श्री भवानी माता मंदिर, भवानी पेठ –
पुण्यातील अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी पेठांत, भवानी पेठेचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यातील भवानी माता मंदिराचा परिसर तर अत्यंत गजबजलेला असतो. पण, २००-२५० वर्षांपूर्वी भवानी मातेचे मंदिर हे पुण्याचे आग्नेयेचे टोक होते आणि त्यापुढील परिसर हिरव्यागार बागांनी नटलेला होता. श्री भवानी माता मंदिर, भवानी पेठ.
त्या काळी मोकळ्या असलेल्या या परिसरात व्यापारी पेठेची उभारणी केली, तर पुण्यातील व्यापारी पेठांवरील बोजा बऱ्याच अंशी हलका होईल या उद्देशाने थोरल्या माधवराव पेशव्यांनी दि. १२ एप्रिल १७६८ मध्ये महादजी विश्वनाथ लिमये, कारकून, निसबत खाजगी यांच्या नावे सनद करून नव्या पेठेची वसाहत करण्याचा कौल दिला. हा कौल मुख्यत्वे व्यापाराच्या उत्तेजनार्थ दिला होता. “पेठ भवानी येथे वाणी उदमी वगैरे कुळे आणून पेठ भरून आबादी चांगली राखणे” असा स्पष्ट उल्लेख त्यात केलेला आहे. तसेच सात वर्षांपर्यंत सरकारच्या पट्टीची म्हणजेच करांची माफीही भवानी पेठेत येणाऱ्यांना देऊ केली होती. कौलपत्रातील मजकुरात नागझरीच्या पूर्वेस भवानी देवीचे मंदिर आहे त्याच्या नजीकच्या जागेत पेठ वसवावी, असा उल्लेख आहे. त्यामुळे येथील भवानी मातेचे मंदिर इ.स. १७६८च्या आधी बांधलेले असावे, असे निश्चितपणे म्हणता येईल. त्या देवीच्या नावावरूनच या पेठेला भवानी पेठ असे नाव पडले.
हे मंदिर नक्की कोणत्या वर्षामध्ये बांधले याची कागदपत्र सध्या उपलब्ध नाही. तरी हे भवानी मातेचे भक्कम, दगडी बांधकामाचे मंदिर इ. स. १७६० च्या सुमारास बांधले गेले असा अंदाज आहे. सुतवणे-सातपुते या घराण्याकडे या मंदिराची मालकी पूर्वापार होती. सध्या मेढेकर घराण्याकडे या मंदिराची पाच-सहा पिढ्या वहिवाट आहे. मंदिराचा विस्तार मोठा आणि भव्य आहे. उत्तराभिमुख असलेल्या मुख्य दरवाजातून आत गेल्यावर समोर प्रशस्त प्रांगण आहे. प्रांगणामध्ये उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. त्यात काळ्या पाषानातल्या मूर्ती आहेत.
देवळासमोर दगडी दीपमाळ आणि त्यापुढे देवीचे वाहन सिंहाची मूर्ती आहे. त्यापुढे लाकडी खांबांवर तोलून धरलेला भव्य सभामंडप आहे. त्याच्या दोन्ही बाजूला ओवऱ्या आहेत. त्यावर रंगीत काचा लावल्या आहेत. छतावर काचेची हंड्या झुंबरे लटकवलेली आहेत. सभामंडपात डाव्या बाजूला काळ्या पाषाणातली नंदी आणि शंकराची पिंड आहे. शेजारी छोट्या मंदिरात काळ्या पाषाणातली देवीची मूर्ती आहे. सभामंडप आणि गाभारा यांच्यामध्ये अंतराळ आहे त्यात गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीवर जय – विजय यांच्या प्रतिमा आहेत. मुख्य गाभाऱ्यात काळ्या पाषाणाची भवानी देवीची मूर्ती आहे. भवानी मातेची मूर्ती कोणी आणली, कोठे आणि कोणी घडविली याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. मूर्तीची उंची २ ते ३ फूट आहे. मूर्ती चतुर्भुज आहे आणि ही मूर्ती तुळजापूरचे ठाणे आहे, अशी आख्यायिका आहे.
संदर्भ:
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां.ग.महाजन
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
पुणे वर्णन – ना. वि. जोशी
पत्ता : https://goo.gl/maps/qYk89Sr8UGSsJCzS7
आठवणी इतिहासाच्या