श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे स्मारक, शनिवारवाडा, पुणे –
ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर केलं त्या महान योद्ध्यांचा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे स्मारक, शनिवारवाडा, पुणे येथे आहे.
वडील बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे निधन झाल्यावर १७२० साली बाजीरावसाहेब पेशवेपदावर आले. अवघ्या ४० वर्षाच्या आयुष्यात ३० पेक्षा अधिक लढायांमध्ये अपराजित राहिलेले ते अजिंक्य योद्धा होते. त्यांच्याच कारकीर्दीत शिंदे, होळकर, पवार, रेठरेकर, बुंदेले असे नामवंत सरदार उदयास आले. पालखेड, खर्डा, भोपाळ, माळवा, ई. लढाया त्यांनी गाजवल्या. आपण मात्र बाजीराव म्हणलं की लगेच मस्तानी च नाव जोडतो. त्यांची राजकीय कारकीर्द विसरली जाते.
या पराक्रमी पेशव्याचे त्यांच्या कर्मभूमीत स्मारक असावे म्हणून शनिवारवाडाच्या पुढ्यात त्यांचा पुतळा उभारला आहे. हा पुतळा सुमारे १४ फूट उंच असून अश्वारूढ आहे. दि. ०४ फेब्रुवारी १९८४ रोजी भारताचे जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. सुप्रसिध्द मूर्तिकार बी.आर.खेडकर यांनी हे शिल्प घडवले आहे. या कार्यक्रमाला पेशवे घराण्यातील वंशज उपस्थित होते. नुकताच पुतळ्याचा जिर्णोद्धार केला गेला आहे.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे हे पुतळारूपीस्मारक कायम प्रेरणादायी ठरणार आहे !
– वारसा प्रसारक मंडळी.