भैरवी, जाम मंदिर –
जाम (ता.जि. परभणी) येथील मंदिराच्या बाह्यांगावर इतर सुरसुंदरीच्या सोबत भैरवी ही मूर्ती आहे. हीच्या डाव्या हातात खट्वांग आहे. पायाशी मुंडमाळ लोंबत आहे. या दोन खुणांवरून ही शैव उग्र देवता असल्याचे मानता येते. उजवा हात खंडित आहे. त्यावर कोणते शस्त्र आहे दिसत नाही. बाकी देहावरचे अलंकरण अतिशय व्यवस्थित सुंदर आहे. ग्रीविका आहे, हार लोंबतो आहे छातीवर, कमरेला मेखला आहे. मांड्यांवर मोत्याच्या माळा लोंबत आहेत. पायात तोडे आहेत. चेहरा जरा उग्र आहै.
या मंदिराचा जिर्णोद्धार करतान हे सिमेंटचे ओघळ मूर्तीवर आलेत. अतिशय देखण्या अप्रतिम शिल्पाची आपणच अशी वाट लावतो. भंजकांनी मूर्ती फोडल्या यावर आपला संताप उसळतो. मग हे स्वातंत्र्या नंतरचे विकृतीकरण करणारे कोण समजायचे?
विनम्र मूद्रेतील भक्त प्रल्हादाची दूर्मिळ मूर्ती –
जाम (ता. जि. परभणी) येथील मंदिराच्या मंडोवरावर सुरसुंदरी आणि इतर देवतांच्या सोबत जराशी आत दबलेली ही मूर्ती आहे. द्वारपाल उभे असतात तशी ही स्वागतासाठी झुकून उभी आहे. पण द्वारपाल म्हणावं तर दारावर उभी नाही. शिवाय कुठेच द्वारपाल हात जोडलेला आढळून येत नाही. ग्रीवीका, मेखला, तोडे असे अंगभर छानसे दागिने आहेत. करंड मुकूट आणि मागे प्रभावळ आहे. जोडलेल्या हातात मोत्यांची माळ आहे. चेहर्यावर नम्र सोज्वळ शांत भाव आहेत. कमरेपासून काहीशी झुकलेली अशी ही मूर्ती मोहक आहे. हीचे नेमके काय नामाभिधान आहे? अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा.
बाजूला विदारण नरसिंहाची मूर्ती आहे. त्यावरून ही मूर्ती भक्त प्रल्हादाची असावी. अभ्यासक धम्मपाल माशाळकर यांनी या मताला पुष्टी दिली आहे. इतरांनी आपली मते मांडावीत.
गावकर्यांना हात जोडून विनंती. मंदिरावर कपडे वाळत घालणे, केबलसाठीच्या वायर मुर्तीला बांधणे असले उद्योग करू नका. हे मंदिर अमुल्य असा ठेवा आहे. मूर्तीशास्त्रातील दूर्मिळ अश्या मुर्ती इथे आहेत.
छायाचित्र : Arvind Shahane परभणी.
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद