भिवगड…
इतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासाने त्याची नोंद घेतली नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशाच अनेक गडापैकी एक गड किल्ले भिवगड. मुंबई- पुण्याहून जवळ असूनही गिरीमित्रांचे पाय येथे वळत नाही. नाही म्हणायला ढाक बहीरीला जाणारे भटके थोडी वाट वाकडी करून या किल्ल्याला धावती भेट देतात. पावसाळ्यात मात्र वदप गावामागे असलेला धबधबा पहायला येणारे काही पर्यटक या गडावर येतात. सतत उपेक्षित राहिलेल्या भिवगड गडाची माहिती सहजतेने सापडतही नाही.
भिवगड उर्फ भिमगड कर्जत जवळील वदप व गौरकामत या दोन गावांच्या मागे छोट्याश्या टेकडीवर उभा आहे. चिंचोळ्या आकाराचा हा गड उत्तर-दक्षिण पसरलेला असुन गडाची समुद्र सपाटीपासुन उंची ८५० फुट आहे. गडाची लांबी रुंदी १००० x १५० फुट असुन गडाचे माथ्यावरील एकूण क्षेत्रफळ चार एकर आहे. कर्जतपासुन ५ कि.मी.अंतरावर वदप गाव आहे. वदपच्या पुढे १ कि.मीवर गौरकामत गाव आहे. या दोनही गावातुन भिवगडावर अर्ध्या तासात जाता येते. वदप गावातून गौरकामत गावाकडे जाताना वाटेत गौरमाता मंदीराकडे अशी पाटी दिसते. येथुन उजव्या हाताचा वाडीतून जाणारा रस्ता गौरमाता मंदिराकडे जातो. मंदिराकडे रस्ता संपतो तेथे गाडी ठेवुन इलेक्ट्रीकच्या खांबाच्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेने भिवगड डावीकडे ठेवत १५ मिनिटे चढल्यावर आपण भिवगडच्या खिंडीत येतो. खिंडीत पोहचल्यावर उजव्या बाजूची वाट ढाकला जाते तर डाव्या बाजूची वाट भिवगडावर जाते. या खिंडीतुन १० मिनिटात गडावर जाता येते.
गौरकामत गावातूनही एक वाट डोंगराच्या सोंडेवरुन भिवगडावर येते व हिच गडावर येणारी मुख्य व सोयीची वाट आहे कारण वदप गावातुन चढल्यास संपुर्ण किल्ला व अवशेष पहायला आपल्याला गौरकामत गावाच्या वाटेला अर्ध्यापेक्षा जास्त किल्ला उतरावा लागतो व गाडी वदप गावात असल्याने परत चढुन यावे लागते किंवा तसेच खाली उतरून किल्ल्याला वळसा मारून परत वदप गावात यावे लागते,त्यामुळे गौरकामत गावातुनच चढाई करावी. किल्ल्याची जुनी व मुख्य वाट हीच असुन सर्व अवशेष या वाटेवरच आहेत. गौरकामत गावातून गडावर चढाई करताना सर्वप्रथम कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. या भागात खुप मोठया प्रमाणात घडीव दगड व गोटे पसरलेले आहेत. येथेच गडाचा मुख्य दरवाजा असण्याची शक्यता आहे. या ठिकाणाच्या उजव्या बाजुला कड्याच्या वरील अंगास दोन गुंफा कोरलेल्या दिसतात. या दोनही गुंफांना प्रमाणबद्ध दरवाजे खोदलेले असुन पहिली गुंफा ४०x ३०x १५ आकाराची आहे. या गुंफेच्या बाहेरील भिंतीवर चौकट खोदलेली असुन गुंफेबाहेर एक मानव व पशु कोरल्याचे शिल्प ठेवलेले आहे.
दुसरी गुंफा या गुंफेच्या वरील बाजुस असुन अर्धवट खोदलेली आहे. येथुन पुढील चाळीस ते पन्नास फुटाचा मार्ग कातळात खोदलेला असुन पायरीमार्ग आहे. या पायऱ्यानी वर आल्यावर काही बांधीव पायऱ्या व गडाची मातीत गाडुन गेलेली तटबंदी नजरेस पडते. या पायऱ्या चढुन आल्यावर आपला गडाच्या माचीत प्रवेश होतो. येथे समोरच कातळात खोदलेले पाण्याचे भुयारी टाके आहे असुन टाके पाण्याने पुर्ण भरल्यावर त्यातुन पाणी बाहेर वाहुन जाण्यासाठी कातळात चर खोदला आहे. गडावर पाण्याची एकुण नउ टाकी असुन त्यातील एक सातवाहनकालीन खोदीव खांबटाके आहे. नउ टाक्यापैकी सहा टाकी ओहरलेली असुन केवळ तीन टाक्यात वर्षभर पाणी असते पण पिण्यायोग्य पाणी फक्त भुयारी टाक्यात आहे. भुयारी टाक्याच्या वरील बाजुने बालेकिल्ल्यात जाणारी वाट आहे तर समोर जाणारी वाट एका खोदीव टाक्याकडे जाऊन संपते. बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत उजव्या बाजुला उतारावर कोरलेली दोन टाकी दिसतात तर मागील बाजुस जाणारी वाट किल्ल्याच्या सोंडेकडे जाते. या टोकावर काही खळगे असुन डोंगराचा पुढील भाग येथुन किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी चाळीस ते पन्नास फुट खोल तासुन किल्ल्यापासून वेगळा केलेला आहे. येथुन गडावर येणारी संपुर्ण वाट नजरेत भरते व हि वाट वरून माराच्या टप्प्यात आहे. या वाटेवरून मागे फिरून बालेकिल्ल्याकडे जाताना एक छोटीशी घळ ओलांडुन आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो.
बालेकिल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी एक वाट डावीकडे जाताना दिसते. या वाटेने पुढे गेल्यावर कातळात खोदलेले ५० x ४० फुट लांबीरुंदी असलेले प्राचीन खांबटाके दिसून येते. या टाक्याला जोडूनच उघडयावर अजुन एक खोदीव टाके आहे. या टाक्याच्या पुढे काही अंतरावर अजुन एक टाके आहे. हे सर्व पाहुन आल्यावाटेने परत बालेकिल्ल्याकडे निघावे. बालेकिल्ल्यावर प्रवेश केल्यावर समोरच खडकात खोदलेली दोन पुर्ण व दोन अर्धवट कोरलेली टाकी, खळगे व डौलाने फडकणारा भगवा ध्वज दिसतो. समोरील बाजुस वाड्याची मातीत अर्धवट गाडलेली भिंत दिसते. येथुन पुढे गेल्यावर समोरच्या डोंगरावर ढाक बहिरीची चढत जाणारी वाट दिसते. गडाच्या या टोकास मातीत गाडला गेलेला बुरुज व तटबंदी असुन येथे देखील डोंगराचा पुढील भाग तीस ते चाळीस फुट खोल तासुन किल्ल्यापासून वेगळा केलेला आहे. डोंगर तासल्याच्या खुणा येथे स्पष्ट दिसतात. गड राबता असताना येथुन गडावर प्रवेश नव्हता पण आता मात्र या घळीत तटबंदी कोसळुन हि घळ काही प्रमाणात दगडमातीने भरली आहे व येथुनच गडावर यायची वाट तयार झाली आहे. गडाच्या बालेकिल्ल्यावरील वाडा हा गडाचा सर्वोच्च भाग असुन असुन येथुन सोंडाई,इरशाळगड,प्रबळगड माथेरान डोंगररांगेपर्यंत दूरवरचा प्रदेश दिसतो. गडाचे अवशेष खुप मोठया प्रमाणावर मातीखाली गाडले गेले आहेत. गडाची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार अस्तित्वात नसले तरी त्यांचे अस्तित्व जाणवते. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. इतिहासाची पाने चाळली असता या किल्ल्याबाबत काहीही माहिती मिळत नाही.
मुंबईतील दुर्गवीर संस्थेने या गडावर दुर्गसंवर्धनाचे काम हाती घेतले आहे व भिवगडाच्या डोंगराला त्यांनी खऱ्या अर्थाने गडपण प्राप्त करून दिले आहे. रविवार या सुट्टीच्या दिवशी गडावर मोहिमा करून गडावरील काही टाक्यांची सफाई करून त्यातील गाळ काढण्यात आला आहे. मातीत गाडलेली भिंत माती उकरून बऱ्यापैकी मोकळी करण्यात आली आहे. वदप गावाकडून गडावर जाणारी वाट दुरुस्त करण्यात आली असुन जागोजागी अवशेषांचे ठिकाण दर्शविणारे फलक लावले आहेत. दुर्गवीरच्या या मावळ्यांना मानाचा मुजरा !!!!!!
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
महाराष्ट्रातील गडकिल्ले पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
खांदेरीचा रणसंग्राम वाचण्यासाठी येथे क्लिक करा.