स्वतःच्या किल्ल्यामध्ये राहणारे श्री.चासकर आणि महाराष्ट्रातील सुंदर दीपमाळ !
मी दिव्यांचा संग्रह करायला सुरुवात केल्याला आता ५० वर्षे पूर्ण होतील. या निमित्ताने सध्या महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दीपमाळांचा शोध घेत आहे. पुण्याच्या राजगुरुनगरजवळ चासकमान येथील सोमेश्वर मंदिरातील २५६ दिव्यांची दीपमाळ ही अत्यंत देखणी दीपमाळ आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रातील सुंदर दीपमाळ, चारही बाजूच्या भिंतीतील कोनाडे आणि गावातील नदीकाठावरील शेकडो कोनाडे दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेला दिव्यांनी उजळलेले पाहायला प्रत्यक्ष सोमेश्वर नक्कीच अवतरत असेल ! या दीपमाळेसह आणखी काही वैभवशाली इतिहासाच्या श्रीमंत खुणा पाहायला मिळाल्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीजवळील टाळसुरे गावचे कृष्णाजीपंत जोशी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चास येथे आले. आपल्या हुशारीने आणि नेकीने ते लवकरच एक प्रतिष्ठित आणि सन्माननीय व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले…….. पुढचा चालता बोलता इतिहास आमच्यासमोर या कृष्णाजीपंत जोशी यांच्या दहाव्या पिढीचे श्री. सुरेश चासकर जोशी यांनी तसेच कु.अपूर्वा चासकर जोशी हिने अतिशय उत्साहाने उलगडला. कृष्णाजीपंत जोशी यांच्या वंशातील काशीबाई यांचा विवाह थोरल्या बाजीराव पेशव्यांशी झाला.तेव्हां पेशव्यांनी २००० रुपये आणि काशीबाईच्या वडिलांनी २५००० रुपये खर्च केले होते.
हे जोशी कुटुंबीय आता चासकर या आडनावाने ओळखले जातात. ऐन गावामध्ये चार बाजूंना ४ प्रचंड बुरुज आणि तितकाच बुलंद दरवाजा असलेला किल्ला म्हणजे या चासकर जोश्यांचा राहता वाडा ! शहरात १० x १२ च्या खोलीत गुदमरणाऱ्या माणसाची छाती, हा वाडा पाहूनच दडपून जाते. याची एक भिंत सुमारे १६ फूट जाडीची ( लांबीची नव्हे ) आहे. हत्तींनी गंडस्थळाने धडक मारून इथला प्रचंड दरवाजा तोडू नये म्हणून दरवाजाला बसविलेले मोठमोठे उलटे खिळे गंजले असले तरी मजबूत आहेत. या २२ खणी वाड्याला अस्सल सागाच्या खूप मोठ्या तुळया आणि त्याला लटकणाऱ्या कांचेच्या रंगीबेरंगी हंड्या आहेत. अंगणात इतस्ततः मुलं खेळत असावीत अशा ७ तोफा आपले स्वागत करतात. मोठा खजिना ठेवायला असाव्या अशा मोठ्या दगडी छान टाक्या चक्क पाणी साठविण्यासाठी केलेल्या आहेत.
भूमिगत सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था आहे. ३०० /३५० वर्षे जुना पितळी हत्ती आणि त्यावरील षट्कोनी अंबारी खूपच वेधक आहे. ताक घुसळण्याची साडेपाच फूट उंचीची रवी, कोरीव काम केलेले पायलीचे लाकडी माप, जुना पानाचा डबा – अडकित्ता, आंब्याच्या आकाराचे चुनाळे, पटावर खेळायच्या रंगीत काचेच्या सोंगट्या, आंघोळीचा कोरीव नक्षीचा दगडी चौरंग, पुरुषभर उंचीची ठाणवई ( लाकडी कोरीव खांबावरील पितळी समईची टवळी ), ५ / ६ फुटी तलवारी, असंख्य कागदपत्रे अशा असंख्य वस्तू पाहतांना आपण एच.जी.वेल्सच्या टाइम मशीनमध्ये बसून कायमचे इतिहासात गेल्यासारखे वाटते. तुकोजीराव होळकर यांनी जोशी घराण्याला दरवर्षी १६ रुपये देण्याची, सुमारे ७ फूट लांबीच्या विशेष कागदावर सही, शिक्के आणि मोर्तुबसह दिलेली सनद तर नक्कीच पाहण्यासारखी आहे.
“अतुल्य भारत” म्हणून आपण तीच तीच ठराविक पर्यटन स्थळे दाखवतो. ऐतिहासिक स्मारकांसाठी अब्जावधी रुपये पाण्यात खर्च करतो. पण खरा अतुल्य भारत मात्र अशा छोट्या छोट्या गावात आजही दुर्लक्षितच आहे.
( यातील सर्व छायाचित्रे मी काढलेली आहेत परंतु उजळलेल्या दीपमाळेच्या छायाचित्र चासकर-जोशी यांच्या सौजन्याने देत आहे.)
माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]