महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,711

बांगडगड | आळु

By Discover Maharashtra Views: 1373 9 Min Read

बांगडगड | आळु –

(जुन्नर तालुक्यातील अपरीचित इतिहासाच्या पाऊलखुणा)

जुन्नर शहराच्या उत्तरेस पिंपळगाव जोगा व आळु ही ग्रुपग्रामपंचायत असलेली दोन वेगळी गाव आहे. यापैकी आळु या गावहद्दीत  बांगडगड असल्याचे मित्र कु. नितीन बोकड सांगितले होतं. तो पाहण्याची उत्सुकता खुप दिवसांपासुन होती. कारणही तसेच होते की मित्र नितीन यांनी गडावरील पाण्याच्या टाकीचा टाकलेला फोटो. आळु हा परीसर जुन्नर तालुक्यातील असल्याने उत्सुकता तर अगदीच शिगेला पोहोचली होती. जुन्नरहुन दुचाकी प्रवास तर त्या दिशेने चालू होताच, परंतु त्या प्रवासात मनाला सारखाच भेडसावत असणारा प्रश्र्न म्हणजे खरंच जुन्नर तालुक्यात हा आठवा डोंगरी किल्ला असेल का? आणि असलाच तर जुन्नर तालुक्यासाठी नक्कीच ती एक नवं ऐतिहासिक पर्वनीच असेल. या विचारातच पांगरी माथ्यावरुन आडवाटेने डिंगोरे गाठले.

डिंगोरे गावातील वेशीतुन एक उत्तरेला मार्ग आपणास आळुला घेऊन जातो. या मार्गाने उत्तरेस प्रवास सुरू केला. अगदी थोड्याच अंतरावर उत्तरेला डिंगोरे गाव संपते तेथेच एक ऐतिहासिक गंगा महादेव मंदिर निदर्शनास पडते. या महादेव मंदिराच्या उत्तरेकडील आवारात अनेक वर्षांपासून गाडलेला घाट नुकताच उकरलेला असल्यामुळे त्याचे सुंदर दृश्य पाहून अत्यानंद झाला. डिंगोर ग्रामस्थांनी या बांधलेल्या ऐतिहासिक घाटास उकरून पुन्हा पुनर्जिवीत केले होते. महादेवाचे दर्शन घेत दुचाकी प्रवास करत मी आळु गावच्या काळबा मंदिरापाशी पोहोचलो कि जेथे नितीन माझी वाट पाहत उभा होता. आळु ग्रामस्थांचे श्रद्धा स्थान असलेले काळबा मंदिर एका वटवृक्षाच्या छायेत विटेत बांधलेले निदर्शनास पडले. नवीन विटत बांधकाम चालू असल्यामुळे मंदिराबाबत काही विशेष वाटले नाही. परंतु जेव्हा मंदिराच्या आवारात दुचाकी उभी करून परिसरीसरात नजर फिरवली तर खुपचं आनंद झाला.

मंदिराच्या पश्र्चिमेस आवारात शेंदुर फासलेल्या तीन जिर्ण विरघळी, दोन थडगी व काही शिवपिंडी दिसताच प्रसन्नता वाटली व क्षणात मनाने प्रश्र्न विचारला. खरोखरच येथे तीन वीर जर वीरगतीला प्राप्त झाले असतील तर या ठिकाणी असलेल्या बांगडगडाला नक्कीच काहीतरी ऐतिहासिक वारसा असावा मात्र असं वाटू लागले.

काळबा मंदिर परीसर बराच पायाखाली घातला. काही आजुन इतिहासाच्या खुणा मिळतात का? याचा शोध नितीनला व स्थानिकांना विचारून घेतला. फिरताना एक गोष्ट प्राकर्षाने जाणवली की या ठिकाणी पुर्वी आळु गावचे गावठाण नक्कीच असावे. कारण तेथील जवळपास २०० ते ३०० वर्ष जिर्ण झालेला वटवृक्ष व याच वटवृक्षाच्या खाली पुर्वेकडुन विसावलेली भलीमोठी कोरीव असलेली हनुमानाची शिळा याचे ज्वलंत उदाहरण देत साक्ष देत उभी होती. पुर्वी जेथे गाव वसलेले असायचे त्या भागाला आपण गावठाण असं संबोधतो. काही कारणास्तव या गावाच्या जागा बदलल्या जायच्या व गाव दुसरीकडे स्तलांतरीत करण्यात येत असे. मग या पुर्विच्या गावठाणाच्या काही पाऊलखुणा ग्रामस्थ तेथेच सोडून जायचे. देवता शक्यतो हालवत नसतं कारण देवता जर हलवली तर गावावर प्रकोप होईल असे वाटत असे. म्हणुनच तर जुन्या गावठाणाची शक्तिची देवता या कातळ कोरीव वैभवातून इतिहासाची साक्ष देत आजही येथे निरंतर उन, वारा, पाऊस सहन करत आज कित्येक वर्षे उभी होती.

बजरंग बलीचे दर्शन घेत मी आणि नितीन निघालो होतो बांगडगडाकडे. बांगडगड हे पुर्विपासुन उत्तर दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या एका डोंगर भागाचे स्थानिकांनी दिलेले नाव. मुथाळणे घाट व आळु घाट या दोन्ही घाटांच्या मध्ये वसलेला हा सुंदर डोंगर म्हणजेच बांगडगड. पुर्वेला ओतुर, दक्षिणेला मराडवाडी, पश्चमेस आळु, तर उत्तरेला नयनरम्य असलेले व निसर्गाने ओतप्रोत भरलेले मुथाळणे गाव. बांगडगड हे नाव का दिले असावे याबाबत स्थानिकांना विचारना केली खरी परंतु कुठली भाकडकथा ऐकायला मिळाली नाही. हां एक मात्र गोष्ट ऐकायला मिळाली की श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास या मार्गे होत असे. कारण विचारले असता वर गडमाथ्यावर खोदलेला घोड्याचा मार्ग हे ऐकायला मिळाले.

वनहद्दीच्या पश्चमेस असलेल्या वाटेने आम्ही एका स्थानिकाच्या घर आवारात दुचाकी उभ्या केल्या.येथुनच पुर्वेस पसरलेल्या डोंगररांगेवर आम्ही चढण्यासाठी सुरुवात केली. पाऊलवाटेत आम्हाला राष्ट्रीय पक्षी मोराचे सुंदर दर्शन घडले. आम्हाला गडावर पोहचण्यासाठी उत्तरेकडून मार्ग होता. तो बाजूला ठेवत मी नितीनला घेऊन दक्षिणेकडुन बांगडगडाला वळसा घालून पुर्वेकडील कातळ भिंतीच्या कडेने पुर्वेस मध्यापर्यंत निरिक्षण करत पोहचलो. बांधकामाच्या काही खुणा दिसतात का पाहिले परंतू तसे काही आढळून आले नाही. येथूनच वर चढण्यासाठी एक अवघड मार्ग मी नाविलाजास्तवच निवडला. कारण खाली उतरुन जाणे खुप अवघड होते. चढाई कठीण व थोडी रिस्की होतीच परंतु नितीनचे धाडस पाहुन ती सोपीच झाली. मग काय वाढलेल्या गवताचा आधार घेत बांगडगडाचे दक्षिण शिखर गाठले. येथील एका ठिकाणी मोठा गाडलेला खड्डा निदर्शनास पडला कदाचित ही पाण्याची सोय केली असावी असे वाटले खरे परंतु बांधकामांच्या खुणा कुठेही निदर्शनास आल्या नाही. यानंतर पुढे उत्तरेकडे चालू लागलो.

दुरूनच समोर एक साधारण पाच फुट रूंद व जवळपास ४५ फुट लांबिचे कोरीव पाण्याचे गाडलेले टाके दिसून आले व अत्यानंद झाला. गड निरीक्षणा बरोबरच आजुबाजुचा परीसर ही तितकाच महत्त्वाचा असतो. गडावर राहणीमान किती प्रमाणात असावे याचा अंदाज नेहमीच पाण्याच्या टाक्या पाहून केला जातो. याच टाक्या गडावरील मनुष्यांचा राबता, प्राणी यांची माहिती गोळा करण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. एवढंच नाही तर पाण्यांच्या टाक्या गडावरील इतिहास सांगण्यासाठी पण महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. कदाचित या गडावरील ही गाडलेली टाकी जर उकरली तर त्यात सापडणारे अवशेष कदाचित या ठिकाणी कुणाचा राबता व कोणत्या कालखंडात कोणती राजवट येथे राहून गेली असेल हे ही ओळखले जाऊ शकते. कदाचित येथील ऐतिहासिक वारसेची ओळख याच टाकिच्या माध्यमातून भविष्यात होऊ शकते.

गडाचा एकंदरीत विस्तार खुपचं छोटा असल्याने हा गड असावा असे वाटत नाही. तसेच याठिकाणी तटबंदी, राहण्याची व्यवस्था, इतर ठिकाणी पाण्याची सुविधांचा अभाव असल्याने हा गड नसल्याची खात्री पटते. या गडाच्या उत्तर टोकावर दोन कोरीव दगड व अगदीच छोटे बांधकाम असल्याने हा डोंगर भाग जुन्नर तालुक्यातील पुर्व, दक्षिण व पश्चिम भागावर लक्ष ठेवण्यासाठी वापरात असावा असे वाटते. कारण येथुन जवळच कोंबडं किल्ला व हरीश्चंद्रगड असल्याने व त्यांना शत्रुसैन्यांपासुन सुरक्षिततेचा उपाय म्हणून येथे राहणाऱ्या पाहरेदारांसाठी टाकी खोदण्यात आली असावी. याच बांगड्यांचा पुर्वेकडुन एक नैसर्गिक गुहा आहे. या गुहेत साधारण १० ते १५ व्यक्ती सहज आराम करू शकता. उत्तरेला असलेल्या डोंगर माथ्यावर जेव्हा आपण जायला निघतो व बांगडगडाचे उत्तर टोक सोडून खाली उतरून आपण लगेच गिधाडे डोंगराकडे चढाईला सूरुवात करतो. या डोंगरावर पुर्वी खुप गिधाडांचे अस्तित्व असे म्हणून या डोंगरास गिधाडे डोंगर संबोधतात.

आज या ठिकाणी एकही गिधाड पहावयास मिळत नाही फक्त डोंगराचे नाव गिधाड राहीले मात्र गिधाडांचे अस्तित्व नाहीसे झाले. या ठिकाणाकडे जाण्यासाठी सूरूवात करतो तेथेच जवळच  साधारण अडिच फुट रूंद व साधारण ४० फुट लांबीचा एक चर निदर्शनास पडतो. हा नैसर्गिक असावा की मनुष्य निर्मीत समजून येत नाही. स्थानिक सांगतात की ही घोड्यांची वाट होती. परंतू तेथील परीस्थिती पाहता तसे वाटत नाही. गिधाडे डोंगर माथ्यावर आपण घळीतुन प्रवेश करत असताना आपणास येथे उंबराचे पाणी असलेला एक छोटा झरा दिसतो. अगदी एप्रिल/मे पर्यंत येथे पिण्यासाठी पाणी उपलब्ध असले बाबत स्थानिक सांगतात.बांगडगड डोंगर माथ्यावर पोहोचलो की एक वाट उजवीकडे जाते या वाटेने गेला तर एक सुंदर दगडांची मानवरहित कलाकृती व आविष्कार पहावयास मिळतात. एकमेकांवर ठेवणं असलेले हे दगडी पाहुन नेत्रसुख मिळतेच परंतु भौगोलिक चमत्कार कसा असतो ते पण ज्ञानप्राप्त होते.

पुढे आपणास आळुघाट व जोशी वाडी, कोपरे, मांडवेकडे जाता येते. जर उजविकडे चढाई केली तर ही वाट पिर शिखरावर घेऊन जाते व येथेच पिरबाबा समाधिचे दर्शन घडते. या ठिकाणाहून चारही बाजूंच्या निसर्ग सौंदर्य न्याहाळता येते. या ठिकाणी रामनवमीला अनेक भावीक येतात व पिरबाबांचा यात्रोत्सव साजरा करतात. येथून पुढे चालत गेल्यावर आपण मुथाळणे घाटाकडे प्रवेश करतो व पुढे भामकाई डोंगरमाथा चढाई करून भामकाईदेवीचे दर्शन घेता येते. खरोखरच नयनरम्य दृश्य जर पहायचे झाले तर येथील ट्रेक म्हणजे एक पर्वणीच. परंतु सध्या लाॅकडाऊन परीस्थिती असल्याने या परीसरात जाण्यासाठी बंदी आहे. लाॅकडाऊन नंतर आपण नक्कीच या स्थळांना भेट देऊ शकता.

छायाचित्र व लेख – रमेश खरमाळे, माजी सैनिक खोडद

Leave a Comment