महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,635

पंतप्रतिनिधी, भवानराव श्रीनिवासराव

Views: 3790
13 Min Read

पंतप्रतिनिधी, भवानराव श्रीनिवासराव –

चित्रकार, कलावंतांचे आश्रयदाते व कलाप्रसारक.

सातार्‍याजवळील औंध येथील श्री भवानी पुराणवस्तुकला संग्रहालय ज्यांच्या प्रबळ इच्छा व प्रयत्नांतून साकार झाले, ते संस्थानिक व चित्रकार श्रीमंत भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांचे महाराष्ट्राच्या संदर्भात दृश्यकला क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी स्वत: संस्थानिक असूनही विपुल चित्रनिर्मिती केली असून, त्यांच्या काळातील महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश व परदेशांतील सुप्रसिद्ध चित्र-शिल्पकारांशी त्यांचा संबंध होता. याशिवाय अशा कलावंतांना ते संस्थानात आमंत्रित करत व त्यांच्या कलाकृतीही विकत घेत. परिणामी, त्यांच्या संग्रही राजा रविवर्मापासून ते सुप्रसिद्ध ब्रिटिश शिल्पकार हेन्री मूरपर्यंत व पारंपरिक लघुचित्रशैलीतील चित्रांपासून ते विसाव्या शतकात गाजलेल्या बंगाल व बॉम्बे स्कूलपर्यंत विशेष म्हणजे त्यांनी त्या सर्व जनतेला पाहावयास मिळाव्यात म्हणून स्वातंत्र्यपूर्वकाळात आपल्या हयातीतच खास संग्रहालय बांधून त्याचे लोकार्पण केले.

भवानराव पंतप्रतिनिधींचा जन्म १८६८ (शके १७९०) मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव सगुणाबाई होते. लहानपणी ते वारंवार आजारी पडत. त्या वेळी या लहान मुलास इतरांप्रमाणे खेळता-बागडता येत नसे. त्यामुळे त्यांची आई करमणुकीसाठी संस्थानाचे चित्रकार बंडोबा चितारी यांना बोलावून चित्र काढावयास लावत असे व तसा हट्ट लहानपणी भवानराव नेहमीच करत असत. त्यातून बालवयात त्यांना चित्रकलेबद्दलचे आकर्षण निर्माण झाले. शिवाय ते लहान असताना कोल्हापूरच्या आधुनिक कलापरंपरेतील आद्य चित्रकार व शिल्पकार भिवा सुतार हे काही काळ औंधमध्ये वास्तव्यास होते. त्यांनी काढलेले रामपंचायतनाचे चित्र व त्यांच्या काही हस्तिदंती मूर्ती यांचाही त्यांच्या मनावर बालपणीच संस्कार झाला.

भवानरावांचे शालेय शिक्षण १८८१ ते १८८८ या काळात सातारा हायस्कूल येथे झाले व त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याला डेक्कन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी १८९४ मध्ये बी.ए.ची पदवी प्राप्त केली व त्यानंतर एल्एल.बी. करण्यासाठी ते मुंबईला गेले. परंतु मुंबईत कायद्याचा अभ्यास करण्यापेक्षा त्यांचे चित्रकलेकडेच जास्त लक्ष होते. त्यांचे वडीलबंधू दादासाहेब पंतप्रतिनिधी यांची रविवर्मांशी मैत्री होती. त्यातून रविवर्मा यांच्याशी ओळख झाली व चित्रकलेचा नाद असल्यामुळे ते वारंवार रविवर्मा यांच्याकडे जाऊ लागले. रविवर्मा चित्र काढीत असताना पुष्कळ वेळा भवानराव ते पाहत बसू लागले. या काळात त्यांनी रविवर्मा यांच्या चित्रांच्या प्रतिकृती करण्याचाही प्रयत्न केला.

रविवर्मा यांच्याशी १८९५ ते १८९७ या काळात जो संबंध आला, त्याचा त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला. मुंबईत असताना १८९४ मध्ये त्यांना छायाचित्रणाचाही नाद लागला व पुढील आयुष्यात बराच काळ त्यांनी तो जोपासला.

त्यांचे वडील श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांनी १८९७ मध्ये भवानराव यांची औंध संस्थानाचे चीफ सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली. त्यामुळे ते औंध येथे परतले. संस्थानाच्या जबाबदार्‍या सांभाळत असतानाच त्यांना १८९७ ते १९०१ या काळात त्या काळी नवीन असलेल्या ‘एअर ब्रश’ या माध्यमाचे आकर्षण वाटू लागले व चित्रकलेसोबतच त्यांनी एअर ब्रशने (स्प्रे-गन) चित्र काढण्याचा छंद जोपासला. शिवाय या काळात त्यांनी औंध येथील मंदिरासाठी भव्य आकाराची धार्मिक विषयांवरील चित्रे काढण्यास सुरुवात केली. या सोबतच कुटुंबातील व्यक्तींना समोर बसवून त्यांची तैलचित्रेही रंगविली. १९०४ च्या दरम्यान त्यांनी औंधसारख्या छोट्या संस्थानात फोटोग्रफी व ब्लॉकमेकिंग या त्या काळी नव्याने लोकप्रिय झालेल्या कला स्थानिकांना शिकवून त्यांचा उद्योग सुरू केला. संस्थानाचे चित्रकार बंडोबा चितारी यांचे चिरंजीव रामभाऊ चितारी यांनी त्यात चांगले प्रावीण्य मिळवले.

त्यांचे चित्रकलेबद्दलचे वेड बघून त्यांना कुटुंबातील व संस्थानातील अनेकांनी ‘चितारी व्हायचे आहे का?’ म्हणून हिणवले. पण त्याकडे लक्ष न देता त्यांनी हा छंद जोपासला. त्यांची चित्रशैली काहीशी ‘नाईव्ह ’ प्रकारची होती. ती बघून मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर बेसिल स्कॉट म्हणाले की, ‘‘तुम्ही आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांप्रमाणे युरोपियन चित्रकलेची नक्कल करीत नाही. तुमची चित्रे स्वत:चीच, स्वत:च्या शैलीतील आहेत हे उत्तम.’’ पुढे त्यांच्याच सांगण्यावरून इतर युरोपियन मंडळी भवानरावांची चित्रकला आवर्जून बघू लागली. त्यांत मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडन्हॅम यांचाही समावेश होता.

ते १९०९ मध्ये औंध संस्थानाचे संस्थानिक झाले. त्यांचे एकूण तीन विवाह झाले. त्यांची कन्या कृष्णकुमारी ऊर्फ अक्काराजे यांना भवानराव पंतप्रतिनिधींनी इंग्लंडमध्ये चित्रकलेच्या शिक्षणासाठी १९३६ मध्ये पाठवले. संस्थानाच्या जबाबदार्‍या सांभाळून त्यांनी त्यांचा स्वत:चा चित्रकलेचा व्यासंग व कलावंतांना प्रोत्साहन व आश्रय देणे सुरूच ठेवले. ते १८९४ मध्ये बी.ए. झाले तेव्हापासून रामकथेची त्यांना गोडी लागली व त्यांनी १९०२ पासून रामायणावरील चित्रे काढण्यास सुरुवात केली. ही चित्रे १२’’* १०’’ आकाराची व जलरंगात आहेत. त्यांनी १९१६ मध्ये काढलेली ही चित्रे व रामायण विविध भाषांत छापण्याचा करार बॉम्बे स्टेशनरी मार्टशी झाला. त्यानुसार मराठी, इंग्रजी, कानडी, गुजराती, बंगाली, हिंदी व तामीळ या सात भाषांत हे चित्रमय रामायण छापले गेले. त्याला गव्हर्नर लॉर्ड सिडन्हॅम यांचे प्रास्ताविक होते, तर प्रस्तावना सातारचे सेशन्स कोर्टाचे न्यायाधीश व कलाअभ्यासक किंकेड यांची होती.

यानंतर त्यांचे शिक्षक सर रामकृष्ण भांडारकर यांच्या प्रेरणेने भवानरावांनी महाभारताची संशोधित चित्रमय आवृत्ती प्रसिद्ध करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. भांडारकरांसह अनेक संशोधक आणि संस्कृततज्ज्ञ या कार्यात सहभागी झाले. संस्थानातील कामाच्या जबाबदार्‍यांतून वेळ काढणे शक्य नसल्यामुळे त्यांनी चित्रे काढण्याची जबाबदारी चित्रकार एन.ई. पूरम यांच्यावर सोपविली. त्यांना दरमहा

१००/— रुपये पगार ठरला. आफ्रिकेत असलेल्या थोरल्या बंधूंच्या आग्रहानुसार जास्त पैसे मिळवण्यासाठी पूरम काम सोडून आफ्रिकेला गेले. दरम्यानच्या काळात प्रमुख संशोधकांतील काही जण निवर्तले. प्रकल्प प्रचंड खर्चाचा होता. त्यासाठी इतर संस्थानिकांनी पैसे द्यावेत असा प्रयत्न स्वत: भवानरावांनी केला. पण त्या कामी म्हणावे तितके अर्थसाहाय्य झाले नाही व प्रकल्प अपूर्ण राहिला.

परंतु हा प्रकल्प सुरू असतानाच वस्त्रे व दागिने अभ्यासासाठी १९२६ मध्ये भवानराव पंतप्रतिनिधी पंधरा चित्रकारांना सोबत घेऊन अजिंठ्यास गेले व तेथे महिनाभर राहून तेथील चित्रांच्या ५० प्रतिकृतींचा प्रकल्प त्यांनी पूर्ण केला. या कामी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे संचालक कॅप्टन सॉलोमन व रावबहादूर धुरंधर यांनी त्या काळातील उत्तम माजी विद्यार्थ्यांची शिफारस केली. त्यांत के.आर. केतकर, रविशंकर रावळ, चाफळकर, एम.व्ही. आठवले, रविवर्मा प्रेसचे बापू आपटे इत्यादींचा समावेश होता. यानंतर महाराजांनी स्वत: या विषयावर पुस्तक लिहून ते इंग्रजीत व मराठीत प्रसिद्ध केले. अजिंठ्याच्या या प्रसिद्ध प्रतिकृती त्या काळात एका दालनात लावल्या होत्या व त्या दालनास त्यांनी ‘अजिंठा हॉल’ हे नाव दिले होते. याच दालनात रोज सकाळी दुग्धप्राशनाचा कार्यक्रम होत असे.

महाराजांचे उपास्य दैवत व श्रद्धास्थान भवानी देवी व छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्रमालिकाही त्यांनी साकारली. यात भवानी देवीच्या रूपाची ६१ चित्रे व संपूर्ण शिवचरित्र असून त्यांनी चितारलेल्या शिवचरित्राचेही पुस्तक छापले आहे. महाराजांनी १९३० च्या दरम्यान औंध येथील यमाई देवीच्या डोंगरावर जाण्याच्या रस्त्याच्या पायर्‍यांची दुरुस्ती व त्याच्या दोन्ही बाजूंस संगमरवरी मूर्ती बसविण्याचा प्रकल्प सुरू केला. हत्ती, वाघ, सिंह,गरुड, हनुमंत, नारद, तुंबरू, विष्णू, शंकर अशा अनेक मूर्ती पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंस बसवायचे ठरले. त्या कामी मुंबईहून मूर्ती करून आणणे फारच खर्चाचे होते. महाराजांनी संस्थानातीलच वडार जमातीतील शिल्पकारांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून काही मूर्ती घडवून घेतल्या व स्थापित केल्या. याशिवाय निसर्गाचे सहा ॠतूही त्यांनी संगमरवरात खोदून घेतले.

मुंबईतील सुप्रसिद्ध चित्रकारांना आमंत्रित करून स्वत:ची, कुटुंबातील व्यक्तींची, तसेच विविध विषयांवरील चित्रे ते वेळोवेळी काढून घेत असत. यात १८९७ मध्ये औंध संस्थानात नाटकाचे पडदे रंगविण्यासाठी गेलेल्या श्रीपाद दामोदर सातवळेकरांपासून ते १९३६ मध्ये सुमारे सात महिने वास्तव्य केलेल्या रावबहादूर धुरंधरांसकट अनेक चित्रकारांचा समावेश आहे. याशिवाय अनेकांची चित्रे ते देशात व परदेशांतही विकत घेत. यातून त्यांचा चित्रसंग्रह समृद्ध होत गेला. त्रिंदाद, आगासकर, तासकर, हळदणकर, मुल्लर, सरदेसाई, परांडेकर, अवनींद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, इस्मत चुगताई अशा अनेक कलावंतांच्या कलाकृती त्यांच्या संग्रहात आहेत. याशिवाय त्यांनी शिवचरित्रावरील चित्रे अनेक चित्रकारांकडून काढून घेतली. यांत ए.एच. मुल्लर, रावबहादूर धुरंधर, एन.आर. सरदेसाई, चाफळकर अशा अनेक चित्रकारांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी चंदन, हस्तिदंत व धातूच्या कोरीवकामाच्या मूर्ती व लघुचित्रांचा प्रचंड संग्रह केला होता.

त्यांंनी १९३४ च्या दरम्यान आपला मौल्यवान असा सर्व कलावस्तुसंग्रह यमाई देवीच्या टेकडीच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या सपाटीवर वस्तुसंग्रहालय बांधून त्यात ठेवण्याचा व जनसामान्यांना खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे चिरंजीव अप्पासाहेब पंत १९३७ च्या दरम्यान इंग्लंडमधील ऑक्स्फर्ड विद्यापीठात शिकत होते. तेथे त्यांचा परिचय आर्विन बोशानी (१८९१—१९७५) या हंगेरियन स्टेन्ड ग्लासचे काम करणार्‍या कलावंताशी झाला. त्यांनी बोशानींचे टेट गॅलरीसाठी सुरू असलेले काम बघून औंधमधील संग्रहालयासाठीही त्यांच्याकडून काम करून घेण्याचे स्वप्न बघितले व आपल्या कलाप्रेमी वडिलांशी चर्चा केली. त्यातून ‘स्टेन्ड ग्लास’ हे माध्यम व शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायक जीवनातील प्रसंग यांचा संगम असणारा प्रकल्प आखला गेला आणि औंधच्या संग्रहालयात शिवाजी सभागृह बांधण्याची कल्पना पुढे आली.

या सभागृहाला ९ * ९ फूट आकाराच्या नऊ भव्य खिडक्या असणार होत्या व त्यात स्टेन्ड ग्लास माध्यमात शिवचरित्रातील नऊ प्रसंग साकार होणार होते. त्याची त्याच आकाराची स्केचेसही (कार्टून्स) तयार झाली. महागड्या रंगीत काचाही खरेदी केल्या गेल्या. परंतु हा प्रकल्प पूर्ण होण्याचे नियतीच्या मनात नसावे.

भवानराव पंतप्रतिनिधींनी १९३८ मध्ये गांधीजींच्या प्रेरणेने सत्तात्याग करून औंध संस्थानाचा कारभार लोकप्रतिनिधींकडे सोपविला. त्याच वर्षी औंधमधील श्री भवानी पुराण कलावस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन व लोकार्पणही झाले. जनतेच्या स्वाधीन केलेल्या या संस्थानाच्या गरजा वेगळ्या होत्या. तत्कालीन लोकप्रतिनिधी कलेसाठी एवढा खर्च करण्याच्या विरोधात गेले. महाराजांनी खाजगीतून हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आटोकाट प्रयत्न केला. पण त्यासाठी लागणारी रक्कम राजत्याग केलेल्या या संस्थानिकांना देणे कठीण होत गेले. शेवटी हा प्रकल्प अपुराच राहिला.

श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींनी आयुष्यभर इतर अनेक गोष्टींसोबत प्रामुख्याने दृश्यकलेचा ध्यास घेतला. राजघराण्यात जन्माला येऊनही व संस्थानिक होऊनही त्यांनी चित्रकला, गायन, कीर्तन, सूर्यनमस्कार अशा अनेक कलांमध्ये स्वत: प्रावीण्य मिळवले. रावबहादूर धुरंधरांकडून त्यांनी श्री शिवछत्रपती चरित्र, रघुनाथ पंडितकृत नलदमयंती आख्यान, श्रीमद्भगवद्गीता या विषयांवरील चित्रमालिका रंगवून घेतल्या.

औंध संस्थान लहानच होते. तरी त्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले. प्रजेसाठी निरनिराळ्या सुविधा निर्माण केल्या. व्यायाम, कसरती, मल्लविद्या, चित्रशिल्प, संगीत, साहित्य, कीर्तनकला अशा विविध कलांना त्यांंनी आश्रय दिला. त्या कलेतील गुणिजनांचा परामर्श घेतला. संगीत क्षेत्रातील अंतूबुवा जोशी, वेदाभ्यास करणारे पं. सातवळेकर, कीर्तन व नाटकाच्या क्षेत्रातील गोंधळी समाजाचे मार्तंडबुवा दाभाडे अशा अनेकांना त्यांनी प्रोत्साहन व मदतीचा हात दिला. संस्थानातील सामान्यांमधील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले व कलाकौशल्यात पारंगत केले. औंध येथे ‘श्री यमाई श्रीनिवास हायस्कूल व होस्टेल’ गरीब व गरजू मुलांसाठी सुरू केले. फी नाही, मोफत भोजन व उच्च शिक्षण यांमुळे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या अनेकांनी या शाळेचा लाभ घेतला. त्यात ग.दि. माडगूळकरांसारखे कवी, ड्रॉइंग इन्स्पेक्टर व गोवा स्कूल ऑफ आर्टचे पहिले प्राचार्य व्यंकटेश पाटील व पुढील काळात जे.जे. स्कूलचे शिक्षण प्रशिक्षण विभागप्रमुख झालेले प्रा. शहाणे अशा अनेकांचा समावेश होता.

आज प्रसिद्ध असलेल्या किर्लोस्कर उद्योगसमूहाला त्यांनी कुंडल येथील माळाची जागा कारखान्यासाठी दिली. आज किर्लोस्करवाडीचा शताब्दी पूर्ण केलेला कारखाना तिथे आहे. सोंडूर संस्थानात आठ प्रकारची विविध रंगांची, पांढर्‍यापासून काळ्या रंगापर्यंतची माती मिळते व ते रंग पक्के आहेत हे बघून भवानरावांनी स्वदेशी रंग करावेत असा प्रयत्न करण्यास लक्ष्मणराव किर्लोस्करांना प्रोत्साहन दिले. त्यानुसार परदेशी जाऊन माणसे शिकून आली. पण ब्रिटिश सरकारने अडथळे आणले व हा प्रयत्न सोडून फर्निचर व भिंतीच्या रंगाचा कारखाना काढावा लागला.

भवानराव पंतप्रतिनिधींचा ध्यास बघून अनेकांनी त्यांना ‘चितारी व्हायचे आहे का?’ म्हणून तरुणपणी हिणवले. सूर्यनमस्कार घालावेत म्हणून ते गावोगावी व्याख्याने देत. त्यामुळे आचार्य अत्रे यांनी त्यांचे विडंबन करणारे ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक लिहिले. पण अशा कोणत्याही गोष्टीमुळे निराश न होता श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी आयुष्यभर मनसोक्त जगले. अत्यंत व्यासंगी, विद्वान, ललित कलांचे भोक्ते व आश्रयदाते, अनेक क्षेत्रांतील कलावंतांचे साहाय्यक, संग्रहक, सूर्यनमस्काराचे पुरस्कर्ते, उत्तम प्रशासक व सामान्यांना जवळचे वाटणारे असे हे व्यक्तिमत्त्व आयुष्यभर चित्रकलेचा व्यासंग करीत राहिले.

त्यांची चित्रे भारतीय किंवा पाश्‍चिमात्य शैलीतील आदर्श कलामूल्यांचे अनुकरण करीत निर्माण झाली असली तरी त्यांत व्यावसायिक कलावंताच्या पारंगततेचा अभाव दिसून येतो. किंबहुना त्यांत एक प्रकारचे ‘नाईव्ह’ स्वरूपाचे विरूपीकरणही आढळते. वस्तुत: आधुनिक भारतीय समकालीन चित्रकलेत हेदेखील एक कलामूल्य म्हणून मान्यता पावले आहे. परंतु संस्थानिक असलेल्या भवानराव पंतप्रतिनिधींच्या चित्रांची या दृष्टिकोनातून समीक्षा झालेली नाही.

त्यांचे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झाले. आज महाराष्ट्रात त्यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेले ‘श्री भवानी पुराण – कलावस्तुसंग्रहालय’ व त्यातील चित्रसंग्रह हा महाराष्ट्राचा मौल्यवान ठेवा आहे.भवानराव श्रीनिवासराव.

संदर्भ:

१. भवानराव श्रीनिवासराव ऊर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी राजेसाहेब, संस्थान : औंध; आत्मचरित्र : खंड १ व २; १९४६.
२. ओंकार, भय्यासाहेब; ‘चित्रसौरभ’; संस्कारभारती, महाराष्ट्र प्रांत; १९९७.
३. धुरंधर, अंबिका महादेव; ‘माझी स्मरणचित्रे’; मॅजेस्टिक प्रकाशन; २०१०.
४. बहुळकर, सुहास;‘कथा शिवचित्रांच्या’; ‘दीपावली’ दिवाळी अंक; २०१०.

– सुहास बहुळकर

Leave a Comment