महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,96,891

भैरवी, केदारेश्वर मंदिर | आमची ओळख आम्हाला द्या

Views: 1419
2 Min Read

भैरवी, केदारेश्वर मंदिर | आमची ओळख आम्हाला द्या –

धर्मापुरीचे केदारेश्वर मंदिर विविध शिल्पांनी नटलेली आहे. मंदिराच्या मंडोवरील प्रत्येक शिल्प अतिशय सुबक व उठावदार आहे. प्रत्येक शिल्प अद्भुत ,अगम्य आणि आकलन शक्तीच्या बाहेर आहे. शिल्पातील अलंकार, वेशभूषा, वस्त्रप्रावरणे, आसने ,मुद्रा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिराचे मंडोवरच शिल्पांनी अलंकृत केलेले आहे. याच शिल्पांच्या मांदियाळीत भैरवीचे शिल्प आहे. यास गौरी किंवा सुरसुंदरीचे शिल्प म्हणून संबोधले जात होते. परंतु ही गौरी नसून भैरवी आहे.

मंडोरावर स्थित असणारी ही भैरवी त्रीभंगावस्थेत उभी आहे. डोक्यावर जटा मुकुट आहे. त्याच्याखाली नरमुंड पट्टा आहे. मुकुट अतिशय कलात्मक पद्धतीने कोरलेला आहे. कानात चक्राकार कुंडले असून ती कानाच्या पातीचा छिद्रातून वाऱ्याबरोबर हेलकावे खात असताना दिसतात. गळ्यात ग्रीवा ,हार, केयूर ,कटकवलय, पादजालक व पादवलयले इत्यादी अलंकारांनी ही भैरवी अलंकृत आहे. उजव्या खांद्यावरून डाव्या कमरेवर रूळणारी यज्ञोपवीत सदृश्य साखळी तिच्या मूळच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.. ही देवी द्विभूज असून उजवा हात तिने जमिनीकडे मोकळा सोडला आहे. त्यामुळे तिच्या हाताचा तळवा स्पष्ट दिसतो. उजव्या हातातील अंगठ्यात अंगटी आहे. खाली उजव्या पायाजवळ देवीचे वाहन कुत्रा देवीकडे पाहात बसला आहे. कटिसूत्र, उरूद्दाम, मुक्तदाम व दोन्ही पायातील कटीवस्त्राचा सोगा मोठ्या खुबीने अंकित केलेला आहे. सध्या शिल्पाचा डावा हात व डावा पाय पूर्णतः भंगलेला आहे. चेहऱ्यावर उग्र भाव दिसून येतात. या मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य खांद्यावर घेतलेला दंड होय. देवीने हा दंड आडवा धारण केलेला आहे. सुरुवातीच्या टोकास पुष्पांच्या माला लटकवलेल्या दिसतात. शिल्पाच्या मागील महिरपाप्रमाणे असलेली नक्षी शिल्पास अधिकच उठाव देते. या शिल्पामध्ये कुत्रा हे देवीचे वाहन दाखवल्याने ती भैरवाची शक्ती भैरवी ठरते.

हे शिल्प इतके सुंदर रेखीव उठावदार व अत्यंत कलात्मक पद्धतीने अंकित केलेले आहे की आजही या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव पाहणाऱ्या आपल्याकडे आकर्षून घेतात.

संबंधित मूर्तीचा फोटो लातूरचे आमचे  पोलीस मित्र धनंजय गुट्टे यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार,!

डाॅ.धम्मपाल माशाळकर.
मूर्तीअभ्यासक,मोडी लिपी व धम्मलिपी तज्ञ सोलापूर

Leave a Comment