महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,78,207

भातवडीची लढाई गनिमी काव्याचा जन्म

Views: 1902
9 Min Read

भातवडीची लढाई गनिमी काव्याचा जन्म –

गनिमी काव्याचे उद्गाते म्हणून शहाजीराजांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, त्याला कारणही तसेच आहे. 1624 साली ऑक्टोबर महिन्यात झालेली भातवडीची लढाई इतिहास प्रसिद्ध आहे. शहाजीराजांना गनिमी काव्याचे उद्गाते का म्हणतात त्याचा उलगडा या लढाईचा सगळा प्रसंग लक्षात घेतल्यावर निश्चित होईल. शहाजीराजे निजामशाहीत होते त्यावेळी निजामशाहीचा वजीर मलिक अंबर हा कारभार पाहत होता. दुसरा बुऱ्हान निजामशाहा हा सत्तेवर असताना निजामशाही बुडवण्याचा चंग मोगल बादशाह जहांगीर ने बांधलेला होता. जहांगीर आणि निजामशाही यामध्ये वजीर मलिक अंबर हा एखाद्या पर्वताप्रमाणे उभा होता. त्याला साथ होती शहाजीराजे शरीफजी राजे आणि त्यांच्या इतर चुलत भावांची.(भातवडीची लढाई गनिमी काव्याचा जन्म)

मलिक अंबर चे वय जरी 75 च्या पुढे असले तरी अनेक लढायांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता शिवाय त्यांच्यासोबत वेगवान असे शहाजीराजे, शरीफजी राजे यांचे घोडदळ होते.

निजामशाही बुडवण्यासाठी मोगल बादशाह जहांगीर ने लष्कर खान या सरदाराला 80 हजाराची विशाल फौज, 300 हत्तींचे सुसज्ज असे दल, प्रचंड तोफखाना, खजिना, मोठा लवाजमा सोबत दिला त्याच्या मदतीला बहादूर खान ,जलाल खान ,खंजीर खान हे सरदार महाबत खानाने बुऱ्हानपुरावरून पाठवले. शिवाय आदिलशहाकडूनही निजामशाही बुडवण्यासाठी मदत घेतली होती. निजामशाही बुडवून दोघात वाटून घेण्याचा तह झाला होता त्यांचा. आदिलशहाने मुल्ला मोहम्मद लारी या सेनापती कडे 20000 ची फौज देऊन त्याच्यासोबत रणादुल्ला खान, अंकुश खान, रुस्तुम जमान खैरात खान, फरहाद खान, अंबर खान असे नामवंत सरदार रवाना केले होते.

मोगल आणि आदिलशहा दोघांचे मिळून एक लाख सैन्य निजामशाही बुडवण्यासाठी निघाले होते. त्यामुळे निजामशाही पुढे चिंता होती बलाढ्य अशा एक लाख सैन्याचा सामना तोही निम्म्या सैन्यानिशी करण्याची. ऐन तारुण्यात असलेले, पंचवीशीच्या उंबरठ्यावर असलेले, तरुण तडफदार शहाजीराजे हा एक लाखाचा विशाल सेना सागर अंगावर घ्यायला तयारच होते, सोबत होता गनिमी कावा , मलिक अंबर सारखा अनुभवी सेनापती आणि वेगवान असे घोडदळ.

तिन्ही सेना आपापल्या पद्धतीने मार्ग क्रमन करत होत्या. लढाईत यश मिळवायचे असेल तर युद्धभूमी अशी निवडायची जी आपल्यासाठी अनुकूल आणि शत्रूसाठी प्रतिकूल असली पाहिजे. हा गनिमी काव्याचा महत्त्वाचा मंत्र शहाजीराजांनी हेरला आणि रणक्षेत्र निवडले, भातवडी. शत्रू सैन्य ( मोगल आणि आदिलशाही) सैन्य यांचा मिलाप कुठे होईल , त्यांचा आपल्याशी सामना कुठे होऊ शकतो याचे अचूक आडाखे बांधून भातवडी परिसरात असणाऱ्या मेहकर नदीकाठी असलेले मैदान, जे चहुबाजूने घनदाट जंगलाने वेढलेले होते, ते युद्धक्षेत्र म्हणून निवडण्यात आले. बाजूलाच एक नैसर्गिक रित्या तयार झालेले मोठे तळेही होते. सुदैवाने त्यावर्षी पावसाळा चांगला झाला असल्याने तळे तुडुंब भरलेले होते. नदीही वाहती होती.

शत्रु सैन्य लांब पल्याचा प्रवास करत दमून भागून त्या खुल्या मैदानात आले. शहाजीराजांनी मुद्दाम ते मैदान जणू त्यांच्यासाठीच मोकळे सोडून बाजूला उंचावर आपला डेरा टाकला होता. प्रथमदर्शनी ते मैदान छावणी टाकण्यास योग्यच वाटत असल्याने निजामशाही सैन्यालाही त्याच ठिकाणी आपली छावणी टाकावी असे वाटत होते. तसे असतानाही शहाजीराजे आणि मलिक अंबर यांनी मसलत करून आपली छावणी बाजूला उंचावरील जागेवर केली आणि शत्रू सैन्याला ते मैदान मुद्दाम खुले सोडले . शत्रू सैन्यालाही मार्गात अनेक छुपे हल्ले करून शहाजीराजांच्या घोडदळाने त्रस्त करून सोडलेच होते. अचानक छापा टाकून रसद तोडणे, ऐवज लांबवणे, जनावरे पळविणे, गाफिल असताना हल्ला करून जमेल तेवढे सैन्य मारणे आणि आले तसे जंगलात परागंधा होणे . या प्रकारे मोगल सैन्याला आधीच त्रस्त करून ठेवलेले होतेच.(भातवडीची लढाई)

दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होणार होती . आपल्या हेरांकडून शत्रूची रणनीती कशी असणार? शत्रू कोणत्या बाजूने कसा हल्ला करणार? याबद्दलची बारीक-सारीक माहिती शहाजीराजांनी आधीच मिळवली होती. शिवाय शरीफजी राजांनी शहाजी राजांशी आणि मलिक अंबरशी हुजत घालून आपले घोडदळ घेऊन नाराज होऊन लढाई सोडून जाण्याचे नाटकही केले होते . आपल्या सैन्यात ही पडलेली दुफळी, माजलेला बेबनाव याबाबतची खबर हेतू पुरस्कार रित्या शत्रू सेनेच्या छावणीत पोहोच होईल अशी व्यवस्था ही शहाजीराजांनी करून ठेवली. निजामशहाचे सैन्य आणि मराठी यांच्या दुफळी माजली हे ऐकून साहजिकच मुल्ला मोहम्मद लारी आणि लष्कर खानासह सगळे सैन्य खुश झाले आणि आनंदाच्या भरात उद्या निजामशाही बुडवण्याचे स्वप्न पहात दमले शिनलेले सैन्य झोपी गेले.

पहाटे पावसाची हलकी सर येऊन गेली . परंतु सकाळी जेव्हा मोगल आणि आदिलशाही सैन्याच्या डोळा उघडला तोच मुळात त्यांच्या नाकात तोंडात पाणी गेल्याने. दहा पंधरा हजार सैन्य पाण्यात बुडून मेले होते . पण त्याहीपेक्षा मोठी हानी म्हणजे तोफखान्याला लागणारा सगळा दारूगोळा जलमय झाला होता. तोफा असूनही त्यांचा आता काही उपयोग होणार नव्हता. शिवाय उंट जंबुरक्या सहित पाण्यामुळे परागंदा झाले होते. हत्ती, घोड्यांना लागणारा चंदी चारा पूर्णपणे भिजून, काही प्रमाणात वाहून गेला होता, सैन्यासाठी खायला लागणारा दाणा गोटा , अन्नधान्य पाण्यात बुडून गेले होते, भिजले होते, वाहून गेले होते. हे सर्व झाले कारण त्या रात्री भांडणाचे नाटक करून शहाजीराजांचे बंधू शरीफजी राजे यांनी उंचावर असलेले तळे खोऱ्या फावड्याच्या साह्याने रात्रीतून फोडून दिले होते. अनेकांना जलसमाधी मिळाली होती. त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न होता तो बिना अन्नाचे फक्त पाणी पिऊन, बिना तोफांच्या मदतीने लढायचे कसे ? अशातच निजामशाहीने आपल्या तोफांना बत्ती दिली, मोगली आदिलशाही सैन्याला भाजून काढायला सुरुवात केली. पळापळी, धांदल यात मोगल सैन्य आदिलशही सैन्य गांगारून गेले. कसेबसे लष्कर खान आणि मुल्ला मोहम्मद लारी ने सैन्य गोळा करून लढण्यास सज्ज केले .

परंतु शहाजीराजे शरीफजी राजे, सुधोजीराजे निंबाळकर, दत्ताजी नागनाथ, विठोजी काटे, नरसिंह पिंगळे, हंबीरराव चव्हाण, विठोजी भोसलेचे सात पुत्र खेळोजी, मालोजी , मुंबाजी, नागोजी, परसोजी, मकाजी आणि त्र्यंबकजी यांच्या वेगवान घोडदळासोबत नरसराज नरस , बल्लाळ त्रिपदे, सुंदर जगदेव याही सरदारांनी मोगली आदिलशाही सैन्यावर हल्ला केला या हल्ल्यात मुल्ला मोहम्मद लारी हा आदिलशाही सरदार मारला गेला. लष्कर खानाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे इतर सरदारही कैद झाले शिवाय त्यांची ज्या हत्ती दलावर भिस्त होती ते महाकाय असे तीनशे हत्तींचे दल मनचहर या सरदाराच्या नेतृत्वाखाली लढत होते. हत्तींचा ढाली सारखा वापर करून त्यांच्या आडोशाने मोगल सैनिक बाणांचा वर्षाव करत होते.एकेक हत्ती पन्नास पन्नास सैनिकांना ढाली सारखे कवच देत असल्याने जवळपास पंधरा हजार सैन्य कडवा प्रतिकार करत असल्याचे लक्षात आल्यावर, जोपर्यंत हत्ती दल परास्त करत नाही , तोपर्यंत निर्विवाद विजय आपला नाही. हे जाणून शहाजीराजांनी शरीफजी राजे, हंबीरराव चव्हाण, खेळोजी राजे यांना आपल्या घोडदळासह हत्ती दलावर आक्रमण करण्याचा हुकूम दिला, त्याप्रमाणे शरीफजी राजे बाण चालवण्यात पटाईत असल्याने त्यांनी अत्यंत चपळतेने अनेक माहुतांना बाणांनी टिपायला सुरुवात केली आणि हत्ती दल विस्कळीत केले. परंतु मनचहर या सरदाराबरोबर लढताना त्यांना बाण लागला आणि तेथे त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. उरलेले काम हंबीरराव चव्हाण आणि खेळोजी राजे यांनी केले. हत्ती दलावर निर्विवाद विजय मिळवला.

अशा प्रकारे शहाजीराजांनी योग्य युद्धनीती, वेळीच बदललेली रणनीती, गनिमी काव्याच्या जोरावर मोगल आणि आदिलशाही यांच्या संयुक्त एक लाख सैन्यावर विजय मिळवला.

नंतर फतेच्या दरबारात शहाजीराजांनी केलेल्या पराक्रमाचे कौतुक करण्याऐवजी खेलोजीराजांचे कौतुक करण्यात आले आणि भोसले कुटुंबीयात फूट पाडण्यात निजामशाही यशस्वी झाली . म्हणून शहाजीराजांनी नंतर आदिलशहाच्या पदरी सरलष्कर म्हणून चाकरी स्वीकारली. हा नंतरचा भाग झाला.

परंतु भातवडीच्या या लढाईत शहाजीराजांनी गनिमी काव्याचे कोणकोणते डावपेच आखले ते पाहू.भातवडीची लढाई.

1) आपल्याला अनुकूल आणि शत्रूला प्रतिकूल अशा रणक्षेत्राची निवड केली.
2) शत्रूला प्रवासात छोटे-मोठे हल्ले करून त्रस्त करून रसत तोडली.
3) शत्रू सैन्याची रणनीती हेरानमार्फत जाणून घेतली.
4) आपल्या सैन्यात दुपारी माजली आहे अशी खोटी खबर शत्रूंपर्यंत पोहोचून त्यांना गाफील ठेवले.
5) शत्रू झोपेत असताना तळे फोडून शत्रू सैन्याचा दारू गोळा अन्नधान्य संधीचारा नष्ट केला यासाठी निसर्गाचा वापर हत्याराप्रमाणे केला.
6) वेगवान घोडदळाचा वापर करून अतिशय वेगवान हालचाली केल्या.
7) शत्रूचा सेनापतीच ठार करून त्यांच्या सैन्याचे मनोबल खच्ची केले.
8) ऐनवेळी निर्णय घेऊन शत्रू सैन्याचे बलस्थान ओळखून त्यावर घाव घातला हत्तीदळ विस्कळीत केले.

अशाप्रकारे वेगवेगळे डावपेच आखून एका मोठ्या सैन्याचा मोठा पराभव केला आणि गनिमी कावा या तंत्राला विकसित केले. जे तंत्र पुढे चालून छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मसात केले आणि त्याच्याच जोरावर मोगल, आदिलशहा, कुतुबशाह, सिद्धी, पोर्तुगीज , इंग्रज यांच्यावर वचक बसविला

अशाच प्रकारचे गनिमी काव्याचे तंत्र पुढील लढाईमध्ये पाहूया. तोपर्यंत जय शिवराय

संदर्भ
मालोजी राजे आणि शहाजी राजे – वा सी बेंद्रे.
बहुजनांचा राजा राजे शहाजी- प्रभाकर बागुल.
श्रीमान योगी -रणजीत देसाई.
सभासद कृत शिवचरित्र.

लेखन – सचिन पवार.

Leave a Comment