पेशवेकालीन बापट वाडा | ऐतिहासिक पनवेल..
पेशवेकालीन बापट वाडा १७२० साली पेशवाईत एका उच्च अधिकारी पदावर असलेल्या श्री बाळाजी पंत बापट यांनी बांधला होता. त्याकाळातील मराठे शाहीच्या बांधकामाची चुणूक या वाड्याच्या बांधकामात दिसते.या वाड्याला ३ प्रवेशद्वार असून दोन चौक आहेत.वाडा तसा भव्य आणि शहऱ्याच्या मुख्य भागात आहे. बराचसा पडीक पण जुन्या गोष्टी सांभाळून आहे हा वाडा.जुने बांधकाम पाहून मन अगदी भूतकाळात गेले.येथील भव्य लाकडी दरवाजा आणि लाकडी नक्षीकाम त्या काळातील बांधकामाची साक्ष देतात. आज २९९ वर्षे ही होऊनही ही वास्तू अजून बऱ्यापैकी तग धरून आहे, याचाही अभिमान वाटला. बापट यांचे सध्याचे वंशज इथे अजूनही राहतात.इथे अजून बरीच भाडेकरू लोक राहतात.
दरवर्षी होणारा पारंपरिक दहीकाला उत्सव परंपरा इथे अजूनही पाळली जाते.
ब्रिटिश काळात इथे मुलांची शाळा भरली जायची. त्यावेळेस शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे वडील श्री प्रबोधनकार ठाकरे इथे शिकायला होते.संपूर्ण वाडा पाहून मग जुन्या ऐतिहासिक अश्या श्री बल्लाळेश्वर मंदिराकडे मोर्चा वळविला. इथे आता बरेच आधुनिकरण झालेलं आहे. पेशवेकाळात पनवेल येथील श्री बापट , गुळवे आणि फडके यांनी या मंदिर आणि सभोवताली असलेल्या वडाळे तलावाची उत्तम बांधणी केली होती.
इथे असलेली जुनी समाधी आणि दगडी दिपमाळ अजूनही याची साक्ष देतात.मंदिरात शिरण्यापूर्वी दगडी गणेश पट्टी अगदी लक्ष वेधून घेतात. तिथे अभिषेक लक्ष्मी चेही शिल्प अतिशय सुंदर आहेच.
मंदिर तसे भव्यच आहे. पेशवेकाळात कितीतरी दिग्गज घराण्यांचा पदस्पर्श इथे लाभलेला आहे. या मंदिरासमोरच श्री पुराणिक यांनी बांधलेला आयुर्वेदिक औषधांचा “धुतपापेश्वर” हा जुना कारखाना पहावयास मिळतो. याचेही बांधकाम हे १८ व्या शतकातील आहे.
मग तिथून गोवा मुक्तीसंग्रामतील हुतात्मा श्री हिरवे गुरुजी स्मारक, वडाळे तलाव ही महत्वाची ठिकाणे पाहून मोर्चा वळविला तो शिल्पकार श्री अरुण कारेकर यांच्याकडे. योगायोगाने त्यांची भेटही झाली. त्यांनी बनविलेल्या आद्य क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके यांचे शिल्प तर पाहण्यासारखे आहे.छत्रपती संभाजी महाराज यांचे त्यांनी रेखाटलेले चित्र अप्रतिम आहेच.
Credit – Kiran Shelar facebook