बेलापुर किल्ला…
पनवेलची खाडी ठाण्याच्या खाडीला जिथे मिळते त्या मोक्याच्या जागी बेलापूर गाव वसलेल आहे. खाडीच्या उत्तर तिरावर साधारण दीड किमी लांबी रुंदीचे एक बेट होते. वसईनंतर साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर खाडीतून होणाऱ्या वहातुकीवर नजर ठेवण्यासाठी व खाडी पलिकडील मराठ्यांकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पोर्तुगिजांनी १६व्या शतकात त्या बेटावर खाडीपासून ५०० फुट अंतरावरील एका टेकडीवर ४०० X २०० फुट लांबी रुंदी असलेला बेलापूरचा किल्ला बांधला. बेटावर असणारा बेलापुर किल्ला आता त्याच्या बाजुच्या खाडीत भराव घातल्याने मुख्य भूमीशी जोडला गेला व किल्ल्यात जाण्यास वाट निर्माण झाली. तसाच एक कोट नदीच्या मुखापाशी बांधला होता तो म्हणजे बेलापुरचा बुरुज. ह्या दोन्ही वास्तु बेलापूर किल्ल्याच्या अंतर्गत होत्या. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले.
अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार असणारा हा किल्ला आज कसाबसा तग धरुन उभा आहे. बेलापूरच्या झपाटयाने होणाऱ्या विकासामुळे किल्ल्याचे उरलेले मोजके अवशेषदेखील इमारतींच्या गराड्यात हरवत चालले आहेत व नष्ट होणाच्या मार्गावर आहेत. या किल्ल्याविषयी जास्त माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना किल्ला चौक यापेक्षा जास्त माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जाण्याचे ठरवावे. बेलापुरहुन उरणला जाताना पाम बीच रोड चौकातच नवी मुंबई महानगर कार्यालयासमोर पालिकेच्या बागेत बेलापुर बुरुज उभा आहे. या बुरुजाकडून एक वाट सरळ सिडकोचे विश्रांतीगृह असलेल्या टेकडीकडे जाते. हि टेकडी म्हणजेच बेलापुर किल्ल्याचा बालेकिल्ला होय. या वाटेने आपण सिडकोच्या विश्रांतीगृहात जातो व तिथुन पायऱ्यांच्या वाटेने बालेकिल्यात जाता येते किंवा अलीकडच्या वाटेने गोवर्धिनी देवीचे देवळात जाऊन तेथुनही किल्ल्यावर जाता येते. बालेकिल्ल्याकडे जाण्यापुर्वी डावीकडच्या वाटेने आपण रेतीबंदाराकडे जातो. या वाटेवर किल्ल्याच्या पश्चिम बाजूस १२ X १२ फुट चौरस आकाराची एक बांधीव पोर्तुगीजकालीन विहीर व एक मोठे तळे आहे.
विहीरीत आत एक कोरीव मराठी शिलालेख असुन त्यावर शक १७३२ म्हणजे सन १८१० अशी अक्षरे कोरली आहेत. या शिलालेखाचे वाचन असे- श्री /श्री गणेशाय नमः/श्री अंजनेश्वर आराध्य दैवताय नमः/पांडुरंग रामचंद्र उपनाम देवधर दप्तरद / रवि संवत्सरकार शके १७३२/ प्रमोद नाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुरुवार. हे दोन्ही पाहुन परत मागे वाटेकडे यावे व उजवीकडील वाटेने पुढे निघावे. वाटेच्या उजव्या बाजुस सर्वप्रथम एक विहीर नजरेस पडते. तिथून पुढे आल्यावर डाव्या बाजुस बालेकिल्ल्यावर जाणारी वाट दिसते तर उजव्या बाजुस आपल्याला झाडीत लपलेले उघडयावर असणारे सात आसरा देवीचा शेंदुर फासलेला मोठा तांदळा दिसतो. मंदिराशेजारी अजुन दोन पोर्तुगीजकालीन विहिरी व एक सुकलेले तळे आहे. मंदिराच्या वरील बाजुस जुन्या घराचे अवशेष दिसून येतात तर झाडीमध्ये कोसळलेली तटबंदी व तिचा पाया नजरेस पडतो. किल्ल्याची देवी गोवर्धनी मातेचे जिर्णोध्दार केलेल मंदिर मध्येच झालेल्या इमारतींमुळे बालेकिल्ल्यापासुन दुरावले आहे. किल्ल्याची खालील भागातील तटबंदी सातआसरा मंदिराशिवाय कुठेही अस्तित्वात नाही. इथुन मूळ वाटेवर येऊन पायऱ्यांच्या वाटेने बालेकिल्ल्याकडे निघायचे.
बालेकिल्ल्यावर चढताना इमारतीचे अवशेष व एक दुमजली गोल मनोरा दिसतो. बालेकिल्ल्यावर बरेचशे उध्वस्त अवशेष पाहायला मिळतात. यात सैनिकांची निवासस्थाने,पाण्याचा हौद,कार्यालय,घरे,बुरूज,तटबंदी या सर्व वास्तूंचा समावेश होतो. बेलापुर किल्ल्यामधुन प्रबळगड, कर्नाळा अगदी स्पष्टपणे ओळखता येतात व खाडीचा खुप मोठा प्रदेश नजरेस पडतो. संपुर्ण परिसर व किल्ला फिरण्यास दीड तास लागतो. पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडाच्या वरील भागात ११ तोफा तर खालील भागात ९ तोफा अशी २० तोफांची नोंद आढळते. पोर्तुगीज कागदपत्रात या किल्ल्याचे नाव स्याबेज असे आढळते. इ.स.१७३९च्या साष्टी वसई मोहिमेत ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली ३०० धारकऱ्यानी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १९३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला पण शेख दाउद व कान्होजी हिलाल यांना वीरगती प्राप्त झाली. पोर्तुगीजाचे या भागातून कायमचे उच्चाटन झाले. पानिपत युध्दानंतर सदाशिवभाऊच्या तोतयाला मानाजी आंग्रेनी बेलापूरच्या किल्ल्यात पकडले. इंग्रज कर्नल के याने २३ नोव्हेंबर १७७८ रोजी बेलापूर किल्ला जिंकून घेतला. १७७९ मध्ये वडगावच्या तहानुसार इंग्रजांना किल्ल्याचा ताबा मराठ्यांना परत द्यावा लागला. १२ एप्रिल १७८० रोजी कॅप्टन कॅम्बेलने बेलापूरचा किल्ला परत जिंकला; पण १७८२ च्या तहानुसार इंग्रजांना परत हा गड मराठ्यांना द्यावा लागला. २३ जून १८१७ रोजी कॅप्टन चार्ल्स ग्रे याने हा किल्ला जिंकून इंग्रज साम्राज्यात समाविष्ट केला.
@सुरेश निंबाळकर