महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,25,858

बाळोजी नाईक ढमाले यांची शौर्यगाथा

By Discover Maharashtra Views: 3814 2 Min Read

बाळोजी नाईक ढमाले यांची शौर्यगाथा

नोव्हेंबर १६९५ ला औरंगजेबाचा मुक्काम विजापुर जिल्ह्यातील गलगली इथे होता. त्याने जुन्नरचा किल्लेदार आणि फौजदार मन्सूरखान याला कुवारीगड जिंकून घेण्याची आज्ञा केली.
त्यानुसार मन्सूरखानाने आपला मुलगा मुहम्मद काजिम याच्या हाताखाली सैन्य देऊन पौड मावळाकडे रवाना केलं. काजिकच्या लोकांनी किल्ल्यातल्या रायाजी बाहुलकर नावाच्या माणसाला अमिषं दाखवून आपल्या बाजूला वळवून घेतलं.
मोगल शिड्या लावून आत शिरले, भयंकर रणकंदन सुरू झाले. मोगलांच्या सैन्यबळामुळे आणि रायाजीच्या फितुरीमुळे कुवारीगड मोगलांच्या ताब्यात गेला.
त्र्यंबक शिवदेव आणि मोरो नारायण हे अधिकारी कैद झाले , तर गिजोर्जी निंबाळकर, दिनकरराव आणि त्यांचे निष्ठावंत मराठे स्वामीकार्यावर खर्ची पडले.

कुवारीगडाच्या पराभवाची बातमी शंकराजी नारायण सचिवांच्या कानावर येऊन पोहोचली. त्यावेळी ते राजगडावर होते. मोगलांनी किल्ला भेद करून घेतल्याच्या बातमीने ते दु:खी झाले. पण खचले नाहीत.
त्यांनी कुवारीगड परत जिंकून घेण्याचा निश्चय केला. गडावर मोघली सैन्य वेढा घालून बसले होते. मोघली सरदार मुहम्मद काजिमचा बाप मन्सूरखान हा जुन्नरचा फौजदार कुवारीगड उर्फ कोरीगडाच्या पायथ्यास असलेल्या मोघलांना रसद पुरवित असे.
शंकराजी नारायण सचिवांनी नावजी बलकवडे आणि बाळोजी नाईक ढमाले यांच्यावर ही रसद मारण्याची कामगिरी सोपविली होती.

एकदा जुन्नरवरून अशीच रसद कोरीगडाकड़े येण्यास निघाली असता बाळोजी ढमालेंनी त्यावर छापा घातला.
मोगलांनकड़े अवजड तोफा आणि घोड़दळ सुद्धा होते. मराठ्यांनी गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा असा काही वापर केला, की मोगल सैन्याची पार दाणादाण उडाली आणि पाहता पाहता त्यांचं सैन्य विखुरलं गेलं.
मोघल सैनिक जेथे वाट मिळेल तेथे सैरावैरा पळू लागले. मराठ्यांच्या हाती अमाप पैसे आणि शेकडो अरबी घोड़े लागले.
या युद्धात मराठ्यांचा मोठा विजय झाला पण शौर्याने लढ़णारे बाळोजी नाईक ढमाले या लढाईत धारातीर्थी पडले.

Leave a Comment