खर्ड्याची लढाई | Battle of Kharda
खर्ड्याची लढाई ही पेशवे व हैदराबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी-मार्च, इ.स. १७९५ साली भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे झालेली एक लढाई होती. या लढाईत मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला.
महादजी शिंदेचा वारस दौलतराव शिंदे याच्याशी नाना फडणवीसाचे संबंध सुधारलेले होते आणि शिंद्याची विशाल सेना पुणे येथे असल्याने त्याचा फायदा घेऊन मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्याचे नानाने ठरविले आणि हैदराबादच्या निजामावर लक्ष केंद्रीत करुन त्याच्याकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली. निजामाचा मंत्री मुशीर मुल्कने ही चौथाईची मागणी फेटाळून लावतानाच भोसल्याचा वर्हाडातील महसुलावरील अधिकारही नाकारला. परिणामी पेशवा, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी मार्च, इ.स. १७९५ मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले.
मराठ्यांनी निजामावर आक्रमण केल्यावर निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली परंतु ब्रिटिशांनी मदत नाकारली आणि खर्डा येथे ही निर्णायक लढाई झाली. मराठ्यांशी उघड्या मैदानावर तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने त्याने खर्डा येथील किल्ल्याचा आश्रय घेतला. मराठ्यांनी ताबडतोब खर्ड्याच्या किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ल्याला होणारा अन्नधान्य आणि पाण्याचा पुरवठा खंडित करुन तटबंदीभोवती भडीमारासाठी तोफा रचल्या. शेवटी भयग्रस्त निजामाने १३ मार्च, इ.स. १७९५ रोजी तहाची याचना करुन लढाईतून माघार घेतली.
खर्डा येथेच दिनांक १३ मार्च, इ.स. १७९५ रोजी पेशवे आणि निजाम यांच्यात झालेल्या खर्ड्याच्या तहाने या लढाईची सांगता झाली.
माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची