बेगमपुर…
सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर भीमा नदीकाठी प्राचिन सिध्देश्वर मंदिर व माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेब व त्याच्या सैन्याचा तळ सात वर्षे इ.स.१६९४ ते १७०१ या भागात होता. मराठयांच्या अचानकपणे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास माचनुरचा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. किल्ला बांधुनही रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्याबाहेरील छावणीवर हल्ला करून रसद व इतर सामान लुटून नेत. या हल्ल्यासाठी भीमा नदी ओलांडावी लागत असे पण मराठयांनी माचनुर किल्ल्यापासून एक मैल अंतरावर भीमा नदीला असणारा उतार शोधुन काढला होता व रात्रीच्या अंधारात मराठे या उतारावरून नदी ओलांडुन पलीकडे छावणीवर हल्ला करून लगेच मागे फिरत. हि गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने हे हल्ले थांबवावे व माचनुर किल्ल्याला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी नदीच्या उतारावर समोरील बाजुस एक लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा बेगमपुर किल्ला.
माचणूर गावाच्या पुर्वेस भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव असुन माचनुरहुन सोलापूरकडे जाताना भीमा नदीवरील पुलावरून किल्ल्याचे बुरुज, तटबंदी व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. बेगमपुरचे मूळ नाव घोडेश्वर. औरंगजेबची छावणी या भागात पडल्यावर त्याने घोडेश्वर नाव बदलुन बेगमपुर करण्यात आले. या भागातील उध्वस्त प्राचीन शिवमंदीर त्याची साक्ष देते. बेगमपुर गावातुन फिरताना मोडकळीस आलेले अनेक वाडे व मंदिरे दिसुन येतात. गावातुन किल्ल्याकडे जाताना सर्वप्रथम किल्ल्याच्या अलीकडेच एका गढीचे प्रशस्त प्रवेशद्वार व त्यासमोर गलबताचा नांगर पडलेला दिसतो. गढीच्या मागील बाजुस ढासळलेले दोन बुरूज दिसुन येतात. बेगमपुर किल्ल्यात शिरताना किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळ व त्याचे दोन बुरूज दिसुन येतात. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते.
रणमंडळाचे व किल्ल्याचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या असुन आतील बाजूने वर दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. मूळ टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्यात नंतरच्या काळात खुप मोठे बदल केलेले दिसुन येतात. किल्ल्यातील दर्गा व मस्जिद या वास्तू किल्ला बांधणीच्या काळातील नसुन नंतरच्या काळात बांधलेली असावीत. किल्ल्याचे क्षेत्र एक एकरपेक्षा कमी असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजही किल्ल्याचे आठ व रणमंडळाचे दोन असे दहा बुरूज सुस्थितीत दिसुन येतात. कोपऱ्यातील बुरुज दुमजली असुन त्यांना वरील भागात जाण्यासाठी अंतर्गत पायऱ्या आहेत. बुरुजावरून तटावर जाता येते. मूळ १५ फुट असणारी तटबंदी नंतर २०-२५ फुटापर्यंत वाढवलेली असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. किल्ल्याला आपण शिरलेल्या दरवाजाशिवाय उजव्या बाजुस दोन व मागील बाजुस एक अशी अजुन तीन प्रवेशद्वारे आहेत.
प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस दुसऱ्या टोकाला एक मशिद असुन मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या डाव्या बाजुच्या कोपऱ्यातील दरवाजाने खाली नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी कबर असुन तिच्यासमोर उजव्या व डाव्या बाजुला तटाला लागुनच दोन कबरी आहेत. मध्यभागी असणारी कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची व समोरील तिच्या शिक्षकाची असावी असे सांगितले जाते. मशिदीच्या मागिल बाजूस नदीकिनारी असलेला बुरूज सर्वात उंच असुन हा भाग किल्ल्यापासून थोडा सुटावलेला आहे. या बुरुजावर थेट नदीतुन पाणी खेचण्यासाठी रहाट बसविण्याची सोय दिसुन येते. येथुन किल्ल्याला वळसा मारून दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. इ.स.१८८४ सालच्या सोलापूर जिल्ह्याच्या गॅझेटनुसार माचणूरच्या चंद्रभागेकाठी भव्य शिवालय आहे. जवळच औरंगजेबचा तळ होता. माचणूरच्या पूर्वेकडे एक मैलावर चंद्रभागेच्या पलिकडील किनाऱ्यावर बेगमपूर हे बादशहाच्या बेगमची कबर असलेले गाव आहे. सध्या हा किल्ला पुरातत्व खात्याकडे असुन संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. पुरातत्त्व खात्याने अंतर्गत भागात काही ठिकाणी दुरुस्ती केली आहे.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.