कांचन बारीची लढाई –
१७ ऑक्टोबर १६७० इतिहास प्रसिद्ध वनी- दिंडोरी किंवा कांचन बारीची लढाई. याच लढाईत मराठ्यांनी मोगलांवर जनु आग ओकली होती.
शिवाजी महाराजांनी सुरतेची दुसरी लुट मारली २ ऑक्टोबर १६७० ते ५ ऑक्टोबर १६७० पर्यंत. शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह लुट घेऊन ५ ऑक्टोबर १५७० ला दुपारी सुरतेहून बाहेर पडले. सुरतेहून महाराज पेठ बागलाण मार्गे साल्हेर किल्ल्याकडे निघाले. हि वार्ता शहजादा मुअज्जम ला समजली. त्याने दाऊदखानाला महाराजांवर पाठवले.
दाऊखानासोबत राव भाऊसिह हाडा,मीर अब्दुल माबूद, इख्लासखान मियाना, राय मकरंद खत्री, गलिबखान, नारोजी, बसवंतराव, शेख सफी, संग्रामखान घोरी, मान पुरोहित इत्यादी सरदार होते. सोबत तोफखाना, हत्ती, उंट व पुष्कळ सैन्यही सोबत होते, ‘तारिखे दिल्कुशा’चा कर्ता भीमसेन सक्सेना हाही या मोहिमेत दाऊदखानासोबत होता. दाऊखानाचा तळ वैजापूर येथे पडला. तेथे हेरांनी बातमी आणली की, महाराज सुरतेहून निघून मुल्हेरपर्यंत आले व मुल्हेर उर्फ साल्हेर येथील पेठ त्यांनी लुटली, मोगली किलेदार नेकनामखान मुल्हेरच्या किल्ल्यात दडून बसला होता. पण मुल्हेरलाच महाराजांच्या हेरांनी बातमी आणली की, ‘मोगली सैन्य त्यांच्यावर चालून आलेले आहे. त्यामुळे मुल्हेरचा वेढा उठवून महाराज तातडीने पुढे निघाले. नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या पश्चिमेस १० मैलांवर असलेला कंचन मंचनचा घाट उतरून मोगली सैन्य तेथे पोहोचण्यापूर्वीच निसटून जाण्याचा महाराजांचा विचार होता. पण महाराजांच्या हालचाली दाऊदखानाला हेरांकरवी पक्क्या कळत होत्या. त्यामुळे महाराजांना गाठण्यासाठी तो तातडीने चांदवडला जाण्यासाठी निघाला.
सायंकाळी मोगली सैन्य चांदवडला पोहोचले. महाराजांच्या भयाने चांदवडचा फौजदार बागीखान किल्ल्यात दडून बसला होता. तो आता दाऊदखानाला भेटण्यासाठी त्याच्या छावणीत आला. महाराजांच्या हालचालींची निश्चित खबर अजून न मिळाल्याने दाऊदखान चांदवडलाच तळ ठोकून बसला. मध्यरात्री सुमारे बारा वाजता दाऊदखानाला खबर मिळाली की, कंचन मंचनचा घाट पार करून महाराज त्वरेने गुल्शनाबाद (म्हणजे नाशिक) च्या वाटेला लागले आहेत. त्यांचे काही सैन्य घाटमाथ्यावर जमलेले असून ते मागाहून येत असलेल्या आपल्या उर्वरित सैन्याची वाट पाहात उभे आहे. हे वृत्त कळताच दाऊदखान तडक स्वार झाला. तो एवढा उतावीळ झालेला होता की, त्याच्यासोबत असलेले स्वार त्याच्या मागोमाग जाऊही शकले नाहीत. ही शके १५९२ ची रात्र कार्तिक शुद्ध त्रयोदशीची होती. रात्र सरताना अंधार झाला त्यामुळे दाऊदखानाचे सैनिक वाट चुकले. नाइलाजास्तव त्यांना सूर्योदयापर्यंत थांबावे लागले. दाऊदखानाने आपल्याला गाठल्याचे महाराजांच्या लक्षात आले. ताबडतोब मराठी सैन्य युद्धार्थ सज्ज झाले.
