भुलेश्वर मंदिराचा पूर्वेतिहास भाग ३
मागील दोन भागात पुणे व परिसर ची प्राचीन माहिती घेतली आता पुढे भुलेश्वर मंदिराचा पूर्वेतिहास भाग ३..
८- अभ्यासकांच्या मते भुलेश्वर मंदिराचे बांधकाम हे कल्याणी चालुक्य राजांच्या काळातच सुरू झाले असावे, या करिता ते भुलेश्वर मंदिराची बांधकाम शैली ही चालुक्य काळातील दिसते असे सांगतात सोबत पलसदेव च्या मंदिराचे ही बांधकाम समकालीन असावे असेही मत नोंदवले जाते.
९- अखेरीस मंदिरात मंडपाच्या तलन्यास वर एक शिलालेख दिसतो जो इ. स १२८१ चा आहे त्यामध्ये ” जैतसुतरावाज्ञा” म्हणजेच यादव नृपती भिलम्म त्याचा पुत्र जैत्रपाल आणि त्याचा मुलगा सिंघण २रा होय. परंतु सिंघण ची कारकीर्द १२४६-४७ पर्यंत संपते तर्क असा आहे की रामचंद्र देव यादव याने या मंदिराच्या उभारणी मध्ये योगदान दिले असावे.कारण त्याचाच पुर( ता. पुरंदर ) मधील १२८५ चा शिलालेख होय ज्यात हेमाद्री पंडित यास लोककर्माधिकरी अशी पदवी दिली आहे.
अखेरीस कोणता ही ठोस पुरावा नसल्याने मंदिर नक्की कोणी बांधले हे सांगता येत नाही.
१०- यादव सत्तेच्या ऱ्हासानंतर पुढे मुसलमानी अंमल महाराष्ट्रात सुरू झाला.त्याची पुढे पाच शकले होऊन पुणे व परिसर आदिलशाही कडे गेला.त्यात स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी १६२९ मध्ये निजामशाही विरुद्ध बंड पुकारत मोगलांना मिळाले म्हणून त्यांची जहागिरी जप्त करण्यासाठी आदिलशाह ने मुरार जगदेव या सरदारास पाठवले त्याचा सरदार रायाराव याने पुणे व परिसर बेचिराख करीत सर्व वस्तीही नाहीशी केली आणि १६३० मध्ये भुलेश्वर ला येऊन तटबंदी बांधत त्यास किल्ले दौलत मंगळ असे नाव दिले.
(क्रमशः )
©- इतिहासदर्पण – Aashish Kulkarni
Image credits- mr. Traveler