महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,348

बळवंतगड | Balwantgad

Views: 4132
3 Min Read

बळवंतगड…

नाशिक हे पुर्वीपासुनच बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी कल्याण,सोपारा, डहाणु बंदरात आलेला माल विविध घाटवाटांनी या बाजारपेठेत येत असे. यातील काही घाटवाटांचे आज महामार्गात रुपांतर झाले आहे. आज कसारा घाट म्हणुन ओळखला जाणारा घाटमार्ग म्हणजे प्राचीन थळ घाट. नाशिक परिसरातून उत्तर कोंकणात उतरणाऱ्या थळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी घाटासमोर असलेल्या व मुख्य डोंगररांगेपासून वेगळे झालेल्या एका लहान डोंगरावर बळवंतगड हा टेहळणीचा किल्ला बांधण्यात आला. प्राचीन थळ घाटाचा रखवालदार असलेला हा किल्ला आजही दुर्लक्षित आहे.

बळवंतगडाला भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला विहिगाव गाठावे लागते. मुंबई ते विहीगाव हे अंतर ११० कि.मी.असुन कसारा घाटातील खोडाळा फाट्याहून तेथे जाता येते तर नाशिकहून हे अंतर ५५ कि.मी.असुन घाटनदेवी मार्गे तेथे जाता येते. विहिगावाच्या अलीकडे वनखात्याच्या कार्यालयापासून एक रस्ता डावीकडे माल गावाकडे जातो. या ठिकाणी रिल्याक्स कंट्री रिसोर्टचा फलक लावलेला आहे. या वाटेने १.५ कि.मी. चढण चढल्यावर १/४०० ते १/६०० या कि.मी. अंतर दर्शविणाऱ्या दोन दगडा दरम्यान डाव्या बाजूला किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे. सध्या येथे सांगण्यासारखी इतर कोणतीही खुण नाही. या वाटेने टेकडीच्या दिशेने चढताना किल्ल्याची तटबंदी दिसायला सुरवात होते व १० मिनिटात किल्ल्याच्या दक्षिणेकडील ढासळलेल्या तटबंदीतून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो.

बळवंतगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ७१० फुट असुन किल्ल्याचा माथा पुर्वपश्चिम साधारण १.५ एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदीत दोन बुरुज असुन एक बुरुज किल्ल्याच्या पश्चिम टोकाला पहायला मिळतो. किल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन या रचीव तटबंदीत सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. तटबंदीच्या फांजीवर मोठया प्रमाणात माती जमा झाली असुन तटबंदीत एका ठिकाणी पाणी वाहुन जाण्यासाठी नाली पहायला मिळते. तटबंदीवर फेरी मारताना किल्ल्याच्या मधोमध असलेला उंचवटा दिसतो. या उंचवट्यावरील झाडाखाली शेंदुर फासलेले काही दगड ठेवलेले आहेत. उंचवट्याच्या पुढील भागात दोन उध्वस्त घरांचे अवशेष पहायला मिळतात. हे अवशेष पाहुन पुढे आल्यावर उतारावर एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात गदा घेऊन पनवतीला पायाखाली दाबून ठेवलेली मारूतीची मुर्ती पहायला मिळते.

मूर्तीसमोर एक लहान पिंड व नंदी ठेवलेला आहे. येथे खालच्या बाजुला किल्ल्यावर पाण्याचा एकमेव स्त्रोत असलेले खडकात खोदलेले प्रचंड मोठे टाके दिसते पण हे टाके भंगलेले असल्याने व त्यात मोठया प्रमाणात दगडमाती आल्याने पाणी साठत नाही. टाके पाण्यासाठी थोडे पुढे जाउन उजवीकडे वळसा घालून खाली उतरावे लागते. टाक पाहुन तसेच पुढे निघाल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिम भागात पोहोचतो. येथील ढासळलेली तटबंदी व इतर अवशेष पहाता या ठिकाणी किल्ल्याचा दरवाजा असल्याचे जाणवते. तटबंदीत एका ठिकाणी दरवाजाला अडसर घालण्याची खाच दिसुन येते. येथुन वर आल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिम टोकावरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून थळ घाट, मुंबई नाशिक महामार्ग तसेच लोहमार्ग आणि कसारा गाव इतका लांबवरचा प्रदेश नजरेस पडतो तर पुर्वेकडील बुरुजावरून त्रिंगलवाडी व माल गावाचे पठार यावर नजर ठेवता येते. संपुर्ण गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. बळवंत गडावरील घटनाबाबत इतिहासात कोणत्याही नोंदी आढळत नाही.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment