महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,27,806

भोसले कुलदैवता भवानी

By Discover Maharashtra Views: 1466 9 Min Read

भोसले कुलदैवता भवानी आणी छत्रपतींची भवानीभक्ती –

छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत तुळजाभवानीवर श्रद्धा होती . बखरीतून आपणास भवानीदेवीने शिवाजीमहाराजांना संकटसमयी दृष्टांत दिला . शत्रूच्या संहारासाठी शिवरायांच्या तलवारीत वास्तव्य केले व शत्रूचा वध केला अश्या आशयाच्या घटना आपणास आढळून येतात .(भोसले कुलदैवता भवानी)

भोसले घराण्याचे कुलदैवत हे शंभूमहादेव व श्री भवानी असल्याचे वर्णन आपणास “बाबाजीवंशवर्णनम“ या ग्रंथात आढळते.

श्रीमदभोसलवंशोयं नेतरस्तु ममैव स:/
सुर्यनारायणस्यायं श्रीमान वंशो महादुति //
श्रीमान शंभूमहादेव: सर्वानंदप्रदायक: /
भवानी चंडमुंडादिमहिषासुरमर्दिनी //
कुलदैवतमेतस्य वंशस्य समुदीरितम//

भगवान विष्णुं कथन करत आहेत कि “ हा पवित्र भोसले वंश माझाच आहे. हा महातेजस्वी वंश श्री सुर्यनारायणाचा वंश आहे. सर्वनंददायक श्री शंभूमहादेव आणि चंडमुंड महिषासुरांदी दैत्यांचा संहार करणारी श्री भवानी ही या वंशाची कुलदैवते आहेत.

प्रतापगडाची श्रीभवानी –

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर श्रीभवानी देवीची स्थापना केली. शिवाजी महाराजांची श्रीतुळजापूरच्या भवानीदेवीचे ठाई अत्यंत भक्ती होती. तुळजापुरी दर्शनास जावे अशी इच्छा झाली असता देवीने त्यांना दृष्टांत दिला कि “ माझी स्थापना येथेच करावी म्हणजे मी तुझी इच्छा इथेच पूर्ण करीन. “

शिवाजी महराजांनी श्रीभवानीच्या मूर्तीसाठी हिमालयातील त्रिशूलगंडकी ,श्वेतगंडकी व सरस्वती या तीन नद्यांच्या संगमस्थळांची शीला नेपाळमधून आणवली. तुळजापुरास कारागीर पाठवून त्या मुर्तीप्रमाणे सुंदर मूर्ती घडवली. प्रतापगडावर श्रीभवानी देवीची स्थापना करून दानधर्म केला. देवीस रत्नालंकार व विविध आभूषणे देवून देवची पूजाअर्चा चालावी , नवरात्रउत्सव याकरिता नेमणुका करण्यात आल्या.

प्रतापगडावरील श्रीभवानी मंदिराचे व मूर्तीचे वर्णन

जयराम पिंड्ये यांच्या प्रणालपर्वतग्रहनाख्यान या ग्रंथात आपणास श्रीभवानी मंदिराचे व श्रीच्या मूर्तीचे वर्णन आढळून येते.

शिवाजी महाराज विश्वासातील लोकांसह प्रतापगडास आले. देवीचे देऊळ पाहताच पायातील जोडे काढून अनवाणी पायाने दर्शनास गेले. भवानीचे हे देऊळ चुन्याने बांधलेले असून त्याचे खांब सोन्याच्या मुलाम्याने चकचकणारे व अत्यंत उंच आहेत. मंदिरावरील सुवर्ण कळस व पताका यामुळे मंदिरास शोभा प्राप्त झाली आहे.

श्रीभवानीच्या मूर्ती लाल रंगाची जरीची वस्त्रे परिधान केलेली होती. पायात पैंजण लखलखत आहेत , कमरेत हिऱ्यांचा कमरपट्टा झळकत आहे. हातात हिरेजडीत कांकणे , हिरेजडीत बाजूबंद , गळ्यात मोत्यांचा हार असून बोटात रत्नखचित आंगठ्या चमकत आहेत. कानात सुवर्णकुंडले झळकत आहेत. नाकात मोत्यांची नथ असून अष्ठआयुध धारण करणारी प्रत्यक्ष महिषासूरमर्दिनीच भासत होती परंतु भक्तांवर प्रेम करणारी देवी कामधेनुप्रमाणे भासत होती. श्रीभवानी देवीस साष्टांग नमस्कार करून व तिच्या समोर हात जोडून शिवाजी महाराजानी तिची यथासांग पुजाअर्चना केली. त्या रात्री शिवाजी महाराज गडावर थांबले व पहाटे श्रीभवानीस वंदन करून पन्हाळगडाच्या दिशेने निघाले.(भोसले कुलदैवता भवानी)

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी भवानी देवीस सोन्याची छत्री अर्पण केली . इंग्रज अधिकारी ऑक्झीडेन त्याच्या रोजनिशीत लिहितो “शिवाजी महाराज राज्याभिषेकापित्यर्थ दर्शनादी समारंभानिमित्त प्रतापगडच्या भवानीला सोन्याचे छत्र अर्पण करण्यासाठी गेल्याचे समजते. देवीला अर्पण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी नेलेले छत्र शुद्ध सोन्याचे सव्वा मण वजनाचे होते.

फ्रायरचा वृतांत यातील नोंदीनुसार शिवाजी महाराजांनी भवानीला अर्पण केलेल्या छत्राचे वजन सव्वा मण किंवा ४२ पौंड होते.

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण नावाचा संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिला त्यात त्यांनी १८ श्लोक लिहून श्रीभवानी देवीची स्तुती केली आहे.

इति चन्द्रचूडरमणीस्तुतीमेणा (नां )
धरणीशशम्भूरचितामतिभक्त्या /
मनुज: पठेदनुदिनं स किलोचै-
भृवि भारतीजलधीजनिलयं स्या //

अश्या या श्रीशिवांच्या पत्नीचे, म्हणजे श्रीभवानी ( चंद्रचूडरमणीचे ) स्तोत्र धरणीश / भूमिपाल ( नृपती राजे ) शंभू यांनी पराकाष्ठेच्या भक्तीने लिहिले आहे. जो मनुष्य हे श्रीभवानी स्तोत्र दरोरोज पठन करील त्याला “जलधी-जा“ ( समुद्राची कन्या लक्ष्मीरूपी ) भारती ( सरस्वती ) च्या गृहात ( ज्ञान विज्ञान विद्या प्रतिष्ठा वैभव कीर्ती क्षेत्रात ) उच्च स्थान प्राप्त होईल . ग्रंथरचनेच्या विशेष क्षेत्रात सन्मान्य स्थान लाभेल.

छत्रपती राजाराम महाराज

छत्रपती राजाराम महाराज जिंजीस जात असताना पन्हाळागडास मुक्कामी होते त्यावेळी त्यांनी नवरात्र उत्सव साजरा केला त्याचे वर्णन केशवपंडितकृत “ राजराम महाराज चरित्र “ या ग्रंथात आढळते.

सदर ग्रंथात नवरात्रोस्तवाचे वर्णन पुढीलप्रमाणे येते . “ महाराजाने प्रधानपुरुषाबरोबर खलबत करून पन्हाळगडावरील वरप्रदायिनी दुर्गादेवीच्या पूजनास नवरात्राच्या प्रतीप्रदेपासून आरंभ झाला. धूपदीप नीरंजनादी त्रिकालपूजन , नानाप्रकारचे नैवेद , त्याचप्रमाणे जप, ब्राम्हण भोजने, नटनर्तिकांची गाणी , यौवन व मद यांनी प्रमत झालेल्या अनेक वारर्योषीतांचे अहोरात चालणारे नानाप्रकारचे नुत्यगायन , त्याचप्रमाणे विशेषकरून हाती डमरू व गळ्यात भयंकर मुंड धारण करणाऱ्या तुळजाभवानीच्या भक्तीने आसक्त झालेल्यांचे तांडव , शिरे तुटताना ओरडणारे व ताबडतोब स्वर्गास जाणारे सहस्त्रावधी बकरे व मेंढे यांचे असंख्य बलिदान , कुमारीपूजन, साध्वी सुवासिनींचे पूजन व भोजन , नाना देश्यातून आलेल्या बंदिजनांचा स्तुतीपाठ आणि नानाप्रकारचे इतर मनोहर देखावे वैगरेनी राजाने भवानीला संतुष्ट केले. भवानीने अभय दिले. नंतर नवमीला होम झाला. पारितोषिके बिदाग्या यथासांग दिल्या . अशारीतीने लोकांच्या मनाला आनद देणारा तो भवानीचा यज्ञाचा महोत्सव त्या चक्रवर्ती भूपतीने संकटविरहीत संपादल्याने तो राजा मनात संतोष पावला. हा वार्षिक उत्सव सालाबादप्रमाणेच झाला.

छत्रपती राजाराम महाराजांनी केलेल्या नवरात्र उत्सव हा सालाबादप्रमाणे झाला यावरून सदर नवरात्र उत्सव हा छत्रपतींच्या घराण्यात पूर्वीपासून होत होता.

श्री तुकाई तुळजापूरचे देवीस इनाम दिल्याबद्दल सनद

छत्रपती राजाराम महाराज व ताराबाई यांचे पुत्र छत्रपती शिवाजी यांनी १८ ऑक्टोंबर १७०० साली दिलेल्या सनदेत लिहितात “तुळजाभवानी हे जागृत पीठ असून ते कुलदैवत आहे . यवनांच्या धामधूमीमुळे तेथील पूजा व उत्सवात व्यत्यय येतो. तेथील पुजाऱ्यांनी छत्रपतींना याविषयी माहिती दिली. छत्रपतींनी तेथील पूजाउत्सव नियमित चालवा याकरता एक गाव इनाम दिला. प्रतिवर्षी नव्या संनदेची गरज नसून प्रांत परांड्याच्या अधिकाऱ्यास त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.”

“ स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २७ विक्रमनाम संवत्सरे, अश्विनी शुद्ध सप्तमी, भोमवासर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती यांनी, राजश्री देशाधीकारी व कारकून प्रांत परांडे यांस आज्ञा केली एसीजे:- श्री तुकाई तुळजापूर हे मूळपीठ बहुत जागृत, स्वामींचे कुलदैवत, येथील पूजा उत्साह ताम्राचे धामधुमिकरिता चालत नाही. म्हणोन श्रीचे पुजकानी येऊन विदित केले. त्याजवरून मनास आणीता, हे राज्य श्रीच्या पदाचे तेथील पूजा उत्सव यथासांग चालला पाहिजे. याकरिता स्वामिनी श्रीच्या पूजा उत्सवानिम्मिते मौजे आलनापूर, मौजे रातांजन , प्रांत मजकूर हा गाव कुलबाव , कुलकाणु देखील हल्लीपट्टी व पेस्तरपट्टी झाडझाडोरा, जल , तरू , पाषाण पडिले पानासाहित चतु:सीमा गाव पूर्व मर्यादेप्रमाणे देह १ रास, खेरीज हक्कदार व इनामदार करून दिल्हा आहे. तर मौजे मजकूर श्रीचे स्वाधीन करून तेथील उत्पन्न श्रीस प्रविष्ट करून इनाम सुरक्षित चालविणे. साल दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे. या पत्राची तालिक लेहोन घेऊन, अस्सल पत्र श्रीचे पुजारी यांजजवळ देणे. जाणिजे लेखनालंकार.”

तारीख ६ जमादिलावल, सुरसन इहिदे मयातैन

नवरात्रीत भोसले कुळात असलेली प्रथा याविषयीचा नियम आपणास भोसल्यांचे कुळाचार सातारच्या छत्रपतींचा खाजगीकडील जाबता, जाबता देवघर यात आढळून येतो.

आश्विनमासी नवरात्रात नऊ दिवसा कुवारीण एक , तिजला बसते उठते दिवशी चोळी पातळ व पारण्याचे दिवशी सवाष्ण व मेहूण यांस शेला पागोटे व चोळी पातळे येणेप्रमाणे पावत आहे.म्हणोन कलम लिहिले आहे. त्यास सालाबादी पावत आल्याप्रमाणे पावत जाईल.

कवी भूषण आपल्या छंदात शिवाजी महाराजांना विजय मिळावा यासाठी भवानीदेवीकडे पार्थना करतात.

जयति जयति जय आदिसकति जय काली कपद्दर्नी /
जय जय मधुकैटभ छलभि देवी जय महिषहि मर्दनि /
जय चमुंड जय चंड चंडमुंडासुर खंडनि /
जय सुरक्त जय रक्तबीज बिड्डाल विहंडनि /
जय जय निसुंभ शुंभह द्लनि भूषन जयश भननि /
सरजा समत्त्थ शिवराज कहि देहि विजय जय जगज निनि // .

हे विजयनी आदिशक्ती, कालिका भवानी , तुझा विजय असो. तू मधु आणि कैटभ या दैत्यांना छळणारी तसेच महिषासुराचा वध करणारी आहेस . हे चामुंडे , तू चंड आणि मुंड यांसारख्या पाखंडी दैत्यांचा नाश करणारी आहेस.तूच सुरक्त ,रक्तबीज आणि बिडालला मारले आहेस. तुझा विजय असो. भूषणजी म्हणतात कि , तू निशुंभ आणि शुंभ दैत्यांचा नाश करणारी आहेस. तूच सरस्वतीचे रूप तसेच जय-जय शब्द म्हणणारी आहेस. हे जगन्माता , जगज्जननी सिंहासमान असणाऱ्या शक्तिशाली शिवाजी राजाला विजय प्रदान कर. तुझा विजय असो.(भोसले कुलदैवता भवानी)

श्री. नागेश मनोहर सावंत देसाई

संदर्भ ;- श्री. तुळजाभवानी ; -रा.ची. ढेरे
सभासद बखर
केशवपंडितकृत “राजराम महाराज चरित्र“ :- वा.सी.बेंद्रे
बुधभूषण :- रामकृष्ण कदम
प्रणालपर्वतग्रहनाख्यान :- जयराम पिंड्ये
शिवकालीन पत्रसार संग्रह पत्र १६४३ , १६४५
भोसल्यांचे कुळाचार सातारच्या छत्रपतींचा खाजगीकडील जाबता :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
सनदा पत्रातील माहिती :- पुरषोत्तम विश्राम मावजी आणि द.ब.पारसनीस
शिवराजभूषण :- केदार फाळके

छायाचित्र साभार गूगल

Leave a Comment