महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,006

किल्ले भिवगड | भिमगड

By Discover Maharashtra Views: 1559 10 Min Read

किल्ले भिवगड | भिमगड –

सहयाद्री पर्वतरांगेत अनेक गिरीशिखरे, डोंगररांगा, घाटमाथे आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी क्षत्रूपासून बचावासाठी ह्याच सहयाद्री चा ढाल म्हणून उपयोग करून घेतला तो आपल्या अफाट अचाट अशा दुर्गबांधणी  कौशल्याच्या बळावर. पूर्वी घाटमार्गच्या व व्यापारी मार्गांच्या संरक्षणासाठी व क्षत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच युद्धप्रसंगी लढण्यासाठी डोंगररांगा मध्ये अनेक गडकिल्ले बांधले.अशाच एका छोटेखानी परंतु लष्करी दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या किल्ले भिवगड | भिमगड किल्याची सफर आपण करणार आहोत.

महाराष्ट्राच्या रायगड जिल्यातील कर्जत या तालुक्यातील कर्जत डोंगररांगेत समुद्रसपाटी पासून ८२५ फूट उंचीवर असलेला सोप्या श्रेणीचा एक गिरीदुर्ग म्हणजे किल्ले भिवगड स्थानिक ह्या किल्याला भिमगड असेही म्हणतात. विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांनी जे १११ नवे किल्ले वसवले त्यामध्ये ह्या किल्याचा समावेश होतो याचा पुरावा सभासद बखर मध्ये पहायला मिळतो. परंतु ह्याच नावाचा किल्ला कर्नाटक राज्यातही आहे त्यामुळे ह्या दोन पैकी नक्की कोणता किल्ला शिवरायांनी बांधला ह्याला अधिकृत दुजोरा मिळत नाही. कर्जत डोंगररांगेत कोथळीगड, ढाक-बहिरी आणि भिवगड हे तीन किल्ले येतात. कर्जत तालुक्यातील वदप व गौरकामत ह्या दोन गावाच्या पूर्वेला अगदी मधोमध एका डोंगरावर एक छोटेखानी किल्ला स्थित आहे. पूर्वी मावळात जाण्यासाठी येथून दोन व्यापारी मार्ग होते एक जो आज ढाक किल्यावर जाण्यासाठी वापर होतो तो म्हणजे ढाक बहिरी मार्ग व दुसरा तो खांडशी मार्ग जो आज अस्तित्वात नाही. ह्यामुळेच ह्या किल्याची निर्मिती ही ह्या व्यापारी मार्गांच्या संरक्षणासाठी केली गेली असावी. हा किल्ला पाहिल्यावर तो एक लष्करी ठाणे असावं असं वाटतं.

भिवगडावर जायचं असल्यास मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकाच्या पूर्वेला ८ किमी अंतरावर असलेल्या वदप व गौरकामत ह्या दोन्हीही गावातून रस्ता आहे. त्यात गौरकामत ह्या गावाच्या समोर असलेल्या डोंगराच्या सोंडेवरून एक मार्ग आहे तो अधिक उत्तम आहे. ह्या मार्गाने अवघ्या ३० मिनिटात आपण किल्ल्यावर पोहचतो. ह्या वाटेने गेले असता उजव्या बाजूला एक छोटं टाकं लागते जे मागील दोन वर्ष आधी नव्याने शोधलं गेलं आहे. त्याचा समोरचा भाग हा मातीमध्ये गाडला गेला आहे आत जायचं असेल तर पूर्ण झोपूनच जावे लागते. ह्या टाक्यात मे महिन्यापर्यंत पाणी असतं. ह्या टाक्यांच संवर्धन केलं तर नक्कीच काही नवीन अवशेष पहायला मिळतील. पुढे चालत गेल्यावर पूर्ण कातळ फोडून एक ४ फूट रुंदीची वाट बनवून त्यावर कातळात पायऱ्या कोरल्या आहेत.पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने आज त्या पायऱ्या जवळजवळ नष्ट झाल्या आहेत. त्यांच्या उजव्या बाजूला अजून दोन गुफा आहेत असा फलक लावला आहे तेथे जायला जवळजवळ दहा फूट उंच चढाव लागतं. आणि तिथे सहजासहजी जाता येत नाही.पूर्वी तेथे जाण्यासाठी एक लाकडी जिना असायचा असा एक संदर्भ मला मिळाला आहे.

खरं तर ह्या गुफा नसून एक लेणी आहेत त्यात जी साधारण १० फूट खोल व ३०x२० फूट ह्या आकाराची आहे ते म्हणजे एक धान्याचे कोठार आहे. तीच प्रवेशद्वार हे ३.५x२.५फूट इतकं आहे त्याचा उजव्या बाजूला एक वीर वाघाची ची शिकार करत आहे असं दगडात कोरलेलं एक शिल्प ठेवलं आहे. ह्या शिल्पाला व्याघ्रगळ असेही म्हणतात. त्या विराच्या उजव्या हातात एक धारदार शस्त्र  व डाव्या हातात गोलाकार असलेले वस्तू दिसते. असेच एक शिल्प किल्याच्या पश्चिम दिशेला असलेल्या पाण्याच्या टाक्याचे येथे पहायला मिळते तेथे रानडुक्कराची शिकार करतानाच शिल्प कोरलं आहे. या ध्यानकोठराच्या डाव्या बाजूस एक देवडी कोरली आहे.त्यावेळी भिवगडाच्या पायथ्याशी जत्रा देखील भरायची तेव्हा रानडुक्करच्या रक्ताचा अभिषेक दिला जायचा अशी प्रथा होती म्हणून त्या प्रसंगाचं शिल्प कोरून ठेवलं असावं. तिच्या बाजूची असणारी लेणी म्हणजे क्षत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केलेली एक जागाच आहे असं लक्षात येत.

ह्या लेणी पाहिल्यानंतर पायऱ्या वरून चालत गेल्यावर समोर पुन्हा काटकोनात वळलेला मार्ग दिसतो तेथील पायऱ्या मात्र सुस्थितीत आहेत.प्रवेशद्वारचे अवशेष कुठेच दिसत नाही मात्र दरवाजा लावण्यासाठी एका पायरीवर काही कोरलेल्या खुणा मात्र दिसतात. पायऱ्या चढून वरच्या दिशेला जाऊन पाहिल्यास गोल आकारात खणलेले खळगे व विशिष्ट प्रकारच्या खाच्या सदृश्य खुणा दिसतात. तेव्हा एक अंदाज करता येतो ह्या ठिकाणी दरवाजा असला पाहिजे. पुढे काही पायऱ्या चढल्यावर ३० फूट लांब व ७ फूट उंचीची एक तटबंदी पहायला मिळते. या तटबंदीचे काही पडलेले चिरे पुढच्या भागात दिसतात.पुढे गेल्यावर अजून एक टाकं लागतं ते म्हणजे नवा अर्चना टाके.  ह्या टाक्याच आता खोदकाम करण्यात आलं. समोरून २५ फूट दिसनार हे टाकं आत मध्ये ४८x२८फूट आकाराचं व ६.५ फूट उंचीच हे टाकं समोर आलं. ह्या टाक्याच्या किल्यावरील एक  गुप्त ठिकाण असावं असं वाटतं कारण त्याच्या एका बाजूला दगडात कोरलेल्या बसण्यासाठी च्या जागा दिसून येतात.नंतरच्या काळात त्याचा पाण्याचं टाकं म्हणून उपयोग झाला. टाक्याच्या वरच्या बाजूस दिवा लावायची एक छोटी जागा केलेली आहे. दिव्याच्या धुराने त्याच्या वरची जागा काळवंडली आहे याचाच अर्थ स्पष्ट होते ही एक दिवा लावायची जागाच आहे. ह्या टाक्याच्या बाहेरील बाजूस पाणी बाहेर जाण्यासाठी एक दगडी पन्हाळी देखील काढली आहे. व त्याचाच शेजारी निरिक्षण केल्यावर सात-आठ पिंडी देखील कोरलेल्या दिसतात.

थोडं पुढे गेल्यावर उत्तरेला जिथे ध्वज लावला आहे तेथे आपल्याला काही खळगे पहायला मिळतात. पूर्वी ह्या ठिकाणी लाकडी तटबंदी असायची त्याचा हा पुरावा वाटतो.हे पाहिल्यावर वरच्या दिशेला चालत गेल्यावर किल्याच्या पश्चिमेस थोडं खाली उतरल्यावर पाण्याचे एक टाके लागतं मे अखेरीस ह्या टाक्यात पाणी पहायला असतं. ते पाहिल्यावर वरच्या दिशेला येताना पुन्हा खाली गेल्यावर अजून पाण्याचे दोन टाके लागते त्यात एक टाके कोरडे तर दुसऱ्यात बारमाही पाणी असतं. हे पाहिल्यावर पुन्हा वर आल्यावर  समोरच आपण किल्याच्या बालेकिल्ला असं फलक लावलेल्या ठिकाणी येतो पण येथे कोणतेही अवशेष दिसत नाहीत. बालेकिल्याच्या समोर पाण्याचे ३ टाके दिसतात. त्यात एका टाक्यात मे अखेरीस पाणी असतं पण ते दूषित असतं. जानेवारी अखेरीस पाणी असतं. त्याच्या बाजूला गोल गोल कोरलेले अनेक खळगे पहायला मिळतात ते खळग्याचं वापर हा त्या टाक्यातील पाण्यात कोणत्याही प्रकारची घाण जाऊ नये यासाठी केला जायचा.म्हणजे त्या खळग्यामध्ये लाकडी मेट असायची त्याला ते आवरण बांधलेलं असायचं .त्यापुढेही तिथे खूप सारे खळगे पहायला मिळतात तेथेही लाकडी तटबंदी असावी.तेथे पुढे आज एक भगवा ध्वज मोठया अभिमानाने फडकताना दिसतो. पुढे जे टाके आहे ते २०x८ फूट आकाराचं व १० फूट खोलीचं आहे. तेथे फक्त पावसाळी पाणी असतं. हे टाके पाहिल्यावर वर समोरच एका ९०x ६० फूट आकाराचं आयताकृती दगडी चिरे वापरून बांधलेली भिंत दिसते. त्यावर काही जोत्याचे अवशेष पहायला मिळतात.

जोत्याच्या खालच्या बाजूस खालच्या दिशेने पुढे गेल्यावर वदप ह्या गावातून किल्यावर येणारा रस्ता दिसतो. खाली न जाता पुढे गेल्यावर पाण्याचे आणखी एक टाकं लागतं. ते कोरडे टाके आहे पावसाळयात त्यात पाणी असतं. त्याच्याही पुढे गेल्यावर अजून एक टाकं लागतं तेही कोरडे आहे. त्याला लागूनच एक २५x१५फूट आकाराचं खांब टाके लागते .खांब टाके म्हणजे दगडी खांबावर उभारलेले टाके होय.हे टाके दोन खांबावर उभे आहे त्याची उंची ७ फूट पर्यंत असेल तिथेही जर का खोदकाम झालं तर आणखीणच त्याची खोली असू शकते असे वाटते. जवळजवळ ह्या किल्यावर पाण्याचे ११ टाके पहायला मिळतात.पुन्हा माघारी आल्यावर समोरचं तटबंदीचे काही अवशेष पहायला मिळतात. किल्याच्या दक्षिणेकडे खाली गेल्यावर आपल्याला पूर्ण कातळ खणून बनवलेला ६ फूट रुंदीचा खंदक दिसतो आणि हा खरोखर पाहण्यासारखा आहे. अशाच प्रकारचा अजून एक खंदक किल्याच्या उत्तरेला देखील आहे. अजून खाली गेल्यावर समोरच्या डोंगरावर किल्ले ढाक ला जाण्याचा मार्ग दिसतो. भिवगड पासून ढाक ला जायला ४ तास तरी लागतात.

किल्ल्यावरून पश्चिमेकडे आपल्याला माथेरानची डोंगररांग दिसते त्यात माथेरान, इर्शाळगड,विकट गड,नखिंड नेढे,चंदेरी किल्ला व पूर्वेस भिमाशंकर डोंगररांग दिसते. पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य तर आपल्याला भुरळ घालतं. ढाक कडे जाण्याचा वाटेवर वदप चा धबधबा देखील पर्यटकांचं लक्ष वेधून घेतो.हा किल्ला आकाराने जरी लहान असला तरी किल्ल्यावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या,पाण्याचे अनेक टाके, तटबंदी, गुहा,दगडी भिंत, खंदक व जोत्याचे अवशेष पाहता हा किल्ला नक्कीच महत्त्व पूर्ण असणार आहे याची कल्पना येते. पाण्याच्या टाक्यांची  संख्या ही जास्त असल्याने येथे शिबंदी ही जास्त असली पाहिजे. कारण ज्या किल्यावर जास्त शिबंदी असायची त्या किल्यावर पाण्यासाठी जास्त टाक्यांच खोदकाम केलं जायचं. त्यामुळे हा किल्ला घाटवाटेवरच संरक्षण किल्ला होता हे निर्विवाद सत्य म्हणावे. येथे मला एक सांगावेसे वाटते ते म्हणजे ह्या किल्याला पूर्वी लाकडी तटबंदी असायची कालांतराने येथे भिवगडाला काही कारणास्तव आग लागली असावी. असे पुरावे देखील मिळाले आहे.

किल्याबद्दल एक नक्कीच सांगावस वाटतं ते म्हणजे ह्या किल्यावर दुर्ग संवर्धनाचं कार्य गेली अनेक वर्षा पासून सुरू आहे. दुर्गवीर प्रतिष्ठाण व राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेने जवळजवळ चार वर्षे ह्या किल्यावर संवर्धनाच कार्य केलं. आता ह्या ठिकाणी भिवगड अखंड संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने राजे प्रतिष्ठान दुर्ग समिती व दुर्गजागर समिती हे कार्यरत आहेत. एकूणच हा किल्ला पाहिल्यावर आपल्याला शिव वैभव पाहिल्याची प्रचिती येते. तेव्हा ह्या किल्याला आपण जरूर भेट द्यावी.आणि ह्या किल्याचा ब्लॉग लिहितांना मला दुर्ग अभ्यासक तसेच भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे ह्यांचे आजीव सभासद श्री सागर सुर्वे यांची विशेष मदत झाली त्यांचे मी आभार मानतो. ह्या किल्याचा माझ्या vikas zanje vlogs ह्या यू ट्युब वरील चॅनेलवर माझा आणि माझ्या चार वर्षीय मुलाचा व्हिडिओ देखील आहे तो ही पहावा. व चॅनेलला नक्की सबस्क्राईब करावं ही छोटीशी विनंती. जय शिवराय.

Vikas Zanje

Leave a Comment