भावे खंडोबा मंदिर | Bhave Khandoba Mandir –
पुण्यात खंडोबाची हाताच्या बोटावर मोजण्या एवढी मंदिरे आहेत. त्यापैकीच एक ९६२, बुधवार पेठ, होनाजीबाळा मंडळाजवळ आहे. भावे खंडोबा मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे. इ.स. १९०६ साली श्री. विष्णू बळवंत भावे यांनी ते बांधले. या मंदिरा बाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. विष्णू भावे हे भोर संस्थानात नोकरीस लागले. भोरला ते मढे घाटातून जात. त्या घाटात एक मुंजोबाचे छोटेखानी देऊळ होते. घाटातून जाणारे मुंजोबाला नारळ व पैसे ठेवत. एक दिवस भावे तिथून जात असताना पैसे व नारळ ठेवण्यास विसरले. त्यामुळे त्यांना ताप आला. त्यांच्या आईला काळजी वाटू लागली. त्यांचा खंडोबावर मोठा विश्वास होता. त्यांनी भक्तिभावाने खंडोबाचा धावा केला आणि विष्णुपतांचा ताप कमी झाला. ही खंडोबाची कृपा समजून त्यांनी बुधवार पेठेत हे मंदिर बांधले व तेथे खंडोबाची नित्य पूजा-अर्चा सुरू केली.
इ.स. १९२० नंतर चक्रनारायण रघुनाथ भावे मंदिराची व्यवस्था पाहात होते. पूर्वी तेथे जुना वाडा आणि छोटे पण अतिशय टुमदार मंदिर होते. पुढे सुरेश भावे यांनी इ.स. २००० साली त्या वाड्याचे मोठ्या इमारतीत रूपांतर केले. मंदिराचा गाभारा मात्र पूर्वी जसा होता तसाच ठेवला आणि पुढे हॉल तयार करून भक्तांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. ह्या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे , या मंदिरात म्हाळसा देवीची मूर्ती नाही. शिवाय खंडोबाची मूर्तीदेखील वेगळी अशी आहे. सदर मूर्ती द्विभुज आहे. खंडोबाच्या एका बाजूला इंद्र तर दुसऱ्या बाजूला विष्णूची उभी मूर्ती आहे. खंडोबाने मणि-मल्लांचा संहार केला, त्यावेळी इंद्र व विष्णु त्यांच्या सोबत होते. खंडोबाची मूर्ती साधारण दीड ते दोन फुट उंचीची आहे. बाजूच्या दोन्ही मूर्ती पण साधारणपणे त्याच उंचीच्या आहेत. मूर्तीचे हात आणि पाय वेगळे करता येतात त्यामुळे विविध वेशभूषा आणि दागिने सहज घालता येतात.
खंडोबाने मणि-मल्लाचा वध केला तो दिवस चंपाषष्ठीचा होता. त्यात रविवार आणि शततारका नक्षत्र त्यामुळे या मंदिरातील चंपाषष्ठी उत्सवाची समाप्ती ही चंपाषष्ठीला न होता शततारका नक्षत्रानुसार पुढे २ दिवसांनी होते. त्यामुळे येथील उत्सव हा ८-९ दिवसांचा असतो.
मंदिरात रोज पूजाअर्चा असते. भजन, कीर्तन हे प्रसंगानुसार कार्यक्रम होत असतात. चंपाषष्ठीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. खिचडी, कांद्याची भाजी, वांग्याची भाजी, लसुण चटणी, मिष्टान्न अशा रुचकर प्रसादाच्या जेवणाचा लाभ ३०० – ४०० भाविक घेत असतात. विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम भावे कुटुंबीय कुठलीही वर्गणी न घेता करीत असतात. सदर मंदिर प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांचे आहे.
संदर्भ: हॅशटॅग पुणे – अंकुश काकडे
पत्ता : https://maps.app.goo.gl/BECcEFf8wLyZhNTe8
आठवणी इतिहासाच्या