भिकारदास मारुती मंदिर, पुणे –
महाराणा प्रताप बागेच्या प्रवेशद्वारासमोर एक सार्वजनिक गणपती मंदिर आहे. त्याच्या उजव्या हाताला एक छोटा रस्ता जातो. तिथून आतमध्ये गेल्यावर सभोवतालच्या इमारतीमध्ये लपलेले भिकारदास मारुती मंदिर दिसते.
सुमारे शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी श्री. भिकारदास सराफ यांनी हे मारुतीचे मंदिर बांधले. त्यांच्या नावावरून त्याला भिकारदास मारुती हे नाव पडले. या मंदिराजवळील माळी वस्तीत इ. स. १८१८ सुमारास श्री. भिकारदास सराफ यांचा बंगला होता. ते गुजराती नागर समाजानले सधन गृहस्थ होते. त्यांनी शेकडो भिकारी व साधु – संतांना अन्नदान केले होते. जुन्याकाळी या मंदिराच्या परिसरात मोठी बाग व लहान घुमटी होती. त्यानंतर तिथे काही वास्तू व भव्य धर्मशाळा श्री. कृष्णदास माडीवाले यांनी बांधली. मंदिरामध्ये मारुतीची उभी,सुंदर शेंदुराचर्चीत प्रतिमा आहे. शेजारी गणपतीची छोटी मूर्ती आहे.
या मारुती मंदिरासमोर सदावर्ते यांचे राममंदिर आहे. हे मंदिर पण शंभर ते दीडशे वर्ष जून आहे. राममंदिरातील सुंदर रामपंचायतनी संगमरवरी प्रतिमा या मारुती सन्मुख उभ्या आहेत. भिकारदासमारुती मंदिरात रामनवमी, दासनवमी, हनुमानजयंती, गुरुपौर्णिमा हे उत्सव थाटाने साजरे होतात. काही वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे.
संदर्भ:
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पत्ता :
https://goo.gl/maps/p2Lf2DratgPCX7Bz7
आठवणी इतिहासाच्या