महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,039

भाजे लेणी

By Discover Maharashtra Views: 4652 3 Min Read

भाजे लेणी…

भाजे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव विसापूर किल्ल्याजवळ वसलेले असून याच्या आसपास लेणी आढळतात. भारत सरकारने भाजे लेण्यांना दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. यात सुमारे बावीस लेणी आढळतात. लेण्यांच्या मध्यभागी एक चैत्यगृह आहे. उर्वरीत एकवीस विहार दोन्ही बाजूंना पसरलेले आहेत. येथे चैत्य गवाक्षांच्या माळा आहेत. त्यांना लागून कोरीव सज्जे बनवलेले आहेत. यातील काही सज्जांवर कोरीवकामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केलेला आहे. वेदिकापट्टी वर नक्षीदार कोरीवकाम आहे.

दगडात कोरून काढलेल्या कडय़ा आहेत. या ठिकाणी गवाक्षातून युगुले कोरलेलीही दिसून येतात. तसेच येथे एक यक्षीणी कोरलेली आहे. या यक्षीणीच्या हातात धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते. चैत्यकमान कातळात कोरली आहे. या कमानीवर एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत. चैत्यगृह १७.०८ मीटर लांब, ८.१३ मीटर रुंद आणि ७.३७ मीटर उंच असे आहे. त्यात सत्तावीस अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे. या खांबांवर कमळ, चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत. एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे. स्तूपा पाठीमागील खांबांवर बुद्धाची पुसटशी चित्रे दिसून येतात.

चैत्यगृहाला लाकडी तुळयांचे छत आहे. या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख आढळले आहेत. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. येथील विहार दानातून उभे राहिलेले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात. चैत्यगृहाच्या दक्षिण दिशेस स्वच्छ पाण्याचा स्रोत आहे. येथील सूर्यलेणे प्रसिद्ध आहे. या लेण्यात पौराणिक प्रसंगांचे पट, सालंकृत-शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य-स्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहे. यात सूर्य आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे. या पहिल्या शिल्पात चार घोडय़ांच्या रथावर सूर्य स्वार होऊन चालला आहे, रथात त्याच्या मागे-पुढे त्याची पत्नी अथवा दासी आहे. त्यातील एकीने वर छत्र धरले आहे तर दुसरी चामर ढाळते आहे. त्यांच्या या रथाखाली काही असुर तुडवले जात आहेत.

अनेकांच्या मते ही सूर्यदेवता, रथातील त्या दोघी त्याच्या पत्नी संज्ञा आणि छाया तर रथाखाली तुडवला जाणारा तो सूर्याचा शत्रू राहू आहे. एका मतानुसार रथारूढ असणारे हे शिल्प शक्राचे आहे. तर काहींना यामध्ये ग्रीकांच्या हेलिओस किंवा रोमनांच्या अपोलो देवतेचा भास होतो, असेही मानले जाते. भारतीय संगीत कला संदर्भात हे लेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण येथे कोरलेल्या चित्रात तबला वाजवणारी एक नर्तिका दिसत आहे. या कोरीवकामाने तबला हा निश्चितपणे भारतात निर्माण झाला व किमान दोन हजार वर्षांपासून वापरात आहे हे सिद्ध होते

@Suresh Nimbalkar

Leave a Comment