बंगालचे राजकारण आणि मराठे भाग ०२ –
बंगालवर स्वारी – सन १७४१! नानासाहेबांना नुकतीच पेशवाई मिळाली होती. दमालचेरीमुळे रघुजी भोसल्यांचा पराक्रम चारही दिशांना पसरला होता. या अशा वेळी भास्कर राम बंगालवर स्वारी करण्याची योजना आखत होते. मराठे बंगालमध्ये कसे गेले हे मागे सांगितलंच आहे. या दरम्यान अलिवर्दीखानाने ओरिसा काबिज करून तेथील सुभेदारीवर आपल्या तंत्राने चालणाऱ्या सौलतजंगाला नेमले. या सौलतजंगाने त्या लोकांवर भयंकर आत्याचार केले. यामुळे तेथील लोक बंडाळी करुन उडल्याच्या बातम्या नागपुरापर्यंत येऊन पोहचल्या आणि याच संधीचा फायदा घेऊन १७४१ अखेर भास्कर राम दहा हजार सैन्यासह ओरिसात घुसले. पण भास्कर रामांकडे दहा हजार नाही तर पन्नास हजार फौज आहे अशा अफवा त्यांनी उडवल्या. त्याआधी अलिवर्दीखानाने ओरिसात जाऊन ते बंड मोडले आणि पुन्हा मुर्शिदाबातकडे गेला. पंतांच्या सैन्यानं रामगडच्या जंगलातून खाली उतरत पंचेट हा परगणा लुटला , यामुळे अलिवर्दीखानाने त्यांच्यावर हल्ला चढवला. मराठ्यांची ताकदच एवढी होती की अलिवर्दीखानाचा निभाव लागला नाही. आणि तो पोचला शहराबाहेर राणीच्या तलावाच्या काठी आपली छावणी करुन राहीला. सकाळी खानाचं सैन्य झोपेतून उठलं अन उठल्या उठल्या त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. भास्कर रामांनी चारही बाजूंनी त्यांची छावणी वेढली होती.(बंगालचे राजकारण आणि मराठे भाग ०२)
भास्कर रामांनी खानाच्या छावणीचं दाणा-पाणी तोडलं, आठ दिवसांच्या आत खानाच्या छावणीच्या अत्यंत हाल होऊ लागले.
नवाबानं पंतांकडे तहासाठी बोलणं लावले. पंतानी दहा लाख रुपयांची मागणी केली. पण नवाबाचं सैन्य नवाबाला म्हणालं की ‘ ते दहा लाख रुपये मराठ्यांऐवजी आम्हाला द्या. मराठे दहा लाखांवर माननारे नाही. पैशाची चटक लागल्यावर ते असेच त्रास देत रहाणार ‘ सैन्याचं ऐकून नवाब एका रात्री पळून गेला. पण नवाब पळून गेला आहे ‘ ही चाहूल भास्कररामांना लागली आणि त्यांनी पुन्हा एका शेतीच्या मैदानावर नवाबाला कोंडून धरले आणि इतर सामान जाळून टाकले. आता पंतांनी एक कोट रुपयांची मागणी केली. मुसाहीबखान नावाचा नवाबाचा सेनापती होता त्याने सर्व मागण्या झिडकारून लढत देण्याचे ठरवले. बरद्वान पासून २१ मैलांवर असलेल्या निगुणसराई येथे लढाई होऊन त्यात मुसाहीबखान मारला गेला. या दरम्यान मीर हबीब भास्कररामांना येऊन मिळाला. पावसाळ्याची चिन्हं दिसू लागल्यामुळे भास्कर राम पुन्हा नागपुरास जाण्याचा विचार करू लागले. पण मीर हबीब मुळे ते तिथेच थांबले. मुर्शिदाबाद शहाराला फारसा बंदोबस्त नव्हता. ते शहर लुटण्याची योजना तयार होऊ लागली. दि. ०६ मे १७४२ रोजी सातशे मराठ्यांना सोबत घेऊन स्वतः मीर हबीब मुर्शिदाबादेवर चाल करून गेला. जगतशेट अमलचंद वैगरे धनाढ्यांच्या पेटाऱ्या लुटून तब्बल अडीच कोट संपत्ती मराठ्यांंना मिळाली. अलिवर्दीखानाचा वडील भाऊ हाजी महंमद हा मुर्शिदाबातदेचं रक्षण करीत होता पण त्याने काही बचाव न करता स्वतः किल्ल्यात आश्रयाला जाऊन बसला.
खटव्यापासुन ते पश्चिम बंगालचा म्हणजे राजमहालापासून ते जाळेश्वरपर्यंतचा प्रदेश पंतांनी ताब्यात घेतला. ओरिसाचे बंदरही लवकरच ताब्यात आले. हुगळीचे ठाणे सधन असून त्याच्याच आटोक्यात कलकत्ता, चंद्रनगर, व चिनसुरा ही इंग्रज, फ्रेंच व डच व्यापारी वसाहतींची ठिकाणं होती. जुलैच्या पुर्वार्धात हुगळीचं ठाणं मराठ्यांनी काबिज केलं. त्यांना मराठ्यांच्या या आक्रमणाची इतकी धास्ती बसली की त्यांनी एक प्रचंड किल्ला बांधला आणि सभोवताली एक खंदक खोदून त्याचं नाव ‘ मराठा डिच ‘ ठेवलं.
एकंदरीत मे ते सप्टेंबर या पाच महिन्यांच्या काळात बंगालमध्ये मोठी दंगल माजवत मराठ्यांनी तद्देशिय लोकांवर प्रचंड आत्याचार केले. अल्पकाळात मराठ्यांचा दरारा भास्कर पंतांनी चारही बाजूस पसरवला. इकडे मुर्शिदाबादेस अलिवर्दीखान मराठ्यांवर सुड उगवण्याची तयारी करत होता. अश्विन महिन्यात बंगालमध्ये दुर्गापुजेचा उत्सव मोठा होतो.
यानिमित्ताने आपण तप्रांतीय लोकांचा सत्कार करावा असे पंतांना वाटले. अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे दि. १८ सप्टेंबर रोजी उत्सवास सुरुवात होऊन मुख्य दिवस दुर्गा अष्टमी म्हणजे दि. २६ सप्टेंबर पर्यंत चालणार होता. सगळे जण उत्सवाच्या तयारीची गडबड चालू असतानाच नदीच्या पलीकडून नवाबाने गुप्तपणे आपले सैन्य आणून ठेवले. यात नवाबाचे अफगाण सेनापती मुस्तफाखान व मीर जाफर हे आघाडीवर होते. दुर्गा अष्टमीच्या उत्तर रात्री म्हणजे दि. २७ सप्टेंबर रोजी या लोकांनी पंतांच्या छावणीवर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मराठ्यांची फौज सैरावैरा पळत सुटली. यात मीर हबीब पळून गेला. भास्कर रामांनी रघुजींकडे आणखी फौज मागितली, पण त्याआधीच रघुजी ससैन्य बंगाल मोहिमेवर निघाले होते.
रघुजी बंगालमध्ये जाण्याची राजकारणं भास्कर पंतांसोबत शिजवत असतानाच नानासाहेबही बंगाल मध्ये जाण्याची तयारी करत होते. सन १७४१ अखेर नानासाहेब पुण्यातून निघाले. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या मुक्काम वैरागड येथे पडला. दि. २० फेब्रुवारी १७४२ च्या एका पत्रात नोंद आढळते ती अशी ” आम्ही श्रीमंतांसमागमे बंगाल प्रांतात जावयासी स्वार होऊन गेलो. बंगाल प्रांत फिरोन छावणीस आलो म्हणजे तुम्हास कळवू. श्रीमंतांनीही कित्येक स्थळाचे करार करोन दिल्हे ”
यानंतर नानासाहेब हंडा, मकडाई , शिवनीवरुन नर्मदेच्या काठा-काठाने गढा येथे पोहोचले. मंडळा वैगरे घेऊन त्यांनी बुंदेलखंडात प्रवेश केला. या दरम्यान शिंदे-होळकरांना चौथाई वसूल करण्यासाठी रजपूताण्यात पाठवले. यावेळी नानासाहेबांनी सक्त ताकीद दिली होती की ” अभयसिंगाचे मैत्रिकीची ममता बिलकुल न धरिता, जोधपुरावर शह देऊन दो चार मातबर जागे जरबेखाले आणून द्रव्य साध्य अरणे. निष्ठुरता केल्याखेरीज ते राजकारणावर येणार नाही. त्यांजकडील वकील येथे आले आहे ते ध्यानावर नाही. राठोड बेईमान. त्यांची माया किमपि न धरिता साफ उत्तर करणे ” यावर दि. १२ एप्रिल रोजी शिंदे-होळकरांनी नानासाहेबांना पत्र पाठवले ” रजपूत साक्षात बंधूंचे ऐकणार नव्हेत, ते आमचे कोठुन ऐकणार.! आम्ही स्वामीसेवेस चुकत नाही. प्रस्तुत जोधपुरासंधिध आलो आहो. प्रसंग दिसेल तसे करु. काही थोडी बहुत वसुली आली. मुलुख वैराण आहे. यादी पाठविल्या आहे. त्यावरुन विदित होईल. ”
बाबूजी नाईक हे पेशव्यांचे मेहुणे जरी असले तरी ते त्यांच्या विरोधात होते. बाबूजी हे पेशव्यांविरोधात रघुजींना मदत करायचे. १७४१-४२ साली नानासाहेब बंगालमध्ये गेल्याचा फायदा घेऊन १७४२ च्या उन्हाळ्यात दामाजी गायकवाडांसह गुजरातेतुन माळव्यावर चाल केली. पण नानासाहेब यावेळी सावध असल्याने त्यांनी पवार आणि होळकरांच्या मदतीने दामाजींना माळव्यात उतरू दिले नाही. पेशव्यांनी आपल्या क्षेत्रावर हल्ला करून मंडळा वैगरे स्थळे काबीज केली आणि पुढे बंगालमध्येही आपणास शह देणार आहे हे पाहून रघुजींचा मनस्ताप वाढत गेले. दि. ०४ मे १७४२ रोजी विश्वनाथ भट या वैद्याला पत्र लिहून रघुजींनी शाहू महाराजांकडे पत्र लिहून तक्रार केली.
या प्रकारे पेशवे ( नानासाहेब ) आणि रघुजी यांच्यात तेढ वाढत गेली. जसे दोघांचे म्हणजे नानासाहेब आणि रघुजी या दोघांचे पक्षपाती जसे शाहू महाराजांकडे होते तसेच ते बादशहाकडे सुद्धा होते. केशवराव नावाचा एक मराठ्यांचा स्नेही दिल्लीत होता. तो दि. ११ ऑगस्ट १७४२ रोजी रघुजींना लिहितो ” तुम्हाकडील वृत्त व्यंकाजी देवराव यांनि निवेदन केले. त्यावरुन अवगत जाले. सार्वभौमाचा लोभ संपादून घेतला त्याचा अर्थ श्रुत जाले. इकडील वर्तमान व्यंकाजी देवराव सांगता कळो येईल. ”
नानासाहेब यावेळी हंड्या, मंडाळा, शिवनीवरुन नर्मदेच्या काठाने गढा येथे पोहोचले. यादरम्यान शिंदे-होळकरांना रजपुताण्यात चौथाई साठी रवाना करून स्वतः ओर्छा येथे पावसाळी छावणी करून राहिले. २९ जूनला नानासाहेब लिहितात “ मुलूखगिरीचे बहुत दिवस क्रमले. तदूत्तर नर्मदेत्तोर तीरास आलियावर मंडळाचा कार्यभार लिव्हेस लावीला. रजवाडियात आठ आठ दिवस लागले. दिवस निघोन गेले. देशी परत यावे तो प्रजन्य लागोन नर्मदेस पाणी लागले. याजकरीता इकडे छावणी केली.”
नानासाहेबांनी आपल्या क्षेत्रावर आक्रमण केले आणि पुढे आपल्याही शह देणार हे पाहून रघुजींचा मनस्ताप वाढला. आधी सांगितल्याप्रमाणे रघुजींनी विश्वनाथ वैद्याकरवी शाहू महाराजांकडे याविषयी तक्रार केली होती. या दोघांचे पक्षपाती जसे शाहू महाराजांकडे होते तसेच ते बादशाहाकडेही होते. यादरम्यान अलिवर्दिखानही स्वस्त बसला नव्हता, त्याने स्वतःची फौज उभी करून बादशहाकडेही मदतीची याचना केली होती. रघुजी आणि पेशवा यांचे एकमत नाही हे अलिवर्दिखा जाणून होता आणि त्यामुळे त्याने रघुजींना आळा घालण्यासाठी परस्पर काही रक्कम नानासाहेब पेशव्यांना खर्चासाठी पाठवली पण ती नानासाहेबांना न मिळता अयोध्येच्या नवाबानेच मधल्या मध्ये लांबवीली. या दरम्यान इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात युद्ध सुरू होण्याची चिन्हं दिसू लागली होती. तिकडे रघुजी आपली छावणी उठवून बीरभूमच्या दिशेने गेले. हे सगळं होता होता १७४३ साल उजाडले. १ फेब्रुवारी १७४३ रोजीचं एक पत्र उपलब्ध आहे ते पत्र असे…
“ प्रयाग गंगा दक्षिणतीर. श्रीमंत ग्वालेर प्रांती आले. बंदोबस्त करुन पटणे प्रांती जावे या उद्देशाने बुंदेलखंडात आले. पुढे पाटणे प्रांते न जाता प्रयाग काशि क्षेत्रे जवळ जोणोन येथे आले. त्रिवेणी संगम स्नाने झाली. सकल विधि उत्तम झाला. प्रयागच्या सुभाही अग्रहपुर्वक नावा दिल्या, बहुत लोक नावांत बसुन किल्ल्याजवळ स्नाने करुन वटदर्शन करुन आले. पाऊण लाख फौजेनिशी जाऊन स्नान करणे हे कर्म पुर्वी झाले नाही. पुढे होणे दुरापास्त. आरण्यपुराण तत्प्रभावे करुन पुण्याच्या आपाक्ष राशी जाहल्या. याविशीच्या विस्तार काय लिहावा! ईश्वरी कर्तृत्व विचित्र आहे “
दि. ३१ मार्च १७४३ रोजी प्लासीजवळ नानासाहेब आणि अलिवर्दिखान यांची भेट झाली. पिलाजीराव जाधवराव मधस्ती होते तर अलिवर्दिखानाने आपला सेनापती मुस्तफाखान याला पुढे पाठवून भेटीची व्यवस्था केली. पेशव्यांचे वकील गंगाधरराव आणि अमृतराव यांच्यासोबत स्वतः पिलाजीराव जाधवराव अलिवर्दिखानाला पुढे जाऊन भेटले. नवाबाने पेशव्यांना चार हत्ती , घोड्यांसोबतच २२ लाख रुपये नजर केले. आठ दिवस चाललेल्या या भेटीत बंगाल प्रांताची चौथाई हर साल शाहू महाराजांना द्यावी असे ठरले. लवकरच नानासाहेब आणि रघुजी एकमेकांसमोर येणार होते..!
क्रमशः
बंगालचे राजकारण आणि मराठे भाग ०१
संदर्भ –
१) राजवाडे – खंड – ३ , ६ ले.१६४
२) पेशवे दफ्तरातील निवडलेले कागद – खंड – २०,२७
३) पुरंदरे दफ्तर – खंड – १ ले. १५२
४) मराठी रियासत – ( थोरले नानासाहेब) – गो.स.सरदेसाई
५) ब्रिटिश रियासत – खंड – ०२ – गो.स.सरदेसाई
६) मराठ्यांचे साम्राज्य – रा.वि.ओतुरकर
७) The fall of mughal empire – Jadunath sarkar
८) The extraordinary epoch of Nanasaheb peshwa – Uday kulkarni
फोटो – बंगाल प्रांत
फोटो सौजन्य – गुगल
-निशांत कापसे