बाळासाहेब ठाकरे
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.
२३ जानेवारी, इ.स. १९२७ मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला होता .
सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती.
साभार – Wikipedia