महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,865

नेसरीची लढाई

Views: 4600
6 Min Read

नेसरीची लढाई –

वेडात दौडले वीर मराठे सात –

24 फेब्रुवारी शौर्य दिन इतिहासाच्या पानावर नेसरीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे .ही घटना घडली तो दिवस  इंग्रजी तारीख 24 फेब्रुवारी 1674 शिवराज्याभिषेका पूर्वी काही महिने महाराज पन्हाळगडावर होते. याच काळात आदिलशाही सरदार बहलोलखान  हत्ती -घोड्यांसह वीस हजार सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागतात  प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना छत्रपती  शिवाजीराजांनी गडावर बोलावले, आणि आज्ञा दिली की, “खान वळवळ भारी करतो, त्यास मारोन फते करणे”

महाराजांची आज्ञा  घेऊन सरसेनापती प्रतापराव गुजर  आपल्या सैन्यानिशी बहलोलखानावर चालून गेले .बहलोलखानाचा मुक्काम डोण नदीजवळ उमराणी गावी होता.मराठ्यांनी सर्वप्रथम एका बाजूने  पाण्यापासून तोडले आणि दुसऱ्या बाजूस  झालेल्या तुंबळ लढाईत खानाला मराठ्यांनी धूळ चारली. पाण्याशिवाय आणि मराठी सैन्याच्या हल्ल्याने कासावीस झालेल्या खानाला शरणागती पत्करल्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही.त्यांनी प्रतापरावांकडे आपला  वकील पाठवला .वकिलाच्या रदबदलीने आणि गोड शब्दांनी प्रतापरावांचे मन तयार झाले.खानाची चांगली खोड मोडल्यानंतर तो पुन्हा फिरून येणार नाही अशी त्यांना खात्री वाटली .

सरसेनापती प्रतापराव गुजरांनी खानाला अभय दिले .इतकेच नाही तर त्याला कैद न करता,तेथून निघून जाण्यास वाट करून दिली.खानाने प्रतापराव गुजरांचा विश्वास घात केला होता.या सर्व गोष्टी  महाराजांना कळल्यावर महाराज अत्यंत चिडले होते.कारण महाराजांच्या  आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव गुजर अत्यंत कमी पडले होते.

बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका हुशार आणि हिकमती महाराजांना आल्याशिवाय राहिली नाही.महाराजांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून “सला काय निमित्य केला? असा जाब विचारला. तुम्ही शिपाईगिरी केलीत ,सेनापती सारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या महाराजांच्या खरमरीत पत्रामुळे प्रतापराव गुजर मनातून दुखावले गेले.

महाराजांच्या अंदाजाप्रमाणे बहलोलखान याने परत हल्ले करण्यास सुरुवात केली. शिवराज्याभिषेकाची अत्यंत जोरदार तयारी राजगडावर सुरू होती .आणि यातच बहलोलखानाचे  हल्ले  महाराजांना पचण्यासारखे नव्हते .त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले,” हा बहलोलखान  वरचेवर का येतो  त्यास गर्दीस मिळवून फत्ते करणे .अन्यथा आम्हाला तोंड न दाखवणे .राज्याभिषेकापूर्वी बहलोलखानाचा जर फडशा उडविला नाही तर ,राज्यारोहणप्रसंगी महाराजांना प्रतापरावांचा मानाचा पहिला मुजरा झडणे अशक्य होते! रायगडावरचे दरवाजे एकट्या प्रतापरावास बंद होते.!नेसरीची लढाई.

महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या खुप जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास  गडहिंग्लज परिसरात होते .खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही  खबर प्रतापराव गुजरांना लागली. आणि हाताशी असणार्‍या सहा शिलेदारांसह प्रतापराव  खानावर चालून गेले.खानाच्या अफाट सैन्यासमोर या सात विरांचा निभाव लागणे कठीण होते. प्रतापराव धाडस आणि शौर्याची परिसीमा गाठू लागले होते.

एवढ्या प्रचंड पठाणी फौजा पुढे आपण अवघे सात जण काय करू शकणार असा  साधा विचार सुद्धा त्यांच्या डोक्यात आला नाही.सात जणात विसाजी बल्लाळ , विठोजी शिंदे, विठ्ठल पिळदेव ,दिपाजी राऊतराव ,सिद्धी हिलाल,कृष्णाजी भास्कर या सर्वांनी खानाला गर्दीला मिळवल्याशिवाय महाराजांना मुजरा नाही असे ठरवले होते. प्रतापराव देहभान विसरले त्याने एकदम बेहोषपणे बेहाय  घोडा पिटाळला.  त्यांच्या मागोमाग ते सहा शिलेदार दौडत सुटले!कुठे ?बहलोलखानावर !  पठाणावर !  सहा ते अन् सातवे प्रतापराव ! अवघे सात ! सातच !  सूर्याच्या रथाचे जणू सात घोडे रथापासून निखळले !आणि बेफाम सुटले .

