महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,845

भोसले कुळातील कर्तृत्ववान रणरागिणी

Views: 1659
5 Min Read

भोसले कुळातील कर्तृत्ववान रणरागिणी !!

स्त्री शक्तीचा जागर!! पुस्तक लेखमाला क्रमांक – २७!!

छत्रपती शिवरायांनी स्वराज्यस्थापनेचा जो यज्ञ आरंभला होता! त्यात अनेक कर्तृत्ववान माणसे पुढे आली. पण या सर्वांची सुरुवात झाली ती छत्रपतींच्या स्वतःच्या घरातूनच! शिवरायांचे वडील श्री शहाजी भोसले हे जेंव्हा बंगलोर प्रांती आदिलशाहीमध्ये होते. त्याचवेळेस किल्ले शिवनेरी वर आई शिवाई च्या कृपेने शिवराय जन्माला आले. त्या वेळेस त्या बाल मनावर स्वराज्य या संकल्पनेचे “बाळकडू” दिले ते स्वराज्यजननी आऊसाहेब अर्थातच राजमाता जिजाबाईसाहेब यांनी! जेंव्हा शिवराय सिंहासनाधिश्वर “छत्रपती” जाहले, त्यावेळेस राजमाता जिजाऊ बाईसाहेब यांनी मनी बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात अवतरले होते.त्यानंतर १२ व्या दिवशी त्यांचे निधन झाले.तरीही स्वराज्य ही संकल्पना छत्रपतींच्या मनात उतरवून ते प्रत्यक्ष साकारण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचे संपूर्ण श्रेय जाते ते राजमाता आऊसाहेब यांच्याकडेच!!(भोसले कुळातील कर्तृत्ववान रणरागिणी)

तोच वारसा पुढे नेला तो छत्रपतींच्या जैष्ठ पत्नी सईबाई यांनी!! त्यांनीही धीरोदात्त स्वभावाने अनेक कठीण प्रसंगात शिवरायांना मनापासून साथ दिली!तसेच शिवराऊंच्या त इतर पत्नी सोयराबाई, पुतळाबाई यांनीही हाच वारसा पुढे चालविला!!

छत्रपती शिवरायांचा स्वराज्य विस्तार करण्याचा नंतर हाच वारसा छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांनी पुढे नेला! मात्र या दोघ्यांच्याही आकस्मित मृत्यूनंतर हा वारसा पुढे नेण्याचे महत्वाचे कार्य केले ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई आणि राजाराम महाराज यांच्या पत्नी ताराबाई यांनी!! प्रत्यक्ष मुघलांशी चार हात करून या छत्रपतींच्या सुनांनी “स्वराज्य” आबादित राखले!! यानंतर अनेक उलथापालथ झाल्या , मात्र स्वराज्य विस्तार होतच राहिला!!

“राजमाता जिजाऊसाहेब” हा आऊसाहेब  यांच्यावर  डॉ.सौ सुवर्णा निंबाळकर यांनी लिहिलेला ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. यात त्यांनी अनेक संदर्भ आणि इतर अभ्यासपूर्ण माहिती जोडून हा ग्रंथ परिपूर्ण केलेला आहे.

त्यांनतर शिवरायांच्या जैष्ठ पत्नी सौ सईबाई राणीसाहेब यांच्यावर असलेले दोन महत्वाचे आणि अभ्यासात्मक ग्रंथ म्हणजे  डॉ.सौ सुवर्णा निंबाळकर यांनी लिहिलेला “शिवपत्नी महाराणी सईबाई” आणि डॉ. सदाशिव शिवदे सर यांनी लिहिलेला “शिवपत्नी सईबाई” ! या दोन्ही ग्रंथात आपल्याला अनेक अप्रकाशित पण संदर्भयुक्त माहिती मिळते!

याशिवाय छत्रपती शिवरायांच्या अष्टपत्नी यांच्या आदरणीय आप्पा परब यांनी लिहिलेल्या “शिवरायांच्या अष्टराज्ञी” हा प्रचंड महत्त्वाचा ग्रंथ आहे! कारण आजपर्यंत कोणत्याच ग्रंथात शिवरायांच्या आठही पत्नींविषयी अशी एकत्र माहिती मिळत नाही!!

स्वराज्य विस्ताराची हीच प्रेरणा छत्रपती शिवरायांच्या थोरल्या सुनबाई “येसूबाई” आणि धाकट्या सुनबाई “ताराराणी” यांनी पुढे नेली!! या दोघीनीही स्वराज्य अक्षरशः राखिले आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले!

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी सौ येसूबाई यांना मुघलांनी ताब्यात घेतल्यावर त्या तब्बल २७ वर्षे स्वराज्यापासून लांबच होत्या! त्यांच्या वर एकूण  तीन महत्वाचे अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथ आहेत.

पहिला म्हणजे  डॉ.सौ सुवर्णा निंबाळकर यांनी लिहिलेला “महाराणी येसूबाई”, दुसरा डॉ सदाशिव शिवदे सर यांनी लिहिलेला “महाराज्ञी येसूबाई” आणि तिसरा म्हणजे डॉ मीरा मिराशी यांनी लिहिलेला “महाराणी येसूबाई”!!  हे तिन्ही ग्रंथ आपल्याला अनेक संदर्भ माहिती करून देतात!!

यानंतर छत्रपतींच्या दुसऱ्या सुनबाई सौ ताराराणी यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो!! यांनी तर मुघलांना अक्षरशः सळो की पळो केले! छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर खासा बादशाह औरंगजेब स्वराज्य गिळंकृत करावयास दक्षिणेत उतरला. पण शेवटी त्याला इथेच दफन व्हावे लागले!  ताराराणी साहेब यांचे कर्तृत्व अफ़ाट होतेच! पण त्यांची महत्वकांक्षा ही उज्ज्वल होती! प्रत्यक्ष सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची लेकच ती!! म्हणूनच तर त्यांना “मुघल मर्दिनी” असे गौरवाने संबोधित केले जाते! तर अश्या या कर्तृत्ववान ताराराणी यांच्या वर सध्या उपलब्ध असलेले तीन महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ आहेत!

पहिला ग्रंथ डॉ.सौ सुवर्णा निंबाळकर यांनी लिहिलेला “भद्रकाली ताराराणी” ! यात त्यांनी अतिशय सखोल अभ्यास करून अनेक अप्रकाशित संदर्भ दिलेले आहेत! दुसरा अतिशय महत्वचा ग्रंथ जो नुकताच पुनःप्रकाशीत झालेला दुर्मिळ ग्रंथ म्हणजे केसर ई हिंद रंगुबाईसाहेब जाधव यांनी लिहिलेला “मोंगल मर्दिनी ताराबाई” हा होय!! यात त्यांनी विशेषतः कोल्हापूर आणि सांगली भागात स्वराज्य विस्तार करताना ताराबाई यांनी आखलेल्या अनेक मोहिमांचे उल्लेख आहेत. अतिशय वाचनीय आणि संग्राह्य ग्रंथ आहे हा!

या यानंतर तिसरा महत्वाचा ग्रंथ म्हणजे डॉ सदाशिव शिवदे सर यांनी लिहिलेला “छत्रपती राजाराम ताराराणी”. यात सरांनी अनेक विस्तीर्ण संदर्भ दिले आहेतच, पण त्याशिवाय अनेक महत्वाची माहिती जी संस्कृत काव्यात आहे. ती ही आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे.

तर अश्या या भोसले कुळातील रणरागिणी स्त्रियांच्या पराक्रमावर आधारित काही महत्वाचे संदर्भ ग्रंथ आहेत! जे आजच्या महिला दिनानिमित्त आपणस माहिती करून द्यावेसे  वाटत आहेत! हा स्त्री शक्तीचा जागर आहे. जो आपला अभिमान आहे! अश्या कर्तृत्ववान स्त्रियांमुळेचे आजही स्वराज्याभिमान जागृत आहे!!

आपणही असेच महत्वाचे संधर्भयुक्त ग्रंथ वाचत राहावे . तसेच आपला जाज्वल्य आणि अलौकिक इतिहास येणाऱ्या पिढीला सांगावा हाच या लेखनामागील प्रामाणिक उद्देश !!

बहुत काय लिहिणे? आपणही वाचत राहावे आणि सुज्ञ बनावे हीच मनोकामना!!

जय भवानी ! जय शिवराय!!

किरण शेलार !!

Leave a Comment