महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,786

भिल्लम पाचवा | यादवकालीन खानदेश भाग १२

By Discover Maharashtra Views: 2945 9 Min Read

भिल्लम पाचवा | यादवकालीन खानदेश भाग १२ –

भिल्लम पाचवा इथून यादव साम्राज्याची खरी कारकीर्द सुरु होते. भांडारकर यांच्या म्हणण्यांनुसार दृढप्रहर ते भिल्लम पाचवा यांदरम्यान सुमारे २३ यादव राज्यकर्ते होऊन गेले. त्यातील बरेचसे राजे हे एकाच पिढीचे (म्हणजे भाऊ) असल्यामुळे खूप साऱ्या पिढ्यांचा काळ गेला नाही. राष्ट्रकुट साम्राज्याकडून चालुक्यांचा पराभव झाला, तेव्हापासून सुमारे ४३७ वर्ष यादव राज्य करत होते. त्यामुळेच दख्खनच्या इतिहासात यादव काळाचे महत्त्व वाढते.

भिल्लम पाचवा याचे काळात यादव साम्राज्य पदाची घोषणा झाली, त्याची शिलालेख विजापूर आणि धारवाड जिल्ह्यात सापडले आहे, ते बहुतेक कानडी आहेत. त्याचे प्रतिबिंब यादवकालीन साहित्य उमटलेले आपल्याला दिसून येते.तसेच श्रीवर्धन बहुतेक बीड असावे, प्रत्यंडक म्हणजे परांडा, मंगलवेष्टक म्हणजे मंगळवेढा ,कल्याण म्हणजे कर्नाटकातील या महत्वाच्या नगरांचा उल्लेख येतो.हेमाद्रीच्या राजप्रशस्ती व्यतिरिक्त जल्हणाची सुक्तीमुक्तावली या ग्रंथात त्याचे विजयाचे गान सापडते. तसेच सोलापूर जिल्ह्यात मार्डी येथील शिलालेखात योगेश्वरदेवाचे मंदिरास भिल्लम पाचवा यांचे काळातील मिळालेली दाने सिंघण देव द्वितीय याचे काळात लिपिबध्द करण्यात आली.

चालुक्य सिंहासनावर असलेल्या सोमेश्वर चतुर्थ इ.स. ११८४-१२०० असा हा काळ आहे. बहुतेक सामंत स्वतंत्र होऊन  परस्परांच्या विरोधात ठाकले. द्वारसमुद्राचे होयसाळ, उच्छंगीचे पांड्य, गोव्याचे कदंब, वारंगळचे काकतीय हे झाले दक्षिणेकडील तसेच उत्तरेतही चाहमान, परमार, कलचुरी हे होतेच.

कलचुरी नृपती बिज्जलाने कल्याणी नगर जिंकून सार्वभौमत्वाची घोषणा केली. भिल्लमाच्या राजप्रशस्तीत उल्लेख आलेले श्रीवर्धन हे कोकणातील नसून  बीड असावे असे ब्रम्हानंद देशपांडे यांच्या म्हणणे आहे की मंगळवेढा, कल्याणी, परेंडा, या परिसरात शोधायला हवे. कदाचित ते सिन्नर असण्याची शक्यता जास्त आहे.

भिल्लमाने कलचुरी बिज्जणाचा वंशज मैलुगि याचे विरोधात विजय संपादन केला पण याच काळात चालुक्य परत थोडे स्थिरावले असे दिसते. कारण चालुक्य सोमेश्वर चतुर्थ याचे काही लेखांमधून त्याने भिल्लमाचा पराभव करून कल्याणीचे उत्तरेकडील गोदावरी नदीच्या काठावर आपल्या सैन्याचा तळ ठोकला अशी  वर्णने आहेत. ते गाव म्हणजे मंजरातिर्थ  बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील असावे.( Dr. Shrinivas Ritti, The seunas,page 74)  या पराभवानंतर थोड्याच वेळात भिल्लम याने पलत कल्याणी जिंकले असावे.

नंतर लाखुंडी जे अजून महत्वाचे नगर जिंकण्यासाठी मात्र होयसाळांबरोबर घनघोर रणसंग्राम झाला. आणि पराभव पत्करावा लागला.

भिल्लमचा उदय आणि देवगिरी –

बाराव्या शतकाच्या शेवटच्या काळात चालुक्य घराण्याचा पाडाव होताच दख्खनेत असलेल्या अस्थिरतेचा पुरपूर फायदा यादवांनी घेतला. ह्या काळात अमरमल्लुगी चा मुलगा बल्लाळ (अमरमल्लुगी हा मल्लुगी चा मुलगा) यादव साम्राज्यावर राज्य करत होता. परंतु यादव साम्राज्याची आणि देवगिरीची पायाभरणी केली ती पाचव्या भिल्लमने. भिल्लम हा मल्लुगीचा मुलगा होता किंवा पुतण्या ह्यावरून साशंकता आहे. आपल्या घराण्यातीलच दुफळी टाळण्यासाठी भिल्लमने सेउणप्रदेशाच्या बाहेर आपल्या साम्राज्याची स्थापना केली आणि दख्खनेत आपले स्वातंत्र्य घोषित केले.

भिल्लमाने आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात केली ती श्रीवर्धनचा किल्ला घेऊन पण . आणि तदनंतर प्रत्यंडगड  परांडा  वर हल्ला केला. त्यानंतर दक्षिणेच्या दिशेने जाऊन ‘मंगलवेष्टके’ म्हणजे आजचे मंगळवेढे येथील राजाची हत्या केली. अशा पद्धतीने भिल्लम हा पुणे, रत्नागिरी, सोलापूर प्रदेशावर सहज ताबा मिळवून गेला. त्यामुळे भिल्लमचे स्वतःचे साम्राज्य हे यादवांच्या मूळ ‘सेउणदेश’ पेक्षा आकाराने बरेच मोठे झाले आणि भिल्लमच्या भावंडांमध्ये वितंड वाढले. परंतु भिल्लमाने इतर सर्व यादवांना थोपवत स्वतःला राज्यकर्ता घोषित केले. ह्याचा कालखंड इसविसन ११७५ च्या सुमारास धरता येईल.

स्वतःला राज्यकर्ता घोषित करताच आपल्या कारकि‍र्दीची सुरुवातीची काही वर्षे त्याने उत्तरेकडेच्या गुर्जर आणि माळवा प्रांताशी युद्धात घालवली आणि तिथे भरपूर यशही मिळाले. त्याने थेट मारवाड पर्यंत मजल मारल्याचे दाखलेही आहेत. मुत्तुगी आणि पाटणच्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे भिल्लम हा ‘माळव्याची डोकेदुखी’ बनला होता. त्याची उत्तरेतील कारकीर्द सुमारे इसवीसन ११८४ ते ११८८ दरम्यान राहिली असावी. उत्तरेत त्याने मारवाड पर्यंत मजल मारली असल्याचे दाखले असले तरी त्याला त्या प्रदेशांचा ताबा मिळवता आला नाही, मात्र मारवाड पर्यंत मारलेली मजल त्याला आत्मविश्वास देणारी ठरली असावी. म्हणून त्याने पुढे चालून संपूर्ण दख्खनचा सम्राट होण्याचे स्वप्न आखले. आधीच दख्खनच्या वर्चस्वावरून चालुक्य, होयसळ आणि कलचुरी साम्राज्यांमध्ये तणाव होताच. त्यात शेवटचा चालुक्य राजा सोमेश्वर ह्याला दक्षिणेतून होयसळ राजा वीरबल्लाळ आणि उत्तरेतून भिल्लम ह्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागले आणि ह्यात होयसळ राजा वीरबल्लाळशी तोंड देतानाच सोमेश्वर चालुक्याचा पराभव झाला आणि तो राज्य सोडून इतरत्र निघून गेला.

याच गोंधळात भिल्लमदेवास समोर असलेली संधी दिसून आली. चालुक्य राजा सोमेश्वराने पुनःश्च सैन्य उभारून लढण्याची तयारी न दाखवता राज्य सोडून निघून जाण्याचा घेतलेल्या निर्णयाने समोरचा मार्गच मोकळा मिळाला अन होयसळ सैन्य येण्यापुर्वीच भिल्लमाने चालुक्यांची राजधानी कल्याणी (आजचे बसवकल्याण) आपल्या ताब्यात घेतली. तत्कालीन होयसळ नोंदीनुसार भिल्लमाने कल्याणीवर ताबा घेतल्याचा उल्लेख केला नसला तरी हेमाद्री (हेमाडपंत) ने त्याचा उल्लेख केला आहे. अन भिल्लमाने तत्काळ चालुक्यांच्या दक्षिणेत असलेल्या होयसळ सैन्यावर हल्ला केला. आधीच चालुक्यांवरच्या विजयामुळे आनंदात असलेल्या होयसळ सैन्याला भिल्लमाने पराभूत केले आणि म्हैसूर राज्यातील हसन प्रांताच्या भागापर्यंत थोपवून ठेवले. उपलब्ध माहितीनुसार इसविसन ११८७ ते ११८९ पर्यंत वरील घटना घडल्या असाव्यात. कल्याणीला असलेली राजधानी भिल्लमने देवगिरीला हलवली आणि आजचं देवगिरी हे शहर वसवलं. मुळात कल्याणी ही होयसळ साम्राज्याच्या अत्यंत जवळ होती, त्यामुळे बहुदा ती हलवून राज्याच्या अंतर्गत भागात हलवण्याचा विचार भिल्लमने केला असावा. भिल्लम पाचवा याने देवगिरीचा किल्ल्याच्या पायथ्याशी एक नगर वसविले.त्यास कटक म्हणजे राजधानी सैन्याचा तळ होय. महानुभाव वाड्मयात वारंवार कटक नगराचे उल्लेख येतात. या कटक कटकी- खटकी- खडकी झाले असावेत.  औरंगाबादचे प्राचीन नाव खडकी आहे. देवगिरीच्या किल्ल्यासमोरील प्रचंड मैदानात हे अवशेष दिसतात.

अशा पद्धतीने देवागिरीची पायाभरणी झाली आणि हळू हळू इथे किल्ला उभा राहत गेला. संपूर्ण किल्ला हा पाचव्या भिल्लमाने उभा केला नसला तरी त्याने त्याची सुरुवात केली हे नक्की. काहींच्या मते देवगिरीचा किल्ला हा राष्ट्रकुट राजांनी उभा केला असे मत व्यक्त केले जाते. कारण किल्ल्याच्या उभारणीतील मानवी हातांनी तासलेले कडे आणि भूलभुलय्या पाहता ते राष्ट्रकुटकालीन कार्य वाटते, असेच कार्य वेरुळच्या लेणी मध्येही आढळते, पण त्याबद्दल कुठलाही पुरावा अथवा लिखित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हा किल्ला भिल्लमानेच उभा करण्यास सुरुवात केली असे मानावे लागेल.

तिकडे दक्षिणेत पराभवाने चिडलेला होयसळ राजा वीरबल्लाळने पुनश्चः दख्खन विजयाकरिता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तत्काळ त्याने बनावासी आणि नोलमबावडी वगैरे शहरे परत मिळवली. भिल्लमला येणाऱ्या काळाची चाहूल मिळाली आणि त्याने २ लक्ष पायदळ आणि १२००० घोडदळ घेऊन धारवाड कडे प्रयाण केले. इसविसन ११९१ च्या सुमारास धारवाड मधील सोरातूर येथे ह्या दोन्ही साम्राज्यांत युद्ध होऊन त्यात भिल्लम यादवाचा दारूण पराभव झाला. भिल्लमाचा सेनापती जैत्रपाल ह्याने मोठ्या हिमतीने लोकीगुंडी (लोकुंडी) चा किल्ला लढवला मात्र तो लढाईत मारला गेला. होयसळ वीरबल्लाळने येलबुर्ग, गुट्टी, बेल्लतगी आदी किल्ले जिंकून घेतले आणि कृष्णा व मलप्रभा नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण प्रदेशावर आपला ताबा प्रस्थापित केला.

ह्या युद्धात झालेल्या दारूण पराभवात झालेल्या आघाताने भिल्लमचा मृत्यू झाला. होयसळ नोंदीनुसार भिल्लम हा युद्धात मारला गेला व त्याचे शीर बल्लाळने तलवारी वर उचलून नेल्याचे म्हणतात परंतु ही नोंद इसविसन ११९८ मधील असून ११९२ मधील गदगचा शिलालेख मात्र भिल्लमच्या मृत्यूचा उल्लेख करत नाही.

त्याच्या पराभव केल्या नंतरही होयसळ बल्लाळने कृष्णा नदी ओलांडून पलीकडे जाण्याची योजना कधी केली नाही. त्यामुळे भिल्लम हा तत्कालीन दख्खनेतील एक हुशार आणि शौर्यवान योद्ध होता असे म्हणता येईल.

भिल्लमाने आपल्या भोवती पराक्रमी सामंतांची वलय निर्माण केले. यातील काही नावे महामंडलेश्वर बंदीरस किंवा बंदुगि हा तार्दावाडी  1000 चा शासक होता, तो विजापूर येथील धनसंग्रह याचे कुलातील असून त्याचे नाव शिलाहार असे होते. “जिमुतवाहनांन्वयजात” आणि “कोपणपुरवराधीश्वर’ अशा पदव्या घेतल्या होत्या. याच कुळातील डांकरस मल्लिदेव हा सुद्धा दुसरा सामंत होता. तर कदंब कुळातील बिज्जणतृतीय हा भिल्लमाचा करडकल ३००० या प्रदेशावर म्हणजे मुदगल येथून शासन करीत असे असा उल्लेख या करडकल शिलालेखात सापडतो.

निंबाळ शिलालेखात महाप्रधान मायिदेव याचा उल्लेख आहे तर पिरापूर शिलालेखात तारीकाडू येथून शासन करणाऱ्या लक्ष्मीदेवी दंडनायकाचा उल्लेख येतो.” मगर मुरारी” त्याने बिरूद घेतले होते. हिप्परगी शिलालेखात त्याचा पट्टसहाणी, म्हणजे सैनिकी अधिकारी ,पेयिय साहणि  व त्याचे हाताखालचे अधिकारी मल्ल साहाणि यांचा उल्लेख येतोो. याशिवाय देव्ररस, वाच, भास्कर,वज्ररस, जल्ह हे शिलालेखातून समजतात.

भिल्लमाचा उजवा हात जैत्रपाल  किंवा जैत्रसिंग हा  होयसाळांविरुद्ध लक्कुंडी दुर्गा जवळ यादव सैन्याचे  प्राणपणाने रक्षण करता करता मारला गेला. सिन्नर येथील भिल्लम मठ ही वास्तू भिल्लमनेच बांधली असावी असा तर्क आहे. लीळाचरित्रात श्री चक्रधर स्वामी या मठात उतरले होते, “भिलमठीये अवस्थान: हा अंतू दैवते पुर्वे उत्तराभिमुख आसन:” इथेच महादेव यादव आणि त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

संदर्भ –
डॉ. तुळपुळे शं.गो. लीळाचरित्र पुर्वार्ध भाग १.
डॉ. श्रीनिवास रीत्ती, द सेऊणा.
खरे ग.ह. , दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड १.
तुळपुळे शं.गो. प्राचीन मराठी कोरीव लेख.
ब्रह्मानंद देशपांडे, देवगिरीचे यादव.

सरला भिरुड – खानदेश फेसबुक पेज

Leave a Comment