बळेश्वर महादेव मंदिर, घोटण, ता. शेवगाव –
अहमदनगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणला खेटून असल्याने सातवाहन राजवटीतील अवशेष आपल्याला येथे सापडतात.. पुढे १० ते १४ व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणा-खुणा पैठण व परिसरात विखुरलेले बघायला मिळतात. शेवगाव पासून १० कि.मी. अंतरावर घोटण गावात असणारी मल्लिकार्जुन, बळेश्वर व जटाशंकर ही प्राचीन मंदिरे ही अशाच स्थापत्याचे आपल्याला दर्शन घडवते.(बळेश्वर महादेव मंदिर)
मल्लिकार्जुन मंदिराच्या समोर डाव्या बाजूला बळेश्वर महादेव मंदिर असून या मंदिरात पुरातत्व विभागाने त्यांचे काही साहित्य, परिसरातील भग्न मूर्त्या व इतर काही अवशेष ठेवलेले आहेत. त्यामुळे हे मंदिर इतर वेळेस कुलूप लावून बंद केलेले असते. आपण मागणी केल्यास तिथे देखभालीसाठी असलेले पुरातत्व विभागाचे पहारेकरी आपल्याला मंदिर पाहण्यासाठी खुले करून देतात. हे मंदिर उत्तराभिमुख असून ओसरी व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
ओसरी चार स्तंभावर उभी असून चार रिकामी देवकोष्टके आपल्या नजरेस पडतात. गर्भगृहाची द्वारशाखा सुंदर शिल्पांनी शिल्पांकृत असून शिल्पांची कालमानामुळे झिज झालेली आपल्याला दिसून येते. गर्भगृहात अनेक मूर्त्या व भग्नावशेष आपल्या नजरेस पडतात. गर्भगृहात चार स्तंभ असून समोर अर्धा फूट खोल शिवलिंग स्थापित आहे.
Rohan Gadekar