महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,685

भातवडीचे युद्ध | गनिमी काव्याचा श्रीगणेशा

By Discover Maharashtra Views: 1871 8 Min Read

भातवडीचे युद्ध | गनिमी काव्याचा श्रीगणेशा –

मराठयांच्या इतिहासाचा अभ्यास करताना, स्थित्यंतर होणाऱ्या राजकारणात बऱ्याच उलथापालथ होणाऱ्या बऱ्याचश्या लढाया दिसतात. दिल्लीदरबारी चर्चलेल्या प्रामुख्याने अशी कोणती लढाई आहे ज्यात हार किंवा जित पेक्षा ही मराठ्यांनी दाखवलेलं शौर्य जास्त उजवं ठरत? असा सवाल जर आज कोणी केला तर आपल्या कडून पानिपतच्या युद्धाची आठवण येते.(भातवडीचे युद्ध)

पानिपतचे युद्ध मराठे हरले असले तरी त्यांनी अहमद शाह अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली ज्याने मराठ्यांना हरवून देखील भारतात परत आलाच नाही किंवा वायव्येकडील एकही आक्रमक त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात अशीच एक  लढाई १६२४ साली लढली गेली. स्वराज्यचं स्वप्न खऱ्या अर्थाने सुरू झालं आणि शहाजी भोसले नावाचा एक तडफ़दार सरदार खऱ्या अर्थाने नावारुपाला आला आपल्या तलवारीच्या आणि मनगटाच्या जोरावर!!! कदाचित हीच होती गनिमी काव्याची सुरुवात आणि शहाजी राजेंच्या पराक्रमाची सुद्धा. पाहुयात काय आहे युद्ध आणि कसं वाढलं शहाजी राजेंच भारतीय राजकारणातील वजन?

इसवी सन १६२४ मध्ये मलिक अंबर याने आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. मुघलांनी आदिलशाहीला मदत करायचे वचन दिले, व मुघल – आदिलशाहीच्या संयुक्त फौजा अहमदनगरकडे कूच झाल्या. ही बातमी मिळताच मलिक अंबरने वेढा उठवला व तो अहमदनगर पासून सूमारे २० किमी वरील भातवडी येथे गेला. मुघल – आदिलशाहीच्या संयुक्त फौजेपुढे निजामशाही फौज अगदीच कमी होती. शिवाय शाहजीचा सासरा व मातबर सरदार लखुजी जाधवही निजामशाही सोडून मुघलांना मिळाला होता. मुघल – आदिलशाहीची संयुक्त फौज सुमारे ८०,००० होती. मलिक अंबराने निजामशाहीची फौज तयार केली. त्यात शाहजी, शरीफजी, विठोजीचे ८ मुलगे, हंबिरराव चव्हाण, मुधोजी नाईक निंबाळकर, विठोजी काटे, नृसिंहपंत पिंगळे आणि अनेक मराठा सरदार होते. या शिवाय मन्सूरखान, फत्तेखान असे काही मुस्लिम सरदारही होतेच, पण मुख्य भरणा होता तो मराठ्यांचा.

शहाजहानच्या दक्षिणेमध्ये स्वा-या झाल्या १६१७ ते १६२१ च्या दरम्यान. शहाजहानचे सैन्य तेथे निजामशाही व आदिलशाही राजवटींबरोबर लढत होते. त्याच कालावधीत निजामशाही सरदार मलिक अंबर याने त्याच्या मुत्सद्देगिरीच्या आणि चातुर्याच्या जोरावर कुतुबशहा व आदिलशहा आणि ठिकठिकाणच्या मराठा सरदारांना एकत्र केलं. कारण त्याला आता मोगल सैन्याशी टक्कर द्यायची होती. बऱ्हाणपूर आणि अहमदनगर या दोन शहरांच्या पलीकडे मोगल सत्ता पूर्ण नाहीशी झाली. मलिक अंबरने बऱ्हाणपूरला सुद्धा वेढा घातला. बऱ्हाणपूर ला वाचवण्यासाठी त्यावेळचा मोगल सुभेदार खान यास सहा महिने लागले.

जहांगीर बादशहाने शहाजहान यास पुन्हा दक्षिणेत पाठवले. जहांगीर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे नूरजहानच्या सल्याने चालला होता. ती स्वतःच राजकीय वजन दाखवण्यासाठी शहाजहानच्या विरुद्ध कारस्थाने करत असे. शहाजहानने त्याचा भाऊ खुसरू यास बऱ्हाणपूर बोलावून घेतले. इकडे मलिक अंबरने मोगल सैन्यास हैराण करायला सुरुवात केली आणि त्यांना कोंडीत पकडण्यासाठी अहमदनगर शहराला वेढा घालत तो पैठण पर्यंत पोहोचला. परंतु नंतर मोगलांपुढे इलाज चालेना म्हणून त्याने शरणागती पत्करली. पैठणहून शहाजहान परत बऱ्हाणपूर ला गेला व तेथे त्याने त्याचा भाऊ खुसरू याचा काटा काढला. नंतर तो दिल्लीस गेला.

मराठा सरदार मालोजीराजे व शहाजीराजे हे निजामशहाच्या बाजूने लढत होते. त्याच वेळी शहाजीराजांचे सासरे लखोजी जाधवराव यांचे संबंध बिघडले होते. त्या सुमारास खंडागळे हत्ती प्रकरण झाले. त्यात दत्ताजी जाधव व संभाजी भोसले ठार झाले. शहाजीराजांनाही जखमा झाल्या. शहाजहानबद्दल जहांगीर बादशहाचे मत अतिशय वाईट झाले. नूरजहान तर शहाजहानचा द्वेष करतच होती. तिने शहाजहानला पकडण्याचाही घाट घातला. शहाजहानचा पाठलाग फारच वाढल्यावर त्याने बापाकडे क्षमा मागून त्याची मुले दारा व औरंगजेब यांना ओलीस ठेवले व स्वतः नाशिक येथे मलिक अंबरच्या आश्रयास राहिला.

मलिक अंबरने मोगलांच्या गृहकलहाचा फायदा घेऊन त्याची युद्धनीती आखली. मोगलाईतील सेनापती महाबतखान शहाजहानच्या पाठलागासाठी दक्षिणेत आला. त्याला मलिक अंबर व आदिलशहा यांच्याकडून मदत हवी होती. आदिलशहाने मदत कबूल केली, कारण मलिक अंबर डोईजड होईल असे त्यास वाटले. उत्तरेकडून मोगल सैन्य मागवण्यात आले. आदिलशहाने त्याच्या बाजूस आणखी सरदार जमवले. इकडे, मलिक अंबरनेही गोवळकोंडा-विजापूरपर्यंत स्वारी करून पैसा जमवला आणि त्याने मोगलांना तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी केली. तो स्वतः भातवडी येथील गढीत जाऊन राहिला.

भातवडी च्या जवळचा तो भाग थोडा डोंगराळ असल्यामुळे गनिमी काव्यासाठी योग्य होता. तेथून मेहेकर नदी वाहते. जवळच विस्तीर्ण तलाव होता. शहाजीराजांच्‍या सैन्‍याने तो तलाव फोडूला व ज्या बाजूने मोगली सैन्य येणार होते तिकडील वाटांवर चिखल पसरून दिला. त्‍यामुळे विजापूरकर आणि मुघलांचे सैन्‍य अडचणीत आले. ऐन पावसाळा चालू होता. रसद मिळणे अवघड होते. शहाजीराजे आणि मलिक अंबर यांनी बाहेरच्या सगळ्या वाटा बंद केल्यामुळे धान्यपुरवठा बंद झाला. शत्रू सैन्याची उपासमार होऊ लागली. अनेक मोगल सरदार शहाजीराजे-मलिक अंबर गटास येऊन मिळाले.

शहाजी राजांनी मोगलांकडील भाडोत्री सैन्यास गनिमी काव्याने हैराण केले. सगळीकडे भीती निर्माण झाली. अशा वेळी मलिक अंबरने मोगली सैन्यावर एकदम हल्ला चढवण्याचे ठरवले आणि मोगली सैन्यास बेसावध अवस्थेत गाठून कापाकापी सुरू केली. काही सरदार मारले गेले तर, काही सरदार युद्धभूमीवरून पळून गेले. भातवडीच्या त्या संग्रामात शहाजीराजांचा मोठा सहभाग होता. त्‍या लढाईतील त्‍यांचे युद्धतंत्र आणि पराक्रम यामुळे त्‍यांचा दबदबा वाढला. नंतर शहाजी व शरीफजी, महाबलवान खेळोजी, मलिक अंबराचे प्रिय करणारे कृष्णमुखी यवन (सिद्दी), त्याचप्रमाणे हंबीरराव प्रभृती इतर पराक्रमी वीर यांनी हातात बाण, चक्रे, तलवारी, भाले, पट्टे घेऊन मोगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली. तेव्हा शहाजी आणि त्यांच्या सैन्याचा रुद्रावतार पाहून मोगल सैनिक भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी दाही दिशा पळू लागले.

निजामशाही मुळापासून नष्ट करण्यासाठी भारतभरातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. पण ते तितकेसे सोपे नव्हते, कारण निजामशाहीकडे शहाजी राजे आणि शरीफजी राजे हे भोसले घराण्यातील २ पराक्रमी योद्धे होते. तलवारी भिडल्या आणि निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे आणि शरीफजीराजे निजामाचा वजीर मलिक अंबरच्या साथीने भल्या मोठ्या शत्रू पक्षांच्या सेनेला कापत सुटले. अशक्य वाटणाऱ्या या युद्धात शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला, पण त्यांना आपले बंधू शरीफजी राजे यांना मात्र गमवावे लागले.

भातवडीचे युद्ध मुळे मालोजीराजे व शहाजीराजे या पितापुत्रांच्या पराक्र‘माचे दर्शन घडले. शहाजीराजांची प्रतिष्ठा, पराक्रम व मुत्सद्दीपणा या गोष्टी सिद्ध झाल्या. गनिमी काव्याची लढाई ही किती उपयुक्त आहे हे भातवडीच्या लढाईने सिद्ध केले. कदाचित हाच गनिमी काव्याचा श्रीगणेशा ठरला व पुढे मराठेशाहीत उपयोगी ठरला. पुढे मलिक अंबरास शहाजीराजांचा द्वेष वाटू लागला. त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहीत दाखल झाले. शहाजीराजांनी चार वर्षें शहाजहानशी जो सामना दिला तो फार महत्त्वाचा आहे. गनिमी काव्याने मोगलांशी लढल्यामुळे महाराष्ट्राचा डोंगराळ प्रदेश त्यांना माहीत झाला. शहाजीराजांनी त्यांच्या पाठीशी मावळ्यांची सेना उभी केली. निजामशाही बुडाल्यावर ते आपल्या साधनसंपत्तीसह परत आदिलशाहीत गेले. त्यांच्याएवढा मातब्बर सरदार दक्षिणेत नव्हता म्हणून आदिलशाहीत त्यांना त्याच सन्मानाने घेतले.

अर्थात या युद्दात मराठी राज्याचा थेट संबधच नाही पण ह्या लढाईचा परीणाम काही वेगळाच आहे,निजमाशाहीच्या मलिक अंबरने आदिलशाही आणी मुघलं या सत्तेला शह दिला. अहमदनगर येथुन पाच कोसावर इ.स. ३१ ऑक्टोबर १६२४ साली झालेल्या या युद्धाने मलिकंबरच नाव भारतीय राजकारणात खुप पक्क झालं,पण या युद्धात शरीफ भोसले मारले पण शहाजी भोसले नावाचा एक तडफ़दार सरदार खर्या अर्थाने नावारुपाला आला. पाहायला गेलं तर मराठेतर कोणत्याही लेखात शहाजीराजेंच नाव या लढाईत नाही,पण शिवभारतकार शहाजींच या लढाईत पराक्रम गाजवला म्हणुन वर्णन करतो जे योग्यच आहे, पुढे या युद्धामुळे शहाजीराजेंच राजकीय वजन नक्कीच वाढलं, त्यातूनच शहाजीराजें निजामशाही सोडुन आदिलशाहीत गेले,यातून शहाजींचा बोलाबाला व्हायला सुरुवात झाली, पुढे शहाजींनी मुर्तिजा निजामशाही स्थापुन, समर्थपणे चालवली, यातच मराठे राज्य चालवू शकतात हे सिद्ध झालं,थोडक्यात या युद्धाने शहाजींचा भारतीय राजकारणात उगम झाला,शहाजीराजे हे मातबर सरदार म्हणुन उदयाला आले,याचा परीणाम शिवाजी महाराजांच्या बालपणावर नक्कीच झाला असेल कदाचित स्वराज्याच्या देखण्या स्वप्नाचा हा श्रीगणेशा असावा.भातवडीचे युद्ध.

लेखन व माहिती संकलन – विजयश भोसले

Leave a Comment