भोग नरसिंह आणि योग नरसिंह –
डावीकडची साधी सुबक मूर्ती आहे भोग नरसिंहाची. यालाच लक्ष्मी नरसिंह असेही म्हणतात. डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मागे ९ फण्यांचा नाग आहे. मूर्तीला फार विशेष अलंकरण असं काही केलेलं नाही. ही मूर्ती बोरकीनी नावाच्या सेलू तालूक्यातील देवगाव फाट्या जवळील छोट्या गावातील आहे. प्राचीन जूनं मंदिर आता आधुनिक करण्यात आलं आहे. मंदिरा जवळ पडझड झालेली प्राचीन बारव आहे. या बारवेची दूरूस्ती डागडूजी होण्याची अत्यंत गरज आहे.(भोग नरसिंह आणि योग नरसिंह)
उजवीकडची मूर्ती योग नरसिंहाची आहे. ही मूर्ती आधीच्या मूर्तीपेक्षा प्राचीन आहे हे सहजच लक्षात येते. ही मूर्ती नांदेड जवळच असलेल्या शंखतीर्थ येथील मंदिरातील आहे. नरसिंहाच्या चेहर्यावरील भाव शांत आहेत. योग मूद्रेतील दोन हात आहेत त्यातील उजव्या हातात अक्षमाला आहे. पायात योगपट्टा आहे. मागे प्रभावळ असून त्यावर दशावतार कोरलेले आहेत. या मंदिराचा अतिशय चांगल्या पद्धतीनं जिर्णोद्धार झाला आहे.
शंखतीर्थ गोदावरी नदीच्या काठावर आहे. या जागेला गोदावरीचे नाभीस्थान समजले जाते. तसा गौरवपूर्ण उल्लेख दासगणु महाराजांनी आपल्या गोदा महात्म्यात केला आहे. नरसिंह मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ही मंदिरे नेहमीच पाण्याच्या जवळ बांधली जातात. नदी नसेल तर किमान सुंदर बारव तरी मंदिरा जवळ असतेच.
ही दोन्ही मंदिरं जिर्णोद्धाराचे दोन नमुने आहेत. बोरकिनी येथे आधुनिक सिमेंटीकरणाच्या नादाला लागुन प्राचीनत्व नष्ट केल्या गेलं तर शंखतीर्थ येथे काळजीपूर्वक जिर्णोद्धार झाला जेणेकरून मंदिराचे प्राचीनत्व बर्याच प्रमाणात राखले गेले.
(फोटो सौजन्य भोग नरसिंह- मल्हारीकांत देशमुख परभणी, योग नरसिंह- डाॅ. नंदकुमार मुलमुले नांदेड)
(ही लेखमालेसाठी तूमच्या भागातील मूर्तींचे छायाचित्र, माहिती पाठवा. तूमच्या नावाचा सन्मानपूर्वक उल्लेख केला जाईल. मूर्ती व मंदिर संवर्धन, जतन, जागृतीची ही चळवळ आपण सगळे मिळून पुढे नेवू या.)
– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद