महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,36,082

भुदरगड | Bhudargad Fort

By Discover Maharashtra Views: 5549 12 Min Read

भुदरगड | Bhudargad Fort

किल्ल्यांचा देश,गडांचा देश म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही पुरंदर,देवगड, पन्हाळा यासारखे कित्येक तालुके गडांच्या नावाने ओळखले जातात. कोल्हापुर जिल्ह्यात पन्हाळा नंतर गडाच्या नावाने ओळखला जाणारा असाच एक दुसरा तालुका म्हणजे भुदरगड(Bhudargad Fort).

औरंगाबादच्या जंजाळा किल्ल्यानंतर पठारावर वसलेला आकाराने व सपाटीबाबत हा सर्वात मोठा गिरीदुर्ग असावा. या गडाचे एकुण क्षेत्रफळ १८० एकर असुन तटबंदीची लांबी साधारण ५ कि.मी.इतकी असावी. भुदरगड किल्ला कोल्हापुरपासून गारगोटीमार्गे ६५ कि.मी.अंतरावर असुन गारगोटी या तालुक्याच्या ठिकाणाहुन १२ कि.मी. अंतरावर आहे. गारगोटी-आजरा मार्गावर गारगोटीपासुन ४ कि.मी.अंतरावर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या पेठ शिवापूर गावात जाण्यासाठी फाटा आहे. पेठ शिवापूर हि गडाची पूर्वीची बाजारपेठ असुन गावातुन किल्ल्याची तटबंदी फोडुन पक्का रस्ता गडावर असलेल्या भैरवनाथ मंदिरापर्यंत नेण्यात आला आहे. वाटेत एक जुने शिवमंदिर आहे. खाजगी वाहनाने थेट गडावर जाता येते अन्यथा पेठ शिवापुर येण्यासाठी एस.टीची सोय असुन तेथुन अर्ध्या तासाच्या चालीने गडावर पोहोचता येते. रस्ता भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत येत असल्याने भैरवनाथाचे दर्शन करूनच आपल्या गडफेरीस सुरवात करूया.

भैरवनाथाचे मंदीर थोडया वेगळ्या धाटणीचे असुन यावर गोव्यातील मंदिराच्या बांधकाम शैलीचा प्रभाव जाणवतो. मंदीर आजही सुस्थितीत असुन परीसरातील भाविकांची येथे सतत वर्दळ असते. मंदिराभोवती प्राकाराची भिंत असुन भिंतीतील प्रवेशद्वारावर गणेशशिल्प कोरलेले आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडात केलेली असुन सभागृह पाच कमानीवर तोललेले आहे. मंदिराच्या गर्भगृहात भैरवनाथाची शस्त्रसज्ज मुर्ती आहे. मंदिराच्या प्राकारात एक दीपमाळ असुन प्राकाराबाहेर तटबंदीतील बुरूजाजवळ दुसरी दीपमाळ आहे. या बुरुजावर भगवा झेंडा रोवलेला असुन ६ फुट लांबीची किल्ल्यावर असलेली एकमेव तोफ ठेवलेली आहे. मंदिराच्या उजवीकडे एक समाधी चौथरा असुन या चौथऱ्यापासुन काही अंतरावर दोन बाजुस लहान दीपमाळ आहेत. याच्या पुढील भागात भिंत शिल्लक असलेली एक पडीक वास्तु असुन या वास्तुच्या आसपास अनेक चौथरे आहेत.

चौथरे पाहुन परत मंदिराकडे यावे व तोफेशेजारील तटावर चढुन आपल्या गडफेरीस सुरवात करावी. तटाची उंची साधारण १०-१२ फुट असुन फांजी ४-६ फुट रुंद आहे. तटबंदीची अलीकडेच दुरुस्ती करण्यात आली असुन ढासळलेल्या ठिकाणी ती नव्याने बांधण्यात आली आहे. गडाच्या सर्व बाजुस वनीकरण केले असल्याने संपुर्ण गड हिरवागार झाला आहे. गडाचा परिसर अस्ताव्यस्त पसरलेला असल्याने व्यवस्थित पहाण्यासाठी तटावरूनच फिरावे व एखादी वास्तु दिसल्यास खाली उतरावे. वास्तु पहावी व पुन्हा तटावर चढावे. यामुळे ४-५ तासात संपुर्ण किल्ला पुर्णपणे व्यवस्थित पहाता येतो. तटावर चढउतार करण्यासाठी जागोजागी म्हणजे जवळपास ३०-३२ ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत.

गडाच्या दोन सोंडा पश्चिम दिशेला वळलेल्या आहेत. गडफेरीला सुरवात केल्यावर आपण सर्वप्रथम येतो ते गडाच्या पहिल्या पश्चिम सोंडेवर. या सोंडेवर एक भक्कम बुरुज बांधलेला असुन या बुरुजाजवळील तटबंदीत गडातुन प्रसंगी बाहेर पडण्यासाठी लहान कमानीदार दरवाजा बांधलेला आहे. सध्या हा दरवाजा लोखंडी जाळी लावुन बंद करण्यात आला आहे. तटबंदी फिरताना मुख्य दोन दरवाजे वगळता आपल्याला असे एकुण सात दरवाजे पहायला मिळतात ज्यातुन तटाबाहेर जाता येते. पहील्या बुरुजावरून दुसऱ्या सोंडेवरील बुरुजाकडे जाताना तटबंदीत दोन शौचकुप पहायला मिळतात. गडाच्या पश्चिम भागात असलेल्या या सोंडेवर शेजारी शेजारी दोन भक्कम बुरुज बांधलेले असुन या बुरुजाबाहेर खालील भागात मोठया प्रमाणात तटबंदी दिसुन येते. या बुरुजाच्या खालील भागात दुहेरी तटबंदी बांधुन बुरुजाला जास्त संरक्षण देण्यात आले असावे किंवा पुर्वी येथुन गडावर प्रवेश करणारा मार्ग असावा जो कालांतराने बंद करण्यात आला आहे. या बुरुजांच्या समोरील भागात मोठया प्रमाणात चौकीचे अवशेष आहेत. या तटबंदीत षटकोनी आकाराचा दुसरा लहान दरवाजा पहायला मिळतो.

तटबंदीवरून पुढे जाताना डाव्या बाजुस सपाटीवर एका मोठया वाड्याचा चौथरा व त्यावरील जोते दिसते. वाडयाच्या पुढील भागात सपाटीवर मोठ्या प्रमाणात शेती केली असुन तटाजवळ मोठया प्रमाणात घरांचे अवशेष आहेत. घरांच्या या अवशेषांजवळील एका चौथऱ्यावर अनगड देवतांची स्थापना केलेली आहे.येथील तटबंदीत दोन कोठार तसेच शौचकुप बांधलेले आहे. पुढे बांधकामाचे दगडी चिरे काढण्यासाठी खोदलेल्या दोन खाणी दिसतात. तटावरून पुढे जाताना काही ठिकाणी वास्तुंचे मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झालेले दिसते. हे सर्व पहात आपण गडाच्या पुर्व भागात येतो. येथे तटाशेजारी जमिनीखाली खोदलेली १०X१० फुट आकाराची गुहा आहे. गुहेच्या बाहेरील बाजुस झिजलेला नंदी ठेवलेला असुन काही पायऱ्या उतरून गुहेत गेल्यावर ५-६ कोरीव मुर्ती पहायला मिळतात. यातील एका मुर्तीची गावकरी जाखमाता म्हणुन पुजा करतात.

गडाच्या या आग्नेय भागात असलेला पुर्वाभिमुख दरवाजा व तटबंदी आज पुर्णपणे नष्ट झाली असुन दरवाजाचा केवळ चौथरा झाडीत शिल्लक आहे. येथुन एक कच्चा रस्ता गडापर्यंत आला असुन या रस्त्यासाठी उरलीसुरली तटबंदी पाडलेली आहे. या कच्च्या रस्त्याने ६०-७० फुट खाली गेल्यावर डाव्या बाजुस एका मोठया शिळेत कोरलेली १०X१० फुट आकाराची गुहा आहे. स्थानिक लोक या शिळेस पोखरधोंडा म्हणतात. येथुन मागे फिरावे व तटावरून आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. येथे एका सरळ रेषेत बांधलेले काही वास्तु अवशेष असुन समोर तलावाकाठी दोन दगडी मंदीरे नजरेस पडतात. यातील एका मंदीरात शिवलिंग असुन दुसरे मंदीर रिकामे आहे. या मंदिराशेजारी अजुन दोन चौथरे असुन एका चौथऱ्यावर घडीव शिळा आहे. तलावाच्या काठावर पाणी अडविण्यासाठी लांबलचक दगडी भिंत बांधलेली असुन त्यातुन पाणी बाहेर सोडण्याची सोय केलेली आहे. तलावाचा परिसर २५ एकर असुन कोणत्याही गिरीदुर्गावर इतका मोठा तलाव नसावा. या तलावाचे पाणी दुधी रंगाचे असल्याने हा तलाव दुधी तलाव म्हणुन ओळखला जातो पण हे दुधी रंगाचे पाणी केवळ पावसाळ्यात असावे कारण आमच्या मार्च महिन्यातील दुर्गभेटीत पाणी स्वच्छ निळसर होते.

तलाव पाहुन परत तटावर यावे व आपल्या पुढी फेरीस सुरवात करावी. या ठिकाणी तटबंदीजवळ १० फुट रुंद व ३०-३२ फुट लांबीची पायऱ्या असलेली दगडी भिंत बांधलेली आहे. या भिंतीचे नेमके प्रयोजन कळत नाही पण या भिंतीवरून संपुर्ण किल्ल्याचा परिसर नजरेस पडतो. भिंतीच्या पुढील भागात खूप मोठया प्रमाणात घरांचे अवशेष दिसुन येतात. या ठिकाणी गडाची मुख्य वस्ती असावी. या ठिकाणी आपल्याला उंच चौथऱ्यावर बांधलेले शिवमंदिर दिसते. या शिवाय या अवशेषात कातळात खोदलेले पाण्याचे टाके असुन आयताकृती आकाराची खोल विहीर आहे. वस्तीचा फेरफटका करून तटबंदीच्या कडेने पुढे गेल्यावर तटबंदीत अर्धवट बुजलेला लहान दरवाजा पहायला मिळतो. दरवाजा पाहुन पुढे आल्यावर आपण गडाच्या दक्षिण टोकावर असलेल्या चिलखती बुरुजावर पोहोचतो. या बुरूजाबाहेर असलेल्या चिलखती तटबंदीत जाण्यासाठी दोन बाजुना दोन दरवाजे आहेत. यातुन आपल्याला संपुर्ण बुरुजाला वळसा घालता येतो.

बुरुजावर तोफा डागण्यासाठी झरोके तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. हा संपुर्ण बुरुज आजही त्याच्या मुळ अवस्थेत आहे. बुरुजाच्या समोरील भागात काही चौकीचे अवशेष दिसुन येतात. बुरुजावरून साधारण ५ मिनिटे चालत पुढे आल्यावर डावीकडे गडावरील दुसरा लहान तलाव पहायला मिळतो. या तलावाच्या परीसरात मोठ्या प्रमाणात शेती केली असुन तलावाच्या काठावर कातळात कोरलेली चार पाण्याची टाकी आहेत. या टाक्याशेजारी काही घरांचे अवशेष असुन यातील एका उध्वस्त वास्तुत उघडयावर शिवलिंग व नंदी ठेवलेला आहे. येथे नव्याने एक समाधी उभारली आहे. येथुन पुन्हा तटबंदीकडे यावे व पुढे निघावे. येथुन गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते.

उत्तरेला दुरवर दुधगंगा व वेदगंगा नद्यांची खोरी दिसतात. या तटावर गडाची समुद्रसपाटीपासुन उंची ३१९० फुट आहे. या ठिकाणी तटबंदीत अजुन एक लहान दरवाजा पहायला मिळतो. तटबंदीवरून सरळ पुढे आल्यावर आपण गाडीने प्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो. या ठिकाणी असलेला गडाचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. रस्त्याने भैरवनाथ मंदिराकडे जाताना उजव्या बाजुस एका वाडयाचे अवशेष दिसुन येतात. येथुन एक कच्चा रस्ता डावीकडे तलावाच्या भिंतीच्या दिशेने जातो. या रस्त्याच्या सुरवातीस उजवीकडे एका मोठ्या वास्तुचे अवशेष असुन त्यापुढे गडाच्या नुतनीकरण केलेल्या सदरेचे अवशेष आहेत. या सदरेशेजारी एक शिवमंदिर असुन मंदिराच्या आवारात काही अवशेष आहेत. करवीरकर छत्रपतींनी या मंदिराचा जिर्णोध्दार केलेला आहे. या मंदिरात भालजी पेंढारकर यांनी १९४५ साली स्थापन केलेला महाराजांचा अर्धपुतळा आहे.मंदीर पाहुन रस्त्याने सरळ पुढे गेल्यावर आपण तलावाच्या भिंतीजवळ पोहोचतो.

तलावाची पलीकडील बाजु आपण तटावरून फेरी मारताना पहिली असल्याने आता डावीकडे वळुन तलावाच्या या बाजुने फेरी मारावी. वाटेच्या सुरवातीस एका पडीक वास्तुमध्ये घडीव दगडात बांधलेल्या दोन समाधी आहेत. येथुन पुढे आपण एका भग्न मंदिरात येतो. मंदिराच्या गाभाऱ्यात अंबामातेची मुर्ती असुन मंदिराचे अवशेष पुर्वी मंदीर किती भव्य असावे याची प्रचीती देतात. मंदिरासमोर काही कोरीव शिळा असुन पुढे काही अंतरावर एक भग्न समाधी चौथरा आहे. या समाधीपासुन काही अंतरावर दुसरी भग्न समाधी असुन त्यापुढे अजुन दोन समाध्या आहेत. या दोन्ही समाधीवर दिवा लावण्याची सोय केली आहे. येथुन पुढे गेल्यावर तलावाच्या काठावर एक मंदीर पहायला मिळते. या मंदिराचे गर्भगृह कातळात कोरलेले असुन बाहेरील सभामंडप घडीव दगडांनी बांधला आहे. मंदिरात झीज झालेल्या काही कोरीव मुर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या पुढील भागात तलाव असल्याने पावसाळ्यात पाणी इथवर साठत असावे. त्यामुळे मंदिराची एका दगडात कोरलेली दीपमाळ मंदिरामागील उंचवट्यावर ठेवली आहे. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. गडावर मुक्काम करावयाचा असल्यास भैरव मंदीर अथवा शिवमंदीर येथे करता येईल.

गडावर दरवर्षी माघ महीन्यात कॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते. यावेळी गडावर मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने किल्ला पहाण्यास जाणे टाळावे. विक्रमादित्य राजा भोज (दुसरा) याने इ.स.११८७ मध्ये शिलाहार राजघराण्याची राजधानी वाळव्याहून पन्हाळयास आणली. या राजा भोजने दक्षिण महाराष्ट्रात जे किल्ले बांधले त्यात हा भुदरगड असावा. शिलाहारांच्या पाडावानंतर यादव राजवंशातील राजा सिंघण याने इ.स.१२०९ मध्ये करवीर प्रांतावर आपला अंमल प्रस्थापित केला. देवगिरीचे साम्राज्य लयाला गेल्यावर बहमनी व नंतर आदिलशाही असे या किल्ल्यावर सत्तांतर झाले. इ.स. १६६७ मध्ये गड पहिल्यांदा स्वराज्यात आला पण लवकरच आदिलशाहीच्या ताब्यात गेला.

इ.स.१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी गड पुन्हा जिंकला. यावेळी महाराजांनी गडाची पुनर्बांधणी केली व गडाला एक प्रबळ लष्करी ठाणे बनविले. गड घेताना झालेल्या लढाईत येथील आदिलशाही सरदार मारला गेला व त्यांची निशाणे मराठयांच्या हाती आली. हि निशाणे भैरवनाथास अर्पण केलेली असुन आजही देवळात असल्याचे सांगतात. ( मला पहायला मिळाली नाहीत.) जिंजीवरुन परतताना छत्रपती राजाराम महाराज काही काळ या गडावर वास्तव्यास होते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून गडावर ताबा मिळवला. त्यानंतर १० वर्षांनी हा किल्ला करवीरकर छत्रपतींनी जिंकून घेतला. परशुरामभाऊ पटवर्धन व इचलकरंजीकर गोपालपंत आपटे यांना प्रयत्न करूनही त्यानंतर गड घेता आला नाही.

इ.स.१८४४ साली कोल्हापूर संस्थानात इंग्रजाविरुद्ध झालेल्या बंडात सामानगड व भुदरगड प्रमुख होते. त्यावेळी बाबाजी अहिरेकर गडाचे किल्लेदार होते व त्यांना सुभाना निकम याने आपल्या ३०० साथीदारांसह साथ दिली होती. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने गडावर हल्ला केला. इंग्रजांनी यावेळी डागलेल्या तोफांनी गडाचा मुख्य दरवाजा व तटबंदीचा भाग जमीनदोस्त झाला. १३ ऑक्टोबर १८४४ रोजी इंग्रज सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला. बंडाचा प्रयत्न पुन्हा होऊ नये यासाठी इंग्रजांनी गडाची तटबंदी उध्वस्त केली.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment