भव्य द्वारपाल –
कैलास लेणं (वेरूळ, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) विविध कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील एक वैशिष्ट्य आहे भव्यता. ही भव्यता कलात्मक आहे. केवळ प्रचंड मोठी एखादी ओबडधोबड वास्तु आहे असे नव्हे.(भव्य द्वारपाल)
कैलास लेण्यातील दर्शनी भागातील हे दोन द्वारपाल. सामान्य मानवी आकारापेक्षा जरा मोठेच आहेत. हातातील गदा जमिनीवर रोवून द्वारपाल अतिशय रिलॅक्स असे उभे आहेत. त्यावर त्यांची ढोपरं विसावली आहेत. त्यांच्या गळ्यातले दागिने, पायातले तोडे, कमरेची मेखला संपन्नता दर्शवतात. या भव्य मंदिरात प्रवेशणार्या भक्तांकडे ते कौतूकाने पहात आहेत.
राष्ट्रकुटांची सत्ता या काळात शिखरावर होती. त्यामुळे संपन्नता भव्यता शांतपणा असा भाव आपल्याला इथे पहायला मिळतो. ज्या ८ व्या शतकात लेणं कोरल्या गेलं त्या काळाचाही विचार केला पाहिजे. कैलास लेण्याचा विचार असा विविध पैलूंनी करता येतो. प्रत्येकवेळी भेट दिली की काहीतरी वेगळंच लक्षात येतं. सौंदर्याची प्रचिती प्रत्येकवेळी नव्याने येते.
Travel Baba Voyage thanks for Pic.
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद