बाजीरावाची विहीर, सातारा –
प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये जलव्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. समरांगणसूत्रधार किंवा अपराजितपृच्छा यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये बारव,विहिरी,जलाशय यांची योजना कशी करावी याविषयी माहिती दिलेली आहे.(बाजीरावाची विहीर)
पुरस्य बाह्याभ्यंतरे विविधा: स्युर्जलाशया: |
वापीकूपतडागानि कुंडानी विविधानी च ||
कूप,वापी,तडाग आणि कुंड असे निरनिराळे जलसाठे एखाद्या गावाच्या बाहेर आणि आतमध्ये असावेत असं अपराजितपृच्छा या ग्रंथात म्हणलेलं आहे.यातील कूप म्हणजे साधी विहीर आणि वापी म्हणजे बारव किंवा पायऱ्यांची विहीर.अशाच प्रकारची ही सुंदर बारव सातारा शहरामध्ये पहायला मिळते.ही बारव ‘ बाजीरावाची विहीर ‘ या नावाने ओळखली जाते.असं म्हणतात की या परिसरात श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा वाडा होता.त्यामुळे त्यांच्या निधनानंतर छत्रपती शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांच्या स्मरणार्थ ही बारव बांधली.
ही बारव दुमजली आहे.याच्या कोरीव कमानीवर शरभशिल्पं आणि इतर काही मुर्तीं कोरलेल्या आहेत.या दुमजली कमानीपाशी गेलं की पुढच्या बाजूला असलेली विहीर दिसते.या विहिरीवर मोट बसवण्याची सोय केलेली आहे.साताऱ्यातील अर्कशाळेवरून पुढं गेलं की सरपंच मारूतीचं मंदिर लागतं.या मंदिराच्या बरोबर समोर मुख्य रस्त्याला लागूनच ही बारव आहे.
© आदित्य माधव चौंडे.