भुलेश्वर मंदिराचा पूर्वेतिहास भाग १ –
भुलेश्वर मंदिराला भेट दिल्यामुळे त्यावर लिहावं असे मनोमन वाटत होते आज योग जुळून आला. यादवकाळातील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून हे मंदिर पाहायला हवे या मंदिराचे अनेक पैलू आहेत जसे की स्थात्यशास्त्र,धार्मिक पंथ तसेच संप्रदाय, शिल्पवैभव,राजकीय पार्श्वभूमी या विविध पैलूंचा आढावा घेणार आहोत.भुलेश्वर मंदिराचा पूर्वेतिहास.
भुलेश्वर मंदिराची भौगोलिक परिस्थिती :
श्री क्षेत्र भुलेश्वर हे पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडे आहे. तसेच यावत आणि माळशिरस या दोन गावांमध्ये आहे. मंदिराकडे जायला दोन रस्ते असून एक पुणे सोलापूर महामार्गावरून यवत आणि घाट मार्गे तर दुसरा सासवड माळशिरस मार्गे..हा प्रदेश यादवकाळात ‘ माणदेश ‘ म्हणून ओळखला जायचा. मंदिराला जाण्यासाठी दोन रस्ते दक्षिणेकडून आहेत.
राजकीय पार्श्वभूमी :
भुलेश्वर मंदिर एवढेच केंद्रस्थानी न ठेवता सभोवतालच्या प्रदेशाचा आढावा घेणे गरजेचे आहे. पुण्यावर प्राचीन काळात म्हणजेच ४ थ्या शतकापर्यंत सातवाहन राजघराण्याने राज्य केले. त्यानंतर वाकाटक राजा रुद्रसेन दुसरा व त्याची पत्नी प्रभावती गुप्ता यांचा पुण्यातील ताम्रपट हिंगणघाट मधील दानाबाबतची माहिती देतो हा ताम्रपट इ.स ४१५-२० च्या दरम्यान चा मानला जातो.तसेच वाकाटक यांची सत्ता सुमारे २०० वर्ष असावी त्यानंतर बदामीच्या चालुक्य घराण्याकडे हा प्रदेश येतो.
१- चालुक्य नृपती विक्रमादित्य चा मुलगा विनयादित्य याचा इ.स ६९० मधील ताम्रपट मिळतो ज्यात त्याने आपली राणी महादेवी हिच्या सांगण्यावरून मुलीच्या लग्नानिमीत्त जमीन दान दिली. या ताम्रपटात मंचोह(मंचर) या गावाचा उल्लेख मिळतो.
या नंतरच्या काळात राष्ट्रकूट राजे प्रबळ झालेले दिसतात त्यांनी इ.स ७००-९०० वर्ष राज्य केले.
२- भीमा नदीच्या तीरावरील हिंगणी बेर्डी(तालुका दौंड) येथील राष्ट्रकूट राजा विभुराज चा ताम्रपट सापडतो ज्याचा काळ ५-६ वे शतक मानले जाते. त्यामध्ये मानराज(विभूराज) ची माता,राजा देवराजची पत्नी श्यावलंगी महादेवी हिने ब्राम्हणास दान दिले असा उल्लेख येतो.
३- इ.स ७१८ मधील बदामी चालुक्य नृपती विजयादित्य चा एक ताम्रपट बोपदेव ता. सासवड येथे सापडतो ज्यामध्ये वत्सस्वामी नावाच्या ब्राम्हण व्यक्तीस निर्गुंडी(दिवळे जवळचे निगडे) हे गाव दान दिले आहे या ताम्रपट मध्ये दविळग्राम (पुरंदर किल्ल्याजवळ चे दीवळे) तसेच समगिरी ( पुरंदरचे प्राचीन नाव) अशे दोन महत्त्वपूर्ण उल्लेख येतात.
पुण्याला ही प्राचीन काळातील इतिहास आहे हे दर्शवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न..
(क्रमशः )
©- इतिहासदर्पण – Aashish Kulkarni
Image credits- mr. Traveler