बेहस्तबाग – काळाच्या पडद्या आड गेलेली ऐतिहासिक बाग…!!!
अहमदनगर शहराच्या दक्षिणेस सावेडीजवळ बेहस्तबाग आहे. निजामशाहीचा संस्थापक अहमद निजामशाह याच्या काळात या बागेचे निर्माण करण्यात आले. सुरवातीस या बागेत एक अष्टकोनी महाल व त्या भोवती तलाव बांधण्यात आला. या बागेला हस्तबेहस्त, बेहस्तबाग, भिस्तबाग, व बाग- ई- बिहस्त अशीही नावे आहेत.
येथील महालाला आठ कमानी व आठ दरवाजे होते. या महालास फैजबक्ष महाल असे नाव दिले होते.तलावाच्या दक्षिणेस एक भव्य कमान व हमामखाना आहे. पूर्वी या तलावाला व येथील बागेला पिंपळगाव व शेंडी येथून भूमिगत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.
फैजबक्ष महालाभोवती असलेल्या तलावाची रचना पाहता या महालात जाण्याकरिता जमिनीवरून रस्ता नव्हता. त्या काळात या महालात जाण्याकरिता होडीचा वापर केला जात असे. कारण तलावाच्या काठावर असलेल्या कमानीच्या पुढे एक एक बुरुजसदृष्य धक्के बांधण्यात आले होते.
हा महाल दुमजली असून दुसऱ्या मजल्यावर गच्ची आहे. तळमजल्यावर एक अष्टकोनी दालन असून, या दालना भोवती लहान लहान अष्टकोनी दालने आहेत. पूर्वी वरच्या मजल्यावर जाण्याकरिता दगडी जिने होते आता ते पडले आहेत.
अहमद निजामशाहचा मुलगा बुरहांन निजामशाहने या बागेचा विस्तार केला. त्याने या बागेचे नाव बदलून ‘ हस्त बेहस्त’ बाग असे ठेवले. हस्त बेहस्त म्हणजे पृथ्वीवरील आठवे नंदनवन. त्या काळात ही बाग खरोखर नंदनवन होती. तत्कालीन ऐतिहासिक साधनांमध्ये या बागेची सुंदर वर्णने आहेत.
निजामशाहीचा अस्त झाल्यानंतर दुर्दैवाने ही बाग काळाच्या पडद्याआड गेली. आता फक्त या महालाचे काही अवशेष शिल्लक राहिले आहेत. तलावाचा व बागेचा मागमूस शिल्लक नाही. सध्याच्या छायाचित्र पाहता याची कल्पना येऊ शकते. एके काळी अहमदनगरची तुलना कैरो व बगदादशी होत असे तेच शहर आज आपले ऐतिहासिक अस्तित्व गमावत चालले आहे.
छायाचित्र सौजन्य : श्री. भूषण देशमुख,अहमदनगर
संदर्भ: ‘ सफर अहमदनगरची ‘ २०१५.
लिखाण:- संभाजी भोसले