महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,035

बायजाबाई शिंदे

Views: 2216
5 Min Read

बायजाबाई शिंदे –

राणोजी शिंदे यांच्यापासून सुरु झालेली शिंदे घराण्याची पायाभरणी उत्तरोत्तर, कर्तुत्वरुपी इमारतीच्या कळसाच्या रूपानेचं उंचावत गेली. आजमितीला कण्हेर खेड इथले शिंदे मध्यप्रदेशमध्ये सिंधिया या नावानं शासन करत आहे., एकसे बढकर एक कर्तुत्ववान योध्यांची खाण असणाऱ्या शिंदे घराण्यातील स्त्रियांचे कर्तुत्व देखील वाखाणण्याजोगं होतं परंतु., काळाच्या ओघात काही इतिहासाची पानं निसटली किंवा काही तशीचं सोडून देण्यात आली., त्यातीलचं एक नाव म्हणजे “बायजाबाई शिंदे”

बायजाबाई म्हणजे ग्वाल्हेरच्या महाराणी. त्यांचा जन्म इ.स.१७८४ मध्ये झाला. यांच्या वडिलांचे नाव सखाराम घाटगे सर्जेराव. बायजाबाई लहानपणी फार बाळसेदार व देखण्या होत्या, त्या घोडयावर बसण्यांत पटाईत अशा निपजल्या. बायजाबाई शिंदे यांस कित्येक इतिहासकारांनी ‘दक्षिणची सौंदर्यलतिका’ अशी संज्ञा दिली आहे. राजस्थानांतील कृष्णकुमारी इत्यादि लोकप्रसिध्द लावण्यवतींच्या लग्नाचे प्रसंग ज्याप्रमाणे मोठमोठी राजकारस्थाने घडविण्यास कारणीभूत झाले, त्याप्रमाणे बायजाबाई यांचे लग्न हे देखील महाराष्ट्रांतील एक राजकारस्थान घडवून आणण्यास कारणीभूत झाले.

दुसऱ्या बाजीरावाने सर्जेरावांचे मन वळवून बायजाबाइंचे लग्न दौलतराव शिंद्याशी लावून दिले. हे लग्न पुणे मुक्कामी इ.स. १७९८ च्या मार्च महिन्यांत मोठया थाटाने झाले. लग्न झाल्यानंतर, बायजाबाई या नेहमी लष्कराबरोबर असे, व लष्कराच्या सर्व राजकारणामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असे.

पुढे दौलतराव १८२७ साली मरण पावले. तेव्हा बायजाबाई यांनी गादीस वारस दत्तक न घेता, सर्व कारभार आपल्या हातांत घेतला. परंतु संस्थानच्या गादीचा धनी करण्याकरिता दत्तक पुत्र घ्यावा अशी सर्व नागरिक जनांची इच्छा होती, व तशी इच्छा ब्रिटिश रेसिडेंट ह्यानेंही व्यक्त केली होती. नागरिकांच्या इच्छेवरून त्यांनी शिंदे घराण्यापैकी पाटलोजी म्हणून जे पुरूष होते, त्याचा पुत्र मुकुटराव हा बारा वर्षांचा असता दत्तक घेतला.

बायजाबाई यांची एकंदर राजकीय कारकीर्द इ.स. १८२७ पासून इ.स.१८३३ पर्यंत सरासरी सहा वर्षेच चालली, परंतु तेवढया अवधीमध्ये त्यांनी मोठया दक्षतेने व शहाणपणाने राज्यकारभार चालविला, पुढे राज्यांत जनकोजी शिंदे व बायजाबाई यांचा बेबनाव होऊन राज्यांत थोडे बंडही झाले.

पुढे जनकोजी शिंदे यांनी १८३३ ते १८४३ असा दहा वर्षे त्यांनी कारभार केला, १८४३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला अन दुर्दैवाने त्यांनाही मुलबाळ नव्हते. त्यामुळे, त्यांची पत्नी ताराबाई शिंदे ह्यांनी हनुमंतराव शिंदे यांचा मुलगा भगीरथराव याला दत्तक घेतले. पुढे हाच जयाजीराव शिंदे या नावाने ओळखला गेला. यानंतर बायजाबाई ग्वाल्हेर मुकामी जयाजीराव शिंदे यांच्याजवळचं राहिल्या.

बायजाबाई या काळातही सक्रीय होत्या, अन त्यांचे भाऊ त्यात त्यांना मदत करत होते. जयाजी शिंदे जेव्हा कारभार पाहू लागले तेव्हा त्यांना मदत करत होते. जयाजी शिंदे जेव्हा कारभार पाहु लागले तेव्हा त्यांना त्यांचे कारभारी असलेले दादा खासगीवाले यांनी बायजाबाईंच्या भावाने जशी अप्रत्यक्ष रित्या सत्ता स्वतःच्या हाती ठेवलेई होती तसेच काम केले. दिनकर राव शिंदे यानीं काही काळ सूत्रे आपल्या हाती घेतली, तेव्हाच्या काळातच १८५७ चे बंड देशात घडले होते.

१८५७ च्या युद्धापूर्वी अनेक गावांमध्ये काही माणसे चपात्या किंवा पोळ्या घेऊन जायची. गावकऱ्यांना एकत्र करून या चपात्या खाण्याची पद्धत होती. हजारो गावांमधून अशा चपात्या युद्धापूर्वी पोहोचवल्या गेल्या. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले, तर सैन्याला रसद पुरवठा कसा करायचा, याची योजना या चपात्यांच्या वाटपातून साकारली गेली.

युद्ध सुरू होण्यापूर्वी सहा महिने अगोदर मथुरेला मोठ्या यज्ञाची घोषणा केली गेली. यज्ञात सहभागी होणाऱ्या ब्राम्हणांना सात लाख रुपये दक्षिणा देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. या यज्ञाच्या निमित्ताने गोपनीय माहितीची देवाण-घेवाण सुकर झाली. अनेक राजांचे राजगुरू संदेश घेऊन सगळीकडे संचार करू लागले. हा यज्ज्ञ ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदे यांनी आयोजित केला होता. १८५७ चे स्वातंत्र्यसमर फसले पण या राणीसाहेबांचा दबदबा चोहीकडे पसरला होता. ता. २७ जून इ.स. १८६३ रोजी, ह्या राजकारस्थानी व शहाण्या स्त्री कैलासवासी झाल्या.

विद्वानांनी यांच्याबद्दल जे धन्योद्गार काढिले आहेत, ते त्यांची खरी योग्यता व्यक्त करतात. तत्कालीन ‘मुंबई गॅझेट’ पत्रांत बायजाबाईसाहेब संबंधाचे जे मृत्युवृत्त आले त्यांत असे म्हटले होते की,

”बेगम सुमरू, नागपुरची राणी, झांशीची राणी, लाहोरची चंदाराणी आणि भोपाळची बेगम या सुप्रसिध्द स्त्रियांमध्ये ही राज स्त्री ही आपल्या परीने प्रख्यात असून, ह्यांनी अनेक वेळा आपल्या देशाच्या शत्रूशी घोडयावर बसून टक्कर दिली होती.”

दुसऱ्या बाजीरावाला जी मुलगी ७२ व्या वर्षी झाली ती म्हणजे ही बयाबाईसाहेब ऊर्फ सरस्वतीबाईसाहेब. १६ जानेवारी १८४७ रोजी त्यांचा जन्म झाला. या नादान पेशव्याच्या मृत्यूबरोबरच पेशवे घराण्याचे औरस पुरुष समाप्त झाले. मागे उरली ही एकमेव निशाणी. दुर्दैवी, हतभागी. बापाच्या मागे ती ६६ वर्षे जिवंत होती. बायजाबाई शिंदे यांनी मोठ्या कौतुकाने या लहान मुलीचे लग्न त्यांच्याच एका सरदारपुत्राबरोबर म्हणजे रावसाहेब आपटे यांच्याबरोबर ठरविले. १८५७ चा सेनानी तिचा दत्तकभाऊ, बाजीरावाचा दत्तकपुत्र नानासाहेबाने ब्रह्मवर्ताच्या आपल्या राजवाड्यात मोठ्या थाटामाटात लावून दिले.

पंढरपूर येथे महाद्वार घाटावर शिंदेसरकारचा मोठा भव्य असा वाडा आहे. या वाड्याच्या आत द्वारकाधिशाचे मंदिर बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेरच्या राणी साहेब यांनी बांधलेले आहे!

(बायजाबाईसाहेब शिंदे यांचे चित्र काही मला मिळाले नाही तेव्