भोरगीरी | Bhorgiri Fort
भिमा नदीचा उगम सह्याद्रीतील भिमाशंकर या डोंगररांगेत होतो व या डोंगर रांगेच्या पायथ्याशी असणारी जमीन सुपीक करत ती राजगुरूनगर येथे येते. भिमा नदीच्या या खोऱ्यात वसलेला एक छोटेखानी दुर्ग म्हणजे भंवरगिरी उर्फ भोरगीरी (Bhorgiri Fort). भोरगिरी – भिमाशंकर – खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग होता. त्याकाळी कल्याण बंदरात उतरणारा काही माल ह्या मार्गाने घाटावर खेड राजगुरूनगरकडे येत असे. भिमाशंकरच्या पायथ्याशी कोकणच्या बाजुला खांडस गावाकडे पदरगड तर घाटावरील बाजुला भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधले गेले.
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या तालुक्याच्या ठिकाणाहुन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भोरगिरी गावात जाता येते. राजगुरुनगर हे पुणे नाशिक रस्त्यावर चाकणपासून १० कि.मी.वर आहे. राजगुरुनगर ते भोरगिरी हे अंतर साधारण ५० कि.मी.असुन राजगुरुनगर येथे डावीकडे वळून चासकमान, वाडा या गावांवरून टोकावडेमार्गे जाणारा रस्ता भोरगिरी गावात जातो. इथून पायवाटेने भीमाशंकर फक्त सहा किलोमीटरवर आहे. भोरगिरी हे दोन वाड्यांचे लहानसे गाव असुन गावाच्या उजव्या बाजुच्या टेकडीवर असलेला लहानसा भोरगिरी किल्ला त्यावरील कातळात खोदलेल्या गुहा आणि भगवा ध्वज यामुळे सहजपणे नजरेस पडतो. गावात शिरतानाच भीमा नदीच्या काठावर मुळ गर्भगृह कायम ठेवुन नव्याने बांधलेले कोटेश्वर मंदिर दिसते. मंदिराच्या आवारात अनेक कोरीव दगड विखुरलेले आहेत. यात मंदिराचे खांब,भारवाहक, कीर्तिमुख, वीरगळ, कळसाचा आतील भाग तसेच दोन शरभ दिसुन येतात.
पारावर मनुष्य आणि वाघाचा युद्धप्रसंग कोरलेले शिल्प ठेवले आहे. विखुरलेल्या या अवशेषावरून मंदिराच्या भव्यतेची कल्पना करता येते. साधारण ९-१० व्या शतकात शिलाहार वंशीय झंझराजाने जी १२ शिवमंदिरे बांधली त्यातील एक म्हणजे भोरगिरी उर्फ भवरगिरी गावातील कोटिश्वर मंदिर होय. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंडी असुन गाभाऱ्या बाहेर गणपतीचे एक आगळेवेगळे शिल्प आहे. जेमतेम दीड फूट उंचीच्या उभ्या असलेल्या या गणेशमूर्तीच्या कमरेखालील बाजुस मुलींच्या स्कर्टप्रमाणे वस्त्र कोरलेले आहे. चतुर्भुज गणेशाच्या उजव्या हातात परशू असुन डाव्या हातातील फळावर गणपतीची सोंड टेकलेली आहे. गडावरील गुहेत गावातुन वीज नेली असल्याने या खांबाच्या आधारे गडावर जाणारी वाट सहज कळून येते. गावातून अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो.
पायथ्याशी वनखात्याने निवारा बांधलेला असुन गडावर जाणारी वाट खोदुन प्रशस्त केलेली आहे. या वाटेवर पायऱ्या बांधण्याचे तसेच लोखंडी कठडे उभारण्याचे काम चालू आहे. डोंगर डावीकडे ठेवून वळसा मारत गडाची वाट वर जाते व आपण गडाखाली असणाऱ्या दोन गुहाच्या पहिल्या टप्प्यात पोहोचतो. गुहेचे एकंदरीत खोदकाम आणि आतील रचना पहाता या बौद्ध भिक्षुंसाठी खोदलेल्या लेण्या वाटतात पण नंतरच्या काळात त्याचे रुपांतर देवस्थानात झाले आहे. पहिली गुहा ओसरी आणि गर्भगृह अशी दोन भागात विभागलेली असुन ओसरीच्या दोनही बाजुला पाण्याची कोरडी पडलेली टाक आहेत. आतील गुहा चार खांबांवर तोललेली असुन आत अलीकडील काळात देवीची मुर्ती बसवलेली आहे. हि गुहा खूप मोठया प्रमाणात पाझरत असल्याने आत गुडघाभर पाणी जमा झाले आहे. सध्या पिण्यासाठी हेच पाणी वापरले जाते.
गुहेच्या बाहेरील बाजुस डाव्या बाजूच्या कोरड्या टाक्याशेजारी पिंडी व नंदी आहे. या गुहेच्या पुढे एक अर्धवट खोदलेली गुहा असुन त्याच्या पुढे दुसरी गुहा आहे. हि गुहा प्रशस्त असुन गडावर राहण्यासाठी योग्य ठिकाण आहे.हि गुहा देखील ओसरी आणि गर्भगृह अशी दोन भागात विभागलेली असुन बाहेरील ओसरी चार खांबांवर तोललेली आहे. गर्भगृहात शिवलिंग असुन बाहेरील भिंतीवर नागशिल्प कोरलेले आहे. गुहा पाहुन झाल्यावर मागे फिरावे व आल्या वाटेने डोंगर चढायला सुरुवात करावी. वाटेच्या शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेल्या काही पायर्याह असुन येथुन कोसळलेल्या तटबंदीतून आपला गडप्रवेश होतो.
भोरगिरी किल्ला समुद्रसपाटीपासून २०५८ फूट उंचावर असुन आयताकृती आकाराचा हा किल्ला ४ एकर परिसरात दक्षिणोत्तर पसरला आहे. पायथ्यापासुन मात्र याची उंची साधारण ४५० फुट असावी. गडावर प्रवेश केल्यावर समोरच एक भलेमोठे कोठार दिसुन येते. हे कोठार समोरील बाजुस तीन भागात विभागले असुन त्याच्या उजव्या व डाव्या बाजूस गुहेत कोरलेली दोन पाण्याची टाकी आहेत. यातील डाव्या बाजूचे टाके कोरडे असुन उजव्या बाजूच्या टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. कोठारातील एका भागात वीरगळ ठेवलेली आहे. हे कोठार पाहुन उजव्या बाजूने गड प्रदक्षिणेला सुरुवात करावी. वाटेच्या सुरवातीला एका झाडाखाली ठेवलेल्या दोन चौकोनी व एक गोलाकार पिंडी व एक मुर्ती दिसुन येते. या मुर्तीच्या पुढील बाजुने एक पायऱ्यांची वाट खाली दरीत उतरताना दिसते. या वाटेने खाली उतरल्यावर उजवीकडे कातळात खोदलेल्या पायऱ्या व दोन गुहा पहायला मिळतात. यातील एका गुहेत पाणी साठलेले असुन गुहेबाहेर एक शिल्प ठेवलेले आहे.
दुसरी गुहा मात्र मोठया प्रमाणात माती साठून बुजलेली आहे. या गुहा पाहुन परत वरील पायवाटेवर आल्यावर हि वाट पुढे डाव्या बाजूला खाली उतरते तिथे उध्वस्त तटबंदी व प्रवेशव्दाराचे अवशेष पाहायला मिळतात. येथे झाडीत पडलेले प्रवेशद्वारावरील व्याघ्रशिल्प दिसुन येते. या दरवाजातुन गडाखाली उतरणारी वाट निगडाळे मार्गे भीमाशंकरला जाते. येथुन पुढे जाणारी वाट संपुर्ण गडाला वळसा घालत आपण जेथून सुरवात केली त्या कोठाराकडे जाऊन संपते. या वाटेवर आपल्याला खडकात खोदलेली एकुण अकरा पाण्याची टाकी दिसुन येतात. यातील काही खांबटाकी व जोडटाकी असुन सात टाक्यात पाणी आहे तर चार टाकी सुकलेली आहेत. यातील शेवटच्या टाक्यावर एक लहानसे शिवलिंग कोरलेले आहे. या वाटेवरच किल्ल्याची काही प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी व दोन बुरुज दिसतात. या बुरुजांचे वैशिष्ट म्हणजे हे दोनही बुरुज चौकोनी आहेत.
किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर एक मोठे खोदीव टाके असुन एका जोत्याचे अवशेष दिसुन येतात. वनखात्याने येथे देखील एक निवारा बांधलेला आहे. गडावरून भीमाशंकर अभयारण्याचा दूरवर पसरलेला परीसर व भीमा नदीचे पात्र दिसते. किल्ल्याचा एकुण आकार पहाता हा टेहळणीचा किल्ला असल्याचे जाणवते. गडाचा आकार लहान असल्याने गडफेरीला एक तास पुरेसा होतो. पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे या पात्रात रांजणखळगे तयार झाले आहेत. कागदपत्रात गडाचा उल्लेख नसल्याने गडाचा इतिहास अज्ञात आहे.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.