बल्लाळी माता मंदिर, ब्राम्हणी, ता.राहुरी –
नगर शहरापासून डोंगरगण – वांबोरी घाटमार्गे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले ब्राम्हणी हे सुंदर गाव. अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला तो या ब्राह्मणी गावात. जसा पैस खांब नेवासे येथे आहे तसा एक अमृतानुभव स्तंभ या बल्लाळआई देवीच्या मंदिरासमोर आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना या परिसरातून गेले, या परिसरात असताना प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांनी शिवआराधाना साठी महादेवाची जी ठिकाणे निवडली त्या ठिकाणी आज ही मंदिरे उभी आहेत असे स्थानिक लोक सांगतात.बल्लाळी माता मंदिर.
एसटी स्टँड वरून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर बल्लाळी मातेचे मंदिर असून या मंदिरात देवीची सुंदर मूर्ती आहे. गेल्या काही वर्षात मंदिराचा जीर्णोद्धार स्थानिक लोकांनी केला आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला एक लहान मंदिर असून त्यात मच्छिंद्रनाथांची प्रतिमा आहे.
मागील बाजूला आणखी एक महादेवाचे पुरातन मंदिर दिसून येते, तसेच अनेक वीरगळ, भग्नावस्थेत असलेले नंदी, देवतांच्या मूर्त्या, हत्ती व नागाची शिल्पे दिसून येतात. सध्या सर्व पुरातन मंदिराला रंग देऊन त्याचे मूळपण घालवले असले तरी त्यांच्या भव्यतेची कल्पना आपल्याला लगेच कळून येते. हे सर्व पाहिल्यावर गावाची ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी आपल्या लक्षात येते.
Rohan Gadekar