्या नातलगांच्या की आम्हाला अंतिम विधी ला किमान देह तरी मिळूदे…अजून महाराजांच्या कानी ही बातमी नाही…पण मागच्या महिन्यात केलेल्या कडेलोटा बद्धल स्वता बहिर्जी नाईक सुद्धा अस्वस्थ होते असे दिसून आले….!

मोठा श्वास घेत वस्ताद काका बोलले…ठीक आहे, कडेलोट शिक्षा कायमचीच बंद करायचा अर्ज करा…मुख्य हेर प्रमुख नात्याने पहिले अनुमोदन ची सही मी करतो…बाकी अंतिम निर्णय महाराज देतील सकाळी…!

सखाराम व त्याच्या साथीदारांना सरकारी दुकानातून नवीन मावळी कपडे, अंथरुणाचे पांघरुणाचे साहित्य देऊन त्यांच्या भोजनाची व विश्रांतीची सोय सरकारी अतिथी गृहात करुन वस्ताद काका पुन्हा सरकारी कचेरीत आले व पंत काकांच्या समवेत महत्वाच्या चर्चेत मश्गुल झाले….!

सकाळ झाली…..सूर्यनारायण नभोमंडळात दाखल झाला मात्र रायगड च्या डोक्याला वेढे देऊन बसलेले काळे कभिन्न पावसाळी ढग आणि धुक्याने सूर्यकिरणे रायगड ला स्पर्श करु शकत नव्हती..!

समोर हाताच्या अंतरावरील दिसणे मुश्किल इतके दाट धुके…!
पण, चांगले उजडले होते…!
अश्या दाट धुक्यात पण हातात मशाली घेतलेली मावळे मंडळी गस्त घालून रायगड ला पहारा देत होती…!

दरम्यान, एक हशम सरकारी अतिथीगृहात आला व सखाराम ला तयार रहा म्हणून सांगितले.
सरकारी दुकानातून दिलेले नवे कपडे घालून दरबारात जायचे आहे अशी वर्दी देऊन हशम निघून गेला..!

सखाराम व त्याचे साथीदार खूप खूप आनंदी होते..!

सखाराम व साथीदार तयार झाले व सरकारी अतिथीगृहातून बाहेर पडले व समोर उभ्या असलेल्या मावळयाला बोलले….शिलेदार…हित जगदीश्वर महादेवाचं देऊळ कुठं हाय जी…?
अमास्नी दर्शन मिळल का ओ ?

यावर तो हशम बोलला..सरळ समोर जावा…कोणी अडवलं तर परवली चा शबुद सांगा आणि दर्शन घ्यायला जायचं हाय अस सांगा…जावा सरळ होळीचा माळ लागलं…बाजारपेठ ओलांडली की समोरच जगदीश्वर मन्दिर…जावा…”

त्याचे उत्तर ऐकून ते चालू लागले….सखाराम च्या मनात आनंदाच्या किती लकेरी उठल्या असतील याची कल्पना करुन पहा…!
एक साधा मेंढपाळ हिंदुस्थानातील बलाढ्य राजसत्तेच्या राजधानीत खुद्द महादेवाचे दर्शन घ्यायला निघाला होता…

कोणत्या महादेवाचे दर्शन घ्यावे…ज्या महादेवाच्या आशीर्वादाने शिवरायांनी साधारण माणसे हाताशी धरुन दिल्ली हादरुन सोडली…भगव्या झेंड्याचा धाक असेतु हिमाचल बसवून रायगडी स्वाभिमानाचे सिंहासन निर्माण केले त्याचे दर्शन घ्यावे….की ज्याच्या अस्तित्वाने हिंदुस्थानातील बाराही जोतिर्लिंगे आजही टिकून राहिल्या त्या दस्तूरखुद्द राजश्री शिवाजीराजे भोसले नावाच्या महादेवाचे दर्शन घ्यावे….केवळ मनाची घालमेल….!

आजवर ज्याच्यामुळे मंदिराचे कळस, अंगणातील तुळस, गळ्यातल्या माळा, कपाळावरील टिळे आणि उरात जग जिंकायची ईर्षा टिकून राहिले ते शिवाजी राजे साक्षात तमाम हिंदुस्थानाचेच जगदीश्वर महादेव होते यात मात्र शँका नव्हती..!

डोळ्यात आलेले पाणी पुसत सखाराम होळीच्या माळावर आला.
अनेक कुणबी आपापल्या मंडई लावण्यात व्यस्त होते.
बाजारात शिस्तबद्ध गर्दी दिसू लागली.
धुक्यामुळे माणसे विरळ होती पण अस्तित्व जाणवत होते..!
पेठ ओलांडली आणि पेठेच्या डाव्या हाताकडून एक वाऱ्याचा मोठा झोत सखाराम च्या मुखावर आला तसा सखाराम व त्याचे साथीदार दचकले….पाठोपाठ त्यांच्या कानात कोणीतरी गुण गुंण गुणगुणल्याची जाणीव त्यांना वाटली तसे चौघेही घाबरलेल्या नजरेने त्या डोंगराच्या विस्तीर्ण टोकाकडे बघत उभे राहीले….तितक्यात समोरुन घोड्यावरून येत असलेल्या एका धारकऱ्याने चौघांना थांबवले व विचारले…ए कोण रं तुम्ही….?

त्याच्या बोलण्याने भानावर आलेल्या सखाराम ने ” उंबर फुल..परवली शब्द सांगितला व जगदीश्वर दर्शन कारण सांगितले….”

हे ऐकताच धारकरी बोलला….बर बर नाईकांच्या खासगीतले लोक वाटतं… जावा जावा…”

थोडा वेळ थांबत पाठमोऱ्या झालेल्या घोडेस्वाराला थांबवत सखाराम बोलला…..शिलेदार….या बाजूचा रस्ता कुठशी जातो ओ….?

घोड्याचा लगाम खेचत गोल गिरकी घेऊन तो धारकरी त्या रस्त्याकडे पाहत बोलला….आर बाबांनो तिकडं नका बघू….तिकडं गेलेली माणस माघारी येत नाहीत…..टकमक टोक हाय तिकडं…टकमक टोक……

त्या शिलेदाराचे ते शब्द कानावर पडताच सखाराम व त्याच्या सवंगड्याच्या अंगावर भीतीने सर्दिशी काटा आला…!

क्रमशः बाजींद भाग ३० | बहिर्जी नाईक यांची कहाणी | बाजींद भाग ३०

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a Comment