बेझोर | पाद-जहर (फारसी) –
मध्ययुगीन कालखंडात विषावर उतारा म्हणून बेझोर किंवा पाद-जहर या प्राणीजन्य अश्माला प्रचंड महत्त्व होते. या अश्मामध्ये विषनाशक गुणधर्म असतात असा लोकांचा समज असल्यामुळे या अश्मांना मागणी होती. फारसी भाषेत याला पाद-जहर असे म्हणतात; याचा शब्दश: अर्थ ‘प्रतिविष’ असा होतो. मध्ययुगीन इतिहासात याचा बऱ्याचदा उल्लेख केलेला आढळतो. भारतातील बेझोरचा बहुतांश व्यापार पोर्तुगीजांच्या हातात होता.अल-बिरुनी या प्रसिद्ध इतिहासकाराने आपल्या “किताब-अल-जमाहिर” या पुस्तकात बेझोर विषयी सविस्तर माहिती दिली आहे.
बेझोर हा एक प्राणीजन्य पदार्थ असून तो बकरी, मेंढी, गाय यासारख्या तृणभक्षी प्राण्यांच्या पोटात तयार होतो. या प्राण्यांनी खाललेल्या व न पचलेल्या अन्ना भोवती तयार झालेले आवरण म्हणजेच हा बेझोरअश्म.
शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेळीच्या पोटाला हात लावल्यावर आत किती बेझोरचे खडे आहेत हे समजते व तो या खड्यांच्या संख्येनुसार शेळीची किंमत ठरवतो. खड्यांची चाचपणी करण्याकरिता ते शेळीच्या पोटाखालून आपले दोन्ही हात फिरवतात आणि पोटाच्या दोन्ही बाजूला बुक्के मारतात. यामुळे पोटात असलेले बेझोरचे खडे मधल्या भागात जमा होतात व आत किती खडे आहेत याचा अचूक अंदाज त्यांना बांधता येतो.
माकडाच्या पोटातही बेझोर तयार होतो. काही लोकांच्या मते तो इतका गुणकारी असतो की त्याच्या २ ग्रेन वजनाच्या तुकड्याने जो गुण येतो, तो येण्याकरिता शेळीच्या बेझोरचे ६ ग्रेन वजनाचे तुकडे लागतात; परंतु माकडापासून मिळणारा हा बेझोरअत्यंत दुर्मिळ असतो आणि तो विशेषकरून मकास्सरच्या बेटावरील माकडांच्या एका विशिष्ट जातीमध्ये आढळतो. हा बेझोरआकाराने गोल असतो व शेळीपासून मिळणारा बेझोरतिने खालेल्या झाडांच्या कळ्या व फांद्याभोवती तयार होत असल्याने वेगवेगळ्या आकाराचा असतो. माकडापासून मिळणारा बेझोर दुर्मिळ असल्यामुळे त्याला प्रचंड मागणी असते आणि त्याची किंमतही फार असते.
इ.स.१५७५ मध्ये अँब्रोइस पारे नावाच्या एका फ्रेंच वैद्याने विषावर उतारा म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या बेझोरचे औषधी गुण आजमावून पहायचे ठरवले. फाशीची शिक्षा झालेल्या एका चोराला त्याने विष खाऊ घातले आणि नंतर त्याच्यावर बेझोरचा प्रयोग करून पाहिला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही व त्या चोराला यातनामय मरण आले. अशाप्रकारे पारेने बेझोर मध्ये विषनाशक गुण असतात हा लोकांचा समज चुकीचा आहे हे सिद्ध केले!
अधुनिक काळात गुस्ताफ अरहेनियस आणि अँड्रू बेनसन यांनी आरसेनिक मिश्रित द्रव्यात बेझोर टाकले असता, या द्रव्यातील विष काढून टाकता येते हे सिद्ध केले आहे. यावरून बेझोर काही प्रकारच्या विषांवर परिणामकारक ठरत असावे असे वाटते.
संदर्भ :-
१) https://en.m.wikipedia.org/wiki/Bezoar.
२)https://archive.org/details/ambroiseparhis00page (पृष्ठ क्रमांक १८६-१८७)
३) अल-बिरुनीचे “किताब उल जमाहिर” (पृष्ठ क्रमांक १७२) http://farlang.com/…/al-biruni-comprehensive-book-on.
चित्र :- अंगठीत बसवलेला बेझोर खडा (विकिपीडिया वरुन)
सत्येन सुभाष वेलणकर, पुणे