बुराडी घाटाची लढाई | दि. १० जानेवारी १७६० –
दत्ताजी शिंदे – मराठी साम्राज्याच्या इतिहासातले ईश्वरदत्त सेनानी किंवा ईश्वराचे शिपाईगडी. मराठी सत्तेचा उत्तरेतला हा दुसरा बुरुज. शुक्रतालच्या आडकल्यामुळे नजीबाचे षडयंत्र दत्ताजींना समजले नाही पण जेव्हा समजले तेव्हा वेळ निघून गेली होती. या ईश्वरदत्त सेनानीच्या आयुष्यातल्या शेवटच्या लढाईचा म्हणजे बुराडी घाटाच्या लढाईचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.(बुराडी घाटाची लढाई)
१७५९ च्या ऑगस्ट महिन्यात जहानखान लाहोरावर वर चाल करून आला. मराठ्यांनी अटक ताब्यात घेतल्यापासून अब्दाली अस्वस्थ झाला होता. त्याचा पुतण्या अब्दर्रहमान पेशावरास आला , त्याला अब्दालीने काढून त्याच्या जागी जहानखानाला पाठवले व स्वतः मागे पाठपुरावा करण्यासाठी राहिला. जहानखानाला साबाजी शिंद्यांनी चांगला दणका दिला. या लढाईत त्याला भरपूर जखमा झाल्या. जहानखानाचा मुलगा व सुमारे दोन हजार फौज मारली गेली. यानंतर ऑक्टोबर महिन्यात स्वतः अब्दाली चाल करून आला. यावेळी मात्र साबाजींचा निभाव लागला नाही. शुक्रतालवरुन नजीबाची वर्दळ चालू होती ती वेगळीच. मराठे मार खाऊन मागे दत्ताजींच्या आश्रयास आले.
दि. ०८ नोव्हेंबर १७५९ या दिवशी पंजाबातून आलेले साबाजी आणि दत्ताजी यांची भेट झाली. अब्दाली येतोय ही बातमी नजीबाला माहिती होती आणि त्यामुळे तो दमाने लढत होता. याऊलट दत्ताजी नजीब व अब्दाली या दोघांच्या मध्ये अडकले होते. दि. ०७ डिसेंबर रोजीचे गोविंदपंत बुंदेले यांचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात ते लिहितात ” साबाजी शिंदे येथे दाखल झाले , दिल्ली उजाड जाहली. मल्हारबाकडे सांडणीस्वार व कासीद गेले आहे. सर्व हिंदुस्थान गडबडले आहे. पातशहा व वजीर येथे येतात. त्यांचे काबिले आग्र्यास गेले आहे. मार्गी दंगा , माणूस निभवत नाही “.
मुकुंदबारीवरुन ६ डिसेंबरला मल्हाररावांनी हिंगणे यांना पत्र लिहिले आहे ते असे ” माधोसिंहाने बदफैली आरंभीली त्याचे पारिपत्यास जात असो. ”
जानेवारीत पुण्याहून निघालेले होळकर डिसेंबरात मुकुंबारीवर पंजाबच्या बातम्या खुशाल ऐकतात याला काय म्हणावे ( म.रि.)
शुक्रतालवर दत्ताजी आडकल्यामुळे पंजाबात साबाजी एकटे पडले आणि अब्दालीचा जोर वाढला. आपला निभाव लागणे शक्य नाही असे समजताच साबाजी लाहोराहुन मागे फिरले , पंजाबात मराठ्यांच्या बऱ्याच फौजा ठिकठिकाणी होत्या त्यातल्या काही पळाल्या तर काही कापल्या गेल्या. यानंतर लाहोर येथे तैमुरशहाच्या नावाचा खुत्बा पढला , त्याच्या नावाची द्वाही फिरली आणि त्याच्या नावाची नाणी पडली. या पद्धतीने पंजाबचे राज्य तैमुरशहाच्या नावे झाले.
या सर्व गोष्टी घडत असताना एक नवीन गोष्ट घडली ती म्हणजे १७५९ च्या मार्च महिन्यात सुजा व अलिगौहर यांनी पाटण्यावर स्वारी केली त्यावेळी फ्रेंच सेनापती जीन लॉ हा त्यांच्या मदतीला धावून आला. पण पाटण्याचा कारभारी असलेला रामनारायण याने रॉबर्ट क्लाईव्हची मदत घेऊन या वर्गाला पळवून लावले. काशी , प्रयाग ही तिर्थक्षेत्र ताब्यात घेण्यास मराठे जितके उत्सुक होते तितकाच सुजा हा नाखुश होता. शेवटी मुसलमानी सत्ता संपल्याची ती एक प्रकारे खूनच होती. नानासाहेबांनी दत्ताजीबांना बंगालमध्ये पाठवायला हे एक कारण होते.
१७५९ मध्ये मराठी अंमल दिल्लीत कायम होणार अशी वेळ होती. लाहोर वरुन दत्ताजी परत आल्यानंतर नजीबाने गंगेवर पुल बांधतो अशी थाप देऊन सरळ अब्दालीस पाचारण केले. गंगा नदी हरिद्वारहुन दक्षिणेस वाहते तिथून साठ मैलांवर मिरापुर नावाचे गाव आहे त्या गावाजवळ पालखीच्या दांडीसारखे नदीला मोठे वाकण आहे आणि वाकणाजवळ शुक्रताल हे गाव आहे. कुंजपुऱ्याजवळून यमूना उतरून दत्ताची गडमुक्तेश्वर येथे आले. ‘ शिंदे जितके दाणशुर तितकेच रणशुर , ईश्वरे अनुकूल दिले तसे दानधर्म केले ‘ ( मराठी रियासत ) याच सुमारास पावसाळा सुरू झाल्याने पुल तयार होऊ शकत नाही असे नजीबाने कळवले. यावेळी दत्ताजींनी ‘ तुम्ही आम्हांस सामील व्हावे ‘ असे नजीबाला कळवले तर याला नजीबाने याला साफ नकार दिला. नजीब पुलाचा वापार स्वतःच्या फायद्यासाठी करतो आहे हे कपट दत्ताजींना समजले आणि जुलैत शुक्रताल येथे आले. तेथे जवळच हस्तीनापुर नावाचे गाव आहे तिथे शुक्राचार्यांनी परिक्षीताला भागवत कथा ऐकवली आणि म्हणून शुक्रताल नाव पडले अशा दंतकथा आहे.
अब्दालीने निघण्यापूर्वी काबुलहुन बादशहास , नजीबास , माधोसिंग-बिजेसिंग या रजपूत राजांस पत्र पाठवले ” आम्ही जहानखान सरदार पुढे रवाना केला आहे , मागोमाग आम्ही येत आहोत , हिंदुस्तानचे सलतनीचा नजराना सालबसाल पोहचवणे ऊजूर करील त्यांस समजून घेऊ ”
मुलतानच्या बंदोबस्तासाठी त्र्यंबक बापुजी सहा हजार सैन्यानिशी तैनात होते पण अब्दालीचा जोर पाहून ते मागे फिरले आणि सरहिंदला आले. दुआबातील गवारांनी त्यास नागवले त्यांच्यातील ५०० माणसे २३ नोव्हेंबरला दत्ताजींना येऊन मिळाली. या गटांत अशा प्रकारे मोठी तेढ निर्माण झाली. अब्दाली येतोय हे ऐकून दिल्ली घाबरली. मराठ्यांचा द्वेष करणारी मंडळी जसे मल्लिका ए जमानी वैगरे लोक स्वरक्षाकरीता अब्दालीला जाऊन मिळाली. वास्तविक पाहता अब्दालीला दिल्लीच्या राजकारणात कवडीचाही रस नव्हता पण नजीबाच्या उठावणीने प्रकरण चिघळले आणि अब्दालीला पंजाबातून पुढे येणे भाग पडले. २७ नोव्हेंबर रोजी तो सरहिंदला येऊन पोहोचला. ही बातमी गाझिउद्दीनला समजली आणि तो घाबरला. यावेळी एक वाईट घटना घडली.
दि. २९ नोव्हेंबर १७५९ रोजी वजीर गाझिउद्दीनच्या काही हस्तकांनी साधूच्या दर्शनाच्या निमित्ताने बादशहा , पुर्वीचा वजीर इंतजामउद्दौला व आणखी दोघांना वाड्याच्या बाहेर आणून चौघांचा शिरच्छेद केला आणि कामबक्षचा नातू मुहि उल मिलात याला शहाजान सानी हे नाव देऊन गादीवर बसवले. आणि निमित्त ठेवले की नजीबाची आणि बादशहाची , अब्दालीला हिंदुस्थानात येण्याविषयीची पत्रे वजीराच्या हाती लागली. मराठ्यांनी भलेही बादशहाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली असली तरी प्रत्यक्षात वजीरच असे काही करेल याची कोणी कल्पनाही केली नसेल. बादशहा मारला या खबरीने सगळीकडे खळबळ माजली. ” मराठे दुआबात आहे आणि त्यांनी नजीबाला घेरले आहे ” ही बातमी अब्दालीला समजली. तो सरळ पुढे न येता उत्तरेतुन आपण आणि दुआबातुन नजीब अशा कात्रीत दत्ताजींना पकडण्याची योजना सुरू झाली. पंजाबावर आपला ताबा कायम करण्याची संधी पुन्हा मिळणार नाही हे अब्दाली जाणून होता. तो सरळ शुक्रतालवरच चाल करून गेला.
११ डिसेंबर रोजी दत्ताजी अब्दालीवर चाल करून गेले आणि मागुन लगेच रोहिले आले. ही बातमी मल्हाररावांना समजली तरी ते गेले नाही. मल्हारावांना बोलवण्यासाठी दत्ताजींनी धावते स्वार पाठवले. दत्ताजींकडे सुमारे २५ हजार फौज होती. कुंजपुऱ्याजवळच्या अंधेरा घाटावरून दत्ताजींनी १८ डिसेंबर रोजी यमुना ओलांडली. तेव्हा त्यांना समजले की तैमुरशहा ४० हजार फौज घेऊन आंबाल्याजवळ आला आहे आणि मागून अब्दालीसुद्धा येतो आहे. २० डिसेंबर रोजी या दोन्ही फौजांची चकमक झाली. २१ डिसेंबरला गोविंदपंत बुंदेले लिहितात ” आम्ही यमुनापार झालो. अब्दाली कुरुक्षेत्राहुन पंधरा कोसांवर आहे. दत्ताजी सडी फौज घेऊन त्यावर चाल करून गेले. जनकोजी , गाझिउद्दीन व आम्ही मागे दिल्लीत राहिलो. अब्दाली न रेटे तो आम्ही रुपराम कटारे बुनगे चमेल पार करु ”
जुलै १७५९ सालचे एक पत्र उपलब्ध आहे ते असे “…..शाहजादा मोहम्मद अलिगौहर बादशाही मर्जीविरुद्ध अजिमाबादेस येणार असल्याचे आपणास समजले असेलच. त्यास बिहारच्या सुभ्यावरुन दूर करून मुहम्मद हिदायद बक्ष यास सुभेदारी दिली. तसेच खाशांनी पत्र पाठवले आहे की अलिगोहर मुर्खपणाच्या हेतूने तिकडे गेला आहे. आता त्याकडे सुभेदारी राहिली नसल्याने त्यास आडवावे लागेल आणि दस्तगीर करुन हुजुरांकडे पाठवावे लागेल ” यावरून अलिगोहर याला कैद करण्याची राजकारणं चालू होती हे या पत्रावरून समजते.
गाझिउद्दीन नव्या बादशहाला म्हणजे शहाजान सानीला घेऊन दत्ताजींच्या छावणीत आला होता. शुक्रताल येथे दत्ताजी असताना नजीबाचा वकील चिताराम येऊन त्याने दत्ताजीस दांडगाईचे उत्तर सांगितले यानंतर पुढचे तीन-चार महिने मराठे आणि रोहिले यांची चकमक चालू राहिले. दोन्ही पक्षांनी पराक्रमाची शिकस्त केली. शुक्रतालच्या गढीत भाद्रपद मासापर्यंत गोळागोळी होत गेली. एक दिवस रोहिले अचानक चाल करून आले. त्यामुळे दत्ताजी आवेशात चाल करून गेले. यात जनकोजी शिंद्यांची काही घोडी ठार झाली. दत्ताजींनी भाल्याची जखम झाली. शिंद्यांचे खासे साडेशहाशे मनुष्य कामी आले. बाराशे घोडी ठार झाली. दोन अडीच हजार जखमी झाली. एक सरदार जिवाजी शिंदे व त्यांचा मुलगा हणमंतराव ठार झाले. पण नजीबास चैन पडु दिला नाही. तोपर्यंत दसरा आला.
२४ डिसेंबरला रात्री अब्दाली यमुना उतरून अंतर्वेदीत उतरला तेव्हा सहानपुराजवळ त्याला नजीब येऊन मिळाला व दोचेही पुर्वेच्या काठाने दिल्लीकडे निघाले. नजीबाला सर्व रस्त्यांची माहिती होती आणि त्यामुळे अब्दालीला कोणताही अडचण झाली नाही. अब्दाली दिल्लीवर कब्जा करेल म्हणून दत्ताजी २८ डिसेंबर रोजी मागे फिरुन दिल्लीकडे निघाले. वाटेत सोनपताजवळ पाच दिवस मुक्काम करून पुढील सारी तजवीज केली. हाफिज रेहमत खान , दुंदेखान , अहमदखान बंगश हे सर्व जण अब्दालीला येऊन मिळाले. त्यांचा तळ यमुनेच्या काठावर दिल्लीच्या उत्तरेस सहा मैल दुर लुनी येथे पडला. यामुळे दत्ताजींनी आपला तळ सोनपताच्या दक्षिणेस दिल्लीच्या दहा मैल दूर बरारी ( बुरारी ) घाट म्हणून नदी उतरण्याचा मार्ग होता तेथे ठोकला.
६ जानेवारीला दत्ताजींनी सर्व सामान , बाजार-बुंडगे वैगरे रेवाडी जवळ पाठवून दिले. जनकोजींना होळकर येईपर्यंत मागे पाठपुरावा करण्यासाठी थांबवले. अब्दाली कधी नदी उतरून येईल हे ठाऊक नव्हते. त्यामुळे जवळपासचे सर्व उतार दत्ताजींनी रोखून धरले. बुरारी घाटावर साबाजी शिंदे ७०० सैन्यासह तैनात होते. अशातच पोष मासाचा हिवाळा आला. यावेळी नदीला फारसे पाणी नसते. गाझिउद्दीन दत्ताजींच्या छावणीत होता आणि घाबरला होता. त्यास दत्ताजींनी धीर दिला.
आणि पौष वद्य अष्टमी , शके १६८१ , म्हणजे गुरुवार दि. १० जानेवारी १७६० रोजी सकाळी दहाच्या सुमारास नजीब आपले पायदळ घेऊन साबाजींवर चाल करून आला. रोहिल्यांच्या हातात लहान बंदुका होत्या तर मागून आलेल्या दुर्राण्यांकडे गोळीबार करण्याचे लहान जंबुरे होते. मराठ्यांकडे फक्त भाले आणि तलवारी होत्या आणि घोड्याच्या हालचालीस तर काही वावच नव्हता. बंदुकींपुढे तलवारीचा वाव लागला नाही आणि साबाजींची माणसे पटापट पडू लागली. हे दत्ताजींना समजताच दत्ताजी पुढे धावून गेले. त्यांचा आवेश इतका होता की त्यांनी सर्व रोहिल्यांना नदीच्या दुसऱ्या काठाला हाकलवून दिले आणि या गडबडीत प्रेतांच्या अक्षरशः राशी पडल्या.
दत्ताजी आघाडीवर होते. आणि यशवंतराव जगदाळेंना गोळी लागली ते खाली पडले. त्यांचे प्रेत घेण्यासाठी दत्ताजी पुढे सरसावले आणि त्यांच्याही उजव्या बरगडीत गोळी लागली. दत्ताजींचा ठेंगू बांधा आणि कृष्णवर्ण नजीबाने लगेच ओळखला. रोहिल्यांनी मराठ्यांवर गोळ्यांचा मारा सुरू केला. नजीब व कुत्बशहा पुढे आले त्यांनी दत्ताजींचे शीर कापले व अब्दालीला नजर केले. राजाराम चोपराने दत्ताजींचे शव आणून यमुनेकाठी अग्नीसात केले. जनकोजींना ही बातमी समजली. ते लगेच काकांच्या मदतीला धावून गेले. पण तोफांपुढे त्यांचाही निभाव लागेना. तरी ते पुढे गेले. त्यांच्याही हाडास गोळी लागली. येसाजी भोईटे यांनी त्यांना उचलून मागे आणले. दत्ताजी पडल्यामुळे सर्वत्र पळापळ झाली. सर्व सामान अधीच पुढे गेल्यामुळे त्याचा पाठलाग होऊ शकला नाही.
गाझिउद्दीन घाबरून भरतपुरास निघून गेला. या प्रसंगाचे वर्णन खुद्द जनकोजी शिंदे करतात ते असे ” तीर्थरूप काका बाबा यांस लढाईत गोळ्या लागोन राहिले. आम्हासही उजवे दांडेवरीती गोळी लागली. त्या उपर बुनग्यात येऊन सर्व बुनगे सांभाळून कोट पुतळी प्रांत जयपूर येथे आलो. मल्हाजीबाही फौजेसह वर्तमान आले “.
दत्ताजी पडल्याची बातमी १५ फेब्रुवारीला नानासाहेब पेशव्यांना अहमदनगर मुक्कामी समजली.
१० जानेवारीला दत्ताजी पडले , दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ जानेवारीला उदगीरच्या मैदानात मराठे आणि निजाम एकमेकांसमोर उभे ठाकले.
पानिपताच्या रणयज्ञाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती…….
संदर्भ –
१) मराठी रियासत – गो.स.सरदेसाई ( थोरले नानासाहेब )
२) मराठी रियासत – गो.स.सरदेसाई ( पानिपत प्रकरण )
३) ऐतिहासिक फारसी साहित्य खंड – ४ , लेखांक ३४
४) पेशवाई – कौस्तुभ कस्तुरे
५) मराठ्यांचे साम्राज्य – रा.वि.ओतुरकर
६) मेस्तक शकावली – काव्यतेहास संग्रह , पत्र , यादी वैगरे
७) शिंदेशाही इतिहासाची साधने
८) मराठ्यांच्या इतिहासाची साधने – खंड १
९) Solstice at Panipat – Uday kulkarni
१०) पानिपत व्याख्यान – निनाद बेडेकर
श्रीमंत सरदार दत्ताजी शिंदे – फोटो स्त्रोत – गुगल