महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,532

वैज्ञानिक युगाला आश्चर्य वाटेल अशी पाणीपुरवठा योजना बाराबावडी

By Discover Maharashtra Views: 3951 8 Min Read

वैज्ञानिक युगाला आश्चर्य वाटेल अशी पाणीपुरवठा योजना बाराबावडी

सुमारे चारशे वर्षां पूर्वी मलिक अंबर नावाच्या एका हबशी गुलामाला अहमदनगर मधील एका मुस्लीम सरदाराने आफ्रिकेतील गुलामांच्या बाजारात विकत घेतले. त्या गुलामाच्या चांगल्या गुणांमुळे प्रभावित होऊन त्या मुस्लीम सरदाराने त्याची गुलामीतून मुक्तता केली आणि त्याला आपल्याच कुटूंबातील सहकारी म्हणून वागवले व त्याला युद्ध कलेचे धडे दिले.पुढे तो गुलाम सुद्धा युद्धात उत्कृष्ट कर्तबगारी दाखवत सरदार पदापर्यंत पोहचला व त्यामुळे त्याने औरंगजेबाच्या दरबारी नोकरी पत्करली. एकदा औरंगजेब मराठ्यांशी अटकोविटकोच्या लढाई साठी महाराष्ट्रात उतरणार होता. त्याला महाराष्ट्रात स्थायी स्वरुपाची राजधानी निर्माण करायची होती.औरंगजेबाच्या सरदार मंडळीनी मूळ नाव “खडकी” असलेल्या औरंगाबादची निवड केली. राजधानी औरंगाबाद वसवण्याची जबाबदारी मलिक अंबर च्या खांद्यावर येऊन पडली.

मलिक अंबरने ५२ पुरे आणि ५२ दरवाजे असणारे उत्कृष्ट शहर औरंगाबाद वसवले. शहर वसवताना नागरिकांना पुरेल अश्या पाण्याची सोय करणे गरजेचे होते, परंतु औरंगाबामधील खाम नदी त्या दृष्टीने परीपुर्ण नव्हती.
आफ्रिकेतून गुलाम म्हणून भारतात येताना मलिक अंबर इराण मधून आला होता आणि इराण मधील क्यानोत” हि जलव्यवस्थापन यंत्रणा त्याला माहित होती. त्याने त्याच पद्धतीचा येथे अवलंब करायचे ठरवले. इराण देशात सुद्धा पाण्याचे दुर्भिक्ष आहे. परंतु तरी सुद्धा तुम्हाला इराण मध्ये सर्वत्र उत्कृष्ट बागा, कारंजे यांची रेलचेल दिसते. बऱ्यापैकी दुष्काळी आणि जवळ जवळ वाळवंट असणाऱ्या प्रदेशातील हा चमत्कार म्हणजे ‘क्यानोत’
क्यानोत म्हणजे काय? आणि ते कसे ? बनवले जातात ?

बाराबावडी

ज्यावेळी पावसाळ्यात पाउस पडतो त्यावेळी डोंगर रांगांच्या मध्ये एक जल साठवण विहीर तयार केली जाते. विहिरीची खोली ५०० फुट किंवा त्यापेक्षा अधिक सुद्धा असते. अर्थात जमिनीच्या प्रतीनुसार आणि पाण्याची लागणारी गरज यावर विहिरीची खोली ठरते.त्या विहिरीचे तोंड हे शंखाकृती ठेवले जाते कि ज्यामुळे सूर्यप्रकाश आत पोचू शकत नाही. कोणताही डोंगर अथवा पर्वतीय भागात नैसर्गिकरित्या उंचावर एक सपाट भाग तयार झालेला असतो. की जो डोंगर विहीर तयार करण्यासाठी निवडला जातो. त्याच्या पुढे अजून उंच डोंगरांची रांग असल्याची खात्री केली जाते.. त्या डोंगर रांगेवरील पाणी चर खणून या विहिरीपर्यंत पोचवले जाते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये आणि पाण्यासह धूप झालेली माती विहिरीत जाऊ नये म्हणून सभोवताली असणार्या डोंगररांगावर झाडे लावून तो भाग हिरवीगार केला जातो. झाडे आणि गवत जमिनीची धूप होऊ देत नाही आणि फक्त पाणीच विहिरीपरेंत वाहात येते.

या पावसाच्या पाण्याने ती विहीर तुडुंब भरतेआता विहिरीचा परीघ अन खोली हि ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आहे तेथील दैनंदिन गरज लक्षात घेऊन सुमारे दीड वर्ष पाणी पुरवठा होऊ शकेल या पद्धतीने बनवली जाते.या विहिरीतील खाली तळाशी काही भाग हा डेड स्टोक म्हणून सोडला जातो कि ज्यामध्ये वाहून आलेल्या पाण्यातील गाळ साठून राहतो आणि फक्त स्वच्ह पाणीच पुढे प्रवाहित होऊ शकते. आता डोंगरापासून खंदकापर्यंत एक सरळ रेषा लक्षात घेऊन प्रत्येकी २०० फुट ( ६० मीटर ) अंतरावर खोल खड्डे ( विहिरीपर्यंत कमी परिघाच्या ) तयार केले जातात.आता मुख्य विहीर आणि या छोट्या रांगेतील विहिरी एक मेकांना जोडण्यासाठी आत एक बीळ तयार केले जाते. त्या बिळाच्या वरच्या भागात आर्च म्हणजेच मातीच्या भाजून तयार केलेल्या कमानी बसवल्या जातात. या कमानी मातीचा दाब सहन करतात आणि पाण्यात माती मिसळू देत नाहीत. परंतु पृष्ठभाग मात्र मातीचाच असतो त्यामुळे या बिळातून सुद्धा जमिनीत पाणी झिरपत राहते आणि जमिनीखालील पाण्याचा स्तर सुद्धा राखला जातो.

बाराबावडी

आता हि २०० फुटावर असणारी जी छोटी विहीर आहे तिच्या बरोबर खाली सुद्धा डेड स्टोक तयार करतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी २०० फुट अंतरावर पाण्यातील गाळ साठला जातो आणि पुढे अधिकाधिक शुद्ध पाणी प्रवाहित होत राहते.आता हि यंत्रणा खेड्यापर्यंत आली कि त्याचे मुख उघडले जाते. आता मुखाचे तोंड हे साधारण २४ तास पाणी वाहत राहील आणि एका दिवसाची गरज भागेल इतके मोठे असते त्यामुळे वर्षभर त्या खेड्याला पाणी पुरवठा होत राहतो. त्यामुळे तुम्ही खेडे वगळता इराण मध्ये फिरलात तर तुम्हाला वाळवंटच दिसणार पण खेड्यात मात्र वापरासाठी मुबलक पाणी आणि शेतीसाठीसूध्दा एवढच काय मस्त बागा आणि कारंजे सुद्धा. हि अफलातून पद्धत सुमारे ४०० -४५० वर्षापूर्वी सुरु झाली आणि त्या काळात बांधलेले क्यानोत अजून सुद्धा उत्तम काम करत आहेत. नवीन क्यानोत बनवण्याची इराण मध्ये गरज पडत नाही फक्त जे आहेत त्या क्यानोत ची देखभाल केली जाते. डोंगरातील पाणी सायफन च्या तत्वाने खेड्यात येते वर्षभर पुरते. वीज किंवा कशाची सुद्धा गरज नाही.

मलिक अंबर ने हेच तंत्रज्ञान वापरून औरंगाबाद मध्ये पाणीपुरवठा योजना अंमलात आणली. व पुढे त्या जुन्नर मध्ये बाजारपेठ व मार्ग म्हणून पाठविण्यात आले. त्याने जुन्नर शहरात बाराबावडीची संकल्पना अमलात आणली व जुन्नर शहरात बावन्न चावडी व बावन्न पेठांची निर्मिती करून मलिक अंबर पाणी पुरवठा योजना आमलात आणली. कि जीचा र्हास झालेला निदर्शनास येतो. मलिक अंबरने या बाराबावडीच्या विहीरीतुन पाणीपुरवठा योजनेस दगडी कोरीव शिल्पांचा केलेला वापर म्हणजे एक आश्चर्यच आहे.जवळपास तीस फूट खोल विहिरीत खडकाला तीन होल पाडून मध्ये दोन ते तीन फुट अंतर सोडुन पुन्हा एका दगडाला वरील बाजूस विटेच्या आकाराचे एवढे होल केले आहे. व त्याच दगडाला एकाखाली एक असे तीन होल केले आहेत. त्यानंतर तीसफूट खोल जमीनीखालुन सहा फुट उंच घडीव दगडात बांधीव पाईपलाईन उच्छ्वास काढून तयार केले व ती पाईपलाईन पुन्हा दुसर्‍या विहीरीत दगडी फिल्टर बसवून सोडले आहे कि ज्यायोगे पाणी शुद्धीकरण होऊन ते पुन्हा शहरातील दगडी पाईपलाईनला सोडले जाई. आपण बांधलेल्या धरणांसाठी ७०० कोटी सरकार खर्च करू शकते. पण या अभियांत्रिकी चमत्काराला जिवंत ठेवण्यासाठी आणि सतत पाणी मिळवण्यासाठी काही लाख रुपये दर वर्षी देखभाल दुरुस्तीला खर्च करू शकत नाही हे लज्जास्पद आहे.

बाराबावडी

जुन्नरला निर्जळी घडते व पावसाळ्यात सर्रास गढूळपाणी फिल्टर अभावी पीण्यासाठी नळांना येत असते. परंतु आज सुध्दा “क्यानोत” ४०० वर्षांच्या पूर्वी बांधलेली असून सुद्धा फुकटात काम करते. परंतु आज आपण बाराबावडी सारख्या अनमोल ठेव्याला नष्ट होताना पाहत बसलो आहोत. दुर्दैवाने सामान्य माणूस तर निसर्गापासून कायमचा तुटला आहे त्याला या अनमोल ठेव्याची काहीच किंमत राहीलेली नाही.या पद्धतीच्या यंत्रणा तुम्हाला भारतात सुद्धा इतर ठिकाणी बघायला मिळतील.औरंगाबादमध्ये, पाणीपुरवठा तुळजापूर ला मंदिरात जाताना गोमुखातून पडणारे पाणी, राजापूर ची प्रकट होणारी आणि गायब होणारी गंगा. लोणार च्या खार्या पाण्याच्या सरोवराजवळील मंदिरातील सतत वाहणारी गोड्या पाण्याची धार. हेच तंत्रज्ञान फक्त विहिरीपर्यंत तुम्हाला प्रत्येक लेणी मध्ये वापरलेले दिसेल. हेच तंत्रज्ञान तुम्हाला प्रत्येक किल्ल्यावर सुद्धा विहिरीच्या स्वरूपात वापरलेले दिसेल. त्याला टाके म्हणतात. वर्षभर फुकट मिळणारे पाणी.

पाउस पडताना साठवून ठेवायचे. किती साधे आणि सोपे निसर्गपूरक तंत्रज्ञान.परंतु आजच्या काळात आपण प्रगत झालो आहोत. आपण डोंगर फोडतो.. जंगले उध्वस्त करतो आणि पावसाचे पाणी वाहून जाऊ देतो. नंतर आपण डोंगराळ भागाला नोव्हेंबर ते जून टॅकर ने पाणी पुरवठा करतो. पैसे खर्च झाले तरी चालतील पण ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे करियर tanker ने पाणी पुरवठा होऊन घडणे अधिक महत्वाचे आहे.
हा लेख जलयुक्त शिवार या संकल्पनेकरीता खुपच महत्त्वाचा आहे कि ज्यायोगे आपणास थोडीफार मदत होईल.
मी येथे जुन्नर शहरातील बाराबावडी पाणीपुरवठा योजनेच्या पाणी शुद्धीकरणाच्या पध्दतीची काही छायाचित्रे देत आहे.

लेखक / छायाचित्र – श्री_खरमाळे_रमेश
(माजी सैनिक खोडद)
शिवाजी ट्रेल
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका
Leave a Comment