प्रतापरावांचा तोल सुटला.  मराठी रक्त तेलासारखे भडकले. जमीन तडकू लागली. धुळीचे लोट उधळीत उधळीत सातजण नेसरीच्या रोखाने निघाले.

प्रतापराव सूडासाठी तहानलेले होते.त्यांच्या मस्तकात संताप आणि सूड घुसळून उठला होता. विचारायला तेथेही रिघच नव्हती .प्रतापराव सरदारी विसरले .त्यांनी केवळ शिपाईगिरीची तलवार उचलली .त्यांना आता कोण थांबू शकणार होते? ते आणि ते सहाजण बंदुकीच्या गोळ्या सारखे सणाणून सुटले होते.

बहलोलखान  अफाट फौजेनिशी नेसरीच्या डोंगरातील खिंड ओलांडीत  होता. एवढ्यात धुळीचा पिसारा पसरीत पसरीत हे सात मराठी स्वार खानाच्या फौजेवर चालून आले. कोणत्या शब्दात वर्णन करायचे त्यांच्या आवेशाचे आणि त्यांच्या अविचाराचे? बहलोलखान  चकितच झाला. अवघ्या सहा लोकांनिशी खासा प्रतापराव आपल्यावर चालून येईल अशी सुखद कल्पना त्याला मनोराज्यातही  कधी आली नव्हती.

सरसेनापती प्रतापराव  आणि ते सहा खानाच्या तुफान खवळलेल्या सेना समिंदरात एकदम तलवारी घालीत घुसले .जे त्यांच्या तडाख्यात सापडले ते मेलेच पठाणांच्या एवढ्या प्रचंड फौजेत अवघे  सात विजेचे लोळ अनिर्बंध धुमाकूळ घालू लागले. सातांनी शर्थ केली.पठानांचे घाव सातावर कोसळत होते. नेसरीची खिंड रक्ताने शिंपून निघाली .शत्रूचा गराडा सातांभोवती भोवर्यासारखा पडला. वादळात घुसलेल्या नौका खालीवर होऊ लागल्या. इतक्याविरुद्ध अवघे सात !  किती वेळ टिकतील?  एक एक इरेचा मोहरा धरणीवर  कोसळू लागला .शर्थीची  समशेर करून अखेर प्रतापरावही  उडाले ! ठार झाले ! दख्खनच्या दौलतीतले  सात तारे तुटले! महाराजांचा दुसरा तानाजी पडला !खानाच्या सेनासमिंदराची प्रचंड लाट महाराष्ट्रातून वाहात गेली.

महाराजांचे शब्द प्रतापरावांच्या इतक्या खोलवर वर्मी रुतले होते. खानाला तरी मारीन नाही तर मी तरी मरेन अशी तिडीक  त्यांनी धरली होती. धाडस आणि शौर्याचे परिसीमा गाठणारे हे वीर धारातीर्थी पडले. महाराजांना ही वार्ता कळल्यावर ते अतिशय दुःखी झाले .राज्याच्या सरसेनापतीला  दूरदृष्टी हवी ही अपेक्षा महाराजांनी करणे स्वाभाविक होते, परंतु भावनेच्या भरात सरसेनापती प्रतापरावांसारख्या निधड्या छातीचा वीर दुसरी चुक करुन बसला 24 फेब्रुवारी 1674 रोजी प्रतापरावांसह सहा वीरांना वीरगती मिळाली.दौलतीचे फार मोठे नुकसान झाले. महाराजांचा दौलतबंकी हरपला .

प्रतापरावांच्या मृत्यूने मनाला लागलेली टोचणी शिवरायांनी प्रतापरावांच्या कन्येशी  आपले धाकटे पुत्र राजारामांचा विवाह करून काहीशी कमी केली. नंतरच्या काळात छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या कैदेतून शंभुपुत्र शाहूंना मुसलमान करण्याचा घाट औरंगजेबाने घातला असताना त्यांच्याऐवजी प्रतापरावांचे दोन पुत्र खंडेराव व जगजीवन राव यांनी पुढे होऊन मुस्लिम धर्म स्वीकारला व  शाहुराजांना बाटवण्यापासून वाचवले.

नेसरी येथे प्रतापरावांचे समाधीस्थान अत्यंत चांगल्या रीतीने जिर्णोध्दारीत करून त्यांचा पुतळा गावातील मुख्य चौकात उभा करण्यात आला आहे. भोसरे या त्यांच्या जुन्या वाड्यातही त्यांचे छोटेखानी स्मारक उभारण्यात आले आहे.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर, पुणे

Leave a Comment