महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,10,309

भुषणगड | Bhushangad Fort

By Discover Maharashtra Views: 4450 3 Min Read

भुषणगड | Bhushangad Fort

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भुषणगड (Bhushangad Fort) चा एकमेव डोंगर आपले दुरुनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाई देवी या मुलुखात प्रसिध्द आहे. गावकऱ्यानी गडाला पायऱ्या बांधल्या आहेत व गडावर वृक्षारोपण करुन गड हिरवागार केलेला आहे. देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दूसरा (१२१०-१२४७) याने हा किल्ला बांधला. इ.स. १६७६ मध्ये शिवाजीराजांनी आदिलशहाकडून भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ला जिंकून त्याचे नाव ‘‘इस्लामतारा’’ ठेवले. पेशवेकाळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. इ.स १८४८ मध्ये इंग्रजांनी साताऱ्याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला.

भूषणगडवाडीतून पायऱ्याची वाट गडावर जाते. पायऱ्याच्या सुरुवातीला सिमेंटमध्ये बांधलेली आधुनिक कमान आहे. पायऱ्याची रचना अशी केलेली आहे की भुषणगड (Bhushangad Fort) चढतांना गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस रहातात. या रचनेमुळे शत्रू कायम गडावरुन माऱ्याच्या टप्प्यात रहातो. गडाची प्रवेशद्वाराची कमान आज शाबूत नाही. पण त्याच्या बाजूचे बुरुज सुस्थितीत आहेत. हे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून त्याची बांधणी ‘‘गोमुखी’’पध्दतीची आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. प्रवेशद्वारा समोरील वाट तटबंदीच्या बाजूने जाते, या मार्गावर आपल्याला एक खोल विहीर पाहायला मिळते. गडाची तटबंदी आजही सुस्थितीत असल्यामुळे त्यात जागोजागी आपल्याला जंग्या पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडील पायऱ्याची वाट मोठ्या बुरुजाकडे जाते. या बुरुजाला तोफेसाठी जंग्या आहेत. या बुरुजावरुन गडाचा मधला उंचवटा दिसतो.

बुरुज पाहून मधल्या उंचवट्याकडे जाताना उजव्या हाताला भव्य बांधीव कुंड दिसते. या कुंडाजवळच महादेवाचे छोटे मंदीर आहे. या मंदिरावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या हरणाई देवीचे उत्तराभिमुख मंदिर दिसते. या जिर्णोध्दारीत मंदिरात हरणाई देवीची दिड फूट उंचीची मुर्ती आहे. मूर्तीवर पितळी मुखवटा बसविलेला आहे. हरणाई देवीच्या उजव्या बाजूस सिध्दनाथाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. मंदिरासमोर दिपमाळ व शेंदूर फासलेले दगड आहेत. मंदिरासमोरील पायवाटेने उंचवटा उतरुन आपण गडाच्या उत्तर तटबंदीपाशी येतो. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. याशिवाय भूषणगडची तटबंदीच्या खालच्या अंगाला असलेली दक्षिणोत्तर पसरलेली लांब सोंड दिसते. तटबंदीवरुन चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो. याच तटबंदीवरुन आपण संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणा करुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो. प्रवेशद्वारातून बाहेर पडून काही पायऱ्या उतरल्यावर डाव्या बाजूला एक रुंद मळलेली पायवाट दिसते. ही तटबंदी व बुरुजाखालुन जाणारी पायवाट भूयारी देवी मंदिराकडे जाते. वाटेत आपल्याला तटबंदीवरुन दिसणारी भूषणगड डोंगराची सोंड लागते. भूयारी देवीचे मंदिर भूयार बुजवून नवीन बनविण्यात आलेले आहे. भूषणगडची गडफेरी येथे पूर्ण होते ती करण्यास साधारणपणे १ तास लागतो.

 

 

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment