महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,436

भेर फुंकणे: खानदेशातील लोप पावत चाललेली परंपरा

By Discover Maharashtra Views: 1446 8 Min Read

भेर फुंकणे: खानदेशातील लोप पावत चाललेली परंपरा –

मानव मुळातच समूह प्रिय प्राणी!  पूर्वीपासून समूह करून राहताना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी हा एक उद्देश होता. समुहामुळे त्याला संरक्षण मिळाले. संरक्षणातून स्थैर्य निर्माण झाले. त्यातून वसाहतींचा जन्म झाला. वस्त्या ,गावे ,नगर ही भौतिक स्थैर्याची चढती कमान निर्माण झाली. त्याने काही रूढी परंपरा निर्माण केल्या. त्या जोपासल्या. गीत, वाद्य, नृत्य यातून त्याच्या भावना अभिव्यक्त होऊ लागल्या. आनंद प्रकट करण्यासाठी त्याने विविध वाद्यांचा वापर सुरू केला.(भेर फुंकणे)

प्राचीन काळापासून मान वाने हत्यारांचा वापर सुरू केला तसा भावना व्यक्त करण्यासाठी व समुह मालकी प्रस्थापित करण्यासाठी वाद्यांचा पण वापर सुरू केला. ही वाद्ये तो आनंद प्रसंगी वापरायचा, तसा युद्धप्रसंगी देखील वापरू लागला.

अगदी अलीकडच्या काळात देखील युद्धाच्या वेळेस आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यात वीरश्री चे बळ निर्माण करण्यासाठी, रणभूमीवर शंख ,दुंदुभी, संबळ, भेर ,तुतारी, रणशिंग, ढोल-नगारे  इत्यादी वाद्य वाजवली जात असत. ही एक प्रकारची शौर्य वाद्येच होती. लढायांचा काळ संपला तसा या वाद्यांचा वापर हळूहळू लोप पावत गेला.

खानदेश विभागातील काही गावांनी मात्र आजही काही परंपरा जोपासल्या आहेत.  त्या परंपरा तेथील लोकांच्या गतवैभवाची साक्ष देत आजही टिकून आहेत. नव्हे तर स्थानिक लोकांनी त्या टिकवून ठेवल्या आहेत. त्यापैकीच एक परंपरा म्हणजे भेर फुंकणे !

खानदेशात पूर्वी युद्धप्रसंगी वाजवले जाणारे हे एक शौर्य वाद्य आहे .याचा वापर आनंदाच्या प्रसंगी पण केला जायचा. आपल्याकडे पूर्वी एखाद्या कुटुंबात पुत्ररत्न प्राप्त झाले तर हा संदेश सर्व नातेवाईकांना पोहोचवण्यासाठी गुढी पाठवली जायची. विशेषतः वाद्य वाजवणारे एक व दोन जण, गुढी सांभाळणारा एक जण असे नातेवाईकांच्या गावी जायचे. आपण वाचत आहात संजीव बावसकर लिखित पोस्ट. वाद्यांच्या गजरात सर्व गावात गुढी फिरवली जायची. काही हौशी मंडळी साखर पण वाटायचे. प्रत्येक भाऊबंदकीतील दारासमोर गुढी उभी राहायची. अमुक अमुक यांना पुत्ररत्न प्राप्त झाले अशी द्वाही फिरवली जायची. प्रत्येक घरातून गुढीला खण, नारळ, धान्य, दक्षिणा, पाहुणचार मिळायचा .गुढी मूळ मालकाच्या घरी परत आल्यावर सेवेकऱ्यांना भरपूर बिदागी मिळायची. कालांतराने ही प्रथा लोप पावली. (आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे संदेशवहन झपाट्याने होते त्यामुळे या संदेश वाहकांची आता गरज उरली नाही हे एक महत्त्वाचे कारण आहेच)

असे असले तरी आमच्या नगरदेवळे नगरीत आजही एक परंपरा जोपासली गेली आहे. ती म्हणजे भेर वाजवणे ! पुर्वी ही भेर विवाह प्रसंगी विशेषतः हळद समारंभाच्या व विवाह समारंभाच्या वेळेस पण वाजवली जायची. रात्रीची वरात ही भेर शिवाय पूर्ण होतच नव्हती. यावेळी नवरदेव किंवा नवरी यांच्यावरून ओवाळणी टाकून हातातील सुटे नाणे  या भेरमध्ये भिरकावले जायचे. लहान पोरांपासून मोठ्यांना देखील यात मोठी गंमत वाटायची. सुट्ट्या नाण्यांनी भेर जड झाली की आतली नाणी काढून खिशात ओतली जायची. काही खट्याळपणा करणारी मंडळी हातातली सुटे नाणे भेरच्या दिशेने न भिरकावता वाजवणाऱ्याच्या दिशेने भिरकावत. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा नाणे सपकन बसायचे.त्यामुळे आज विवाह प्रसंगी भेर वाजवणे जवळपास बंद झाले आहे.

आज भेर वाजवली जाते ती कुटुंबात पुत्रप्राप्ती झाली तर काही हौशी कुटुंबे भेर वाजवतात. पुत्र प्राप्ति झाल्यापासून साधारणतः बाराव्या दिवसांपर्यंत दररोज सकाळी भेर वाजवली जाते. ज्यांच्याकडे पुत्रप्राप्ती झाली त्यांच्या सर्व भाऊबंदकितील तसेच मित्र परिवाराच्या घरासमोर सकाळी ही भेर फुंकली जाते. बारा दिवसांनंतर बाळाची बारादीचा कार्यक्रम होतो. त्यानंतर भेर वाजवणारी व्यक्ती प्रत्येक घरी जाते. त्या घरून त्यांना धान्य पैसे किंवा कपडे पण बिदागी म्हणून दिले जातात.

बाळाच्या जाऊळदान विधीच्या कार्यक्रमालाही भेर वाजवली जाते. घरापासून नदीपर्यंत जिथे आसरांची ठिकाण आहे. वाजंत्री सोबत भेर फुंकली जाते. तिच्या आवाजाने जाऊळची माहिती सर्वांना होते.

दारासमोर भेर वाजवणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. यातून भाऊबंदकी म्हणजे एकच कुटुंब आहे हा संदेश जातो. अशा आनंदातून आपसातील गैरसमज, दुरावे ,मानपान, राजकारणामुळे विशेषता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे दुरावलेली मने सांधली जातात. सर्व भाऊबंदकी एकत्र येण्यासाठी भेर वाजवण्याची परंपरा एक सामाजिक दुव्याचे काम करते. यात तिळमात्र शंका नाही.

नगरदेवळे गाव हे जहागिरीचे गाव ! त्यामुळे मुलुखगिरीवर निघताना सरदार पवार यांचे सोबत सर्वच लवाजमा निघायचा. त्यात लढणारे सैनिक, त्यांच्यासोबत इतर व्यापार-उदीम करणारी तसेच सैन्याला प्रोत्साहन देण्यासाठी शौर्य वाद्य वाजवणारी मंडळी पण असेलच. आज त्यापैकी काहीही शिल्लक नसले तरी नगारखाना ही इमारत आजही शाबूत आहे. पूर्वी तेथे व गणपती दरवाजावर दररोज नगारा वाजवला जायचा. श्रीमंत सरदार शिवराव पवार यांच्या काळापर्यंत दसऱ्याच्या मिवणुकीत गुरव मंडळी सनई चौघडा व डोंगरबुवा तुतारी वाजवायचे.

आज गावात तुतारी व सनई चौघडा वाजवणारे कुणीच शिल्लक नाही.श्री बारकू न्हावी व त्यांची दोन भावंडे तुकाराम भाऊ व अण्णा भाऊ हे तेवढे भेर वाजवण्याचे काम करतात. बारकुभाऊ गाव परिसरांमध्ये बारकू मामा म्हणून प्रसिद्ध आहेत.

गावातील प्रत्येक घर जणू त्यांना तोंडपाठ आहे. पोस्टमनला एखादा पत्ता सापडत नसेल तर तो सरळ बारकू भाऊ च्या दुकानावर जातो. ती व्यक्ती कुठे राहते, इथपासून तर ती कुणाची नातेवाईक आहे इथपर्यंतची इत्थंभूत माहिती बारकु भाऊंकडे असते. कोणती व्यक्ती गाव सोडून गेली आणि गावात राहायला नवीन कोण आले याची लेटेस्ट माहिती बारकुभाऊंकडे असते.

आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहा ही वॉर्डांचे उमेदवार बारकू भाऊंच्या दुकानाजवळ गर्दी करताना दिसतात. कारण मतदारांची ओळख पटविण्यासाठी त्यांना बारकू भाऊ हा एकमेव पुरावा ग्राह्य धरावा लागतो.

आता गाव मोठे झाल्याने सर्व समाज बांधवांमध्ये गावाची विभागणी झाली. पण आजही बारकुभाऊंकडे त्यांच्या हक्काची घरे आहेतच. गावात कुठलेही कार्य असो, विशेषतः लग्न समारंभ किंवा उत्तर कार्य, निमंत्रणाची यादी बारकु भाऊंशिवाय पूर्ण होतच नाही. त्यातल्या त्यात पाटील आणि माळी समाज बांधवांच्या भाऊबंदकीची यादी तर त्यांच्या जिभेवर आहे.

यजमानाने कुणाला निमंत्रण द्यायला पाहिजे, चुलीस निवते कुठे दिले पाहिजे, हे त्यांना माहीत असते .यजमानांच्या यादी व्यतिरिक्त त्यांचीआपली खास स्वतंत्र यादी असते .यजमानाचे कुणाशी भांडण झाले आहे ,कुठे दुरावा निर्माण झाला आहे ,अशा ठिकाणी बारकू भाऊ स्वतः चूलीस निवते देऊन येतात. (यजमानांच्या यादीत नाव नसले तरी) मग ती व्यक्ती विचारात पडते .आपल्याला निमंत्रण आले आहे तर मग जावेच लागणार, या भावनेतून सगळे कुटुंब लग्नाला हजर!  यजमानही त्यांना बघून विचारात पडतो. पण स्वतःहून आलेत, म्हणून आनंदितही होतो. भांडण विसरले जाते. दुरावा नाहीसा होतो. दोघांची गळाभेट होते. बारकूभाऊ मंडपाच्या एका कोपऱ्यातून हे सगळं बघत गालातल्या गालात हसत असतात. त्यांची मोहीम फत्ते झालेली असते.

यजमानांच्या यादी व्यतिरिक्त तीस ते पन्नास  लोकांची अशी वाढीव यादी बारकू भाऊंची असते. बारकू भाऊंची आमंत्रण देण्याचे खास लकब आहे. गल्लीत आल्यावर दारासमोर उभे राहिले की खणखणीत आवाजात ते हळी ठोकतात ,

‘ अक्काबाई, …..तापीराम तुकाराम पाटील यास्ना कळतून चुल्हीले निवतं शे, आकरा वाजता टायी आन बारा वाजता जेवण…. पाटील मंगल कार्यालय मा….हाईस सांगणं आन हाईस बलाव्हणं बरं का…..

ललकारी अशी असते की संपुर्ण गल्ली व बाजूच्या गल्लीतही कळते की उद्या कुणाकडे कार्यक्रम आहे व त्याचे कुणाला आमंत्रण आहे. साखरपुडा किंवा लग्न समारंभामध्ये काय काय साहित्य लागेल. भटजीबुवा आता कोणता विधी करतील, त्यासाठी कोणत्या वस्तू लागतील, या साहित्याची जमवाजमव त्यांनी अगोदरच करून ठेवलेली असते. त्यामुळे यजमानांची गडबड होत नाही.

यजमानांशी त्यांचे सोयऱ्याचे नाते असले तर मग विचारायलाच नको. त्यांच्या मिश्किल स्वभावाला मग चांगलाच बहर येतो. हास्याचे कारंजे फुटतात .आलेली मंडळी हसून लोटपोट होते .खेळीमेळीच्या वातावरणात कार्य संपन्न होते.

असे हे बारकू भाऊ गावातील मंडळींसाठी चालता-बोलता शब्दकोश आहेत. त्यांचा व त्यांच्या भेरचा आवाज गावाला चांगलाच परिचित आहे. बारकू भाऊ व त्यांची भावंडे आहेत तोपर्यंत भेर ऐकायला मिळणार. त्यांच्या नंतर मात्र भेर फुंकणारे कोणीच नसल्याने ही परंपरा कायमची नष्ट होणार .गावाच्या गतवैभवाच्या बुलंद बुरुजाचा भेर फुंकणे हा भेररूपी चिरा आज शाबूत असला तरी भविष्यात तो राहील की नाही याची काळजी वाटते.

संजीव बावसकर, नगरदेवळे

Leave a Comment