सूर्योदय झाला. मोगली सैन्य घाटमाथा चढू लागले. इखलासखान मियाना आघाडीवर होता. तो घाटमाथ्यावर पोहोचला आणि समोर पाहतो तो मराठे युद्धाचा पवित्रा घेऊन शस्त्रे परजीत उभे असलेले त्याला दिसले. इखलासखानाने फारसा विचार न करता बेधडक मराठ्यांवर चाल केली. त्याचे अनेक सैनिक अजून घाटमाव्यावर पोहोचायचेच होते. अशा परिस्थितीतच घनघोर युद्धाला तोंड फुटले, आणि पहिल्याच तडाख्यात इखलासखान जबर जखमी होऊन जमिनीवर कोसळला.” एवढ्यात दाऊदखान तिथे पोहोचला. त्याने ताबडतोब राय मकरंद खत्री, शेख सफी, मान पुरोहीत, संग्रामखान घोरी यांना इखलासखानाच्या मदतीस पाठविले. विलक्षण त्वेषाने हे सर्व सरदार मराठ्यांवर तुटून पडले. पण मराठ्यांचा जोर जबरदस्त होता. तुंबळ रण माजले. संग्रामखान घोरीही त्याच्या मुलांसह व अन्यः आप्तांसह जबर घायाळ झाला. मोगलांचे अनेक शाही सैनिक व नामवंत सरदारही ठार झाले.
मराठ्यांचा प्रचंड जोर पाहून त्यांना मागे रेटण्यासाठी अखेर राय मकरंद व मान पुरोहित यांनी तोफा डागायला सुरुवात केली. तोफांचा मारा सुरू झालेला पाहून मराठे थोडे माघारी हटले. तेवढ्यात दाऊदखानाने जखमी इख्लासखानास उचलले व तो मराठ्यांशी लटू लागला. चवताळलेले मराठे पुन्हा चारही दिशांनी मोगलांना घेरून त्यांची लांडगेतोड करू लागले. मोगली तोफा डागल्या जात होत्या. पण मराठे त्यांची तमा बाळगीत नव्हते. तोफांच्या माऱ्यामुळे पन्नास मराठे ठार झाले. १००० पेक्षा ही जास्त सैन्य मोगलांचे मराठ्यांनी ठार केले होते. मीर अब्दुल माबूदची, घाटमाथ्यावरील चढ-उतारांमुळे मुख्य सैन्यापासून ताटातूट झाली. त्यामुळे आपल्या पुत्रांसह व थोड्या सैनिकांसह त्याने एका गुहेचा आश्रय घेतला. मराठ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले तेव्हा त्यांनी गुहेवर हल्ला चढविला. मीर अब्दुल, त्याचा एक मुलगा व काही सैनिक जबरदस्त जखमी झाले. मीर अब्दुल तर बेशुद्धच पडला. त्याचा एक पुत्र मराठ्यांनी ठार केला. त्याचे काही सैनिकही मारले गेले. मीर अब्दुलची शत्रे, घोडे व झेंडा हिसकावून मराठे निघून गेले. दाऊदखानावर प्रचंड विजय मिळवून महाराज पुढे निघाले.
सभासद बखरीत या युद्धाचे केलेले वर्णन काहीसे अतिशयोक्त असले तरी लक्षणीय आहे. सभासद लिहितो, राजा खासा घोड्यावर बसून, बख्तर घुगी घालून, हाती पटे चढवून मालमत्ता, घोडी, पाईचे लोक पुढे रवाना करून आपण दहा हजार स्वारांनिशी सडे सडे राऊत उमे राहिले, बणी-दिंडोरी म्हणवून शहर आहे ते जागा उभे राहून सुभ्याचे लोक आले त्याशी घोरांदर युद्ध केले… राजियांनी आपली फौज पुढे करून पाठीवर आपण खासा राहून झगडा दिला. प्रतापराव सरनीमत व व्यंकोजी दत्तो व आनंदराव वरकड सरदार पुढे होऊन मोठी कत्तल केली. आणि मोगल मारून मुरखे पाहिले, दोन प्रहर युद्ध जाले, मराठे यांणी शर्त केली. तीन हजार मोगल मारिले, तीन चार हजार घोडे पाडाव केले. दोन बजीर मोगलाई सापडले, असे फत्ते करून आले. मराठ्यांनी एक हत्ती पाडाव करून आणल्याचे जेधे शकावलीत नोंदलेले आहे. इतिहासात वणी-दिंडोरीची म्हणून प्रसिद्ध असलेली, पण प्रत्यक्षात कंचन – मंचन घाटमाथ्यावर झालेली ही लढाई शके १५९२, साधारण नाम संवत्सरा कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे सोमवार दि. १७ ऑक्टोबर १६७० रोजी झाली. या सर्व लुटिसह शिवाजी महाराज कुंजरगडावर येऊन पोहचले.
संदर्भ:-
शककर्ते शिवराय खंड २
सभासद बखर,
जेधे शकावली,
मोगल व मराठे
संकलन:- दुर्गवेडा कृष्णा घाडगे (un_viral_history)