भैरव मूर्ती, वालूर –
वालूर (ता. सेलू जि. परभणी) येथे वाल्मिकेश्वर मंदिर आहे. मंदिर आता नव्याने बांधलेले आहे पण हा परिसर प्राचीन अवशेषांनी भरलेला आहे. शेषशायी विष्णु, हात जोडलेला गरूड, आसनस्थ शिव पार्वती, विष्णुच्या हातातील चक्र, रिद्धी सिद्धीसह गणेश असे कैक अवशेष या परिसरात विखुरलेले मंदिरा समोरच्या वडा खाली आढळून येतात. एक प्राचीन बारव आहे जी आता जवळपास बुजली आहे.भैरव मूर्ती.
मंदिराच्या भिंतीला टेकून ही भैरवाची मूर्ती ठेवलेली आहे. याच्या वरच्या दोन हातात त्रिशुळ आणि डमरू आहे. डोक्यावरचे केस मुंड माळेने बांधलेले आहेत. मस्तकामागे ज्वालेप्रमाणे गोलाकार प्रभा मंडळ आहे. खालचा उजवा हात भंगलेला असून डाव्या हातात नरमुंड आहे. डाव्या बाजूला खाली या नरमुंडातून टपकणारे रक्त चाटणारा कुत्रा आहे. नग्न भैरवाच्या कमरेला साखळी असून मांड्यांवर घंटा लोंबत आहेत. डाव्या बाजूला गण आहे. उजव्या बाजूस भुतनाथ आहे. गुडघ्यावरून खाली मुंडमाला लोंबते आहेत.
ललित मुद्रेत भैरव उभा आहे. एरव्ही उग्र दाखवला जाणारा हा भैरव इथ शांत चेहर्याचा दाखवलेला आहे.
या परिसरातील प्राचीन शिल्पावशेष, मंदिरांची अवस्था, बुजलेल्या बारवा पाहून अतोनात दू:ख होते. इतकी अनास्था का आहे? जरा जागरूकता दाखवली तर भव्य वाडे असलेले हे एकेकाळचे संपन्न गाव संस्कृती ग्राम म्हणून (हेरीटेज व्हिलेज) पर्यटकांचे आकर्षण बनु शकते.या परिसरातील प्राचीन शिल्पावशेष, मंदिरांची अवस्था, बुजलेल्या बारवा पाहून अतोनात दू:ख होते. इतकी अनास्था का आहे? जरा जागरूकता दाखवली तर भव्य वाडे असलेले हे एकेकाळचे संपन्न गाव संस्कृती ग्राम म्हणून (हेरीटेज व्हिलेज) पर्यटकांचे आकर्षण बनु शकते.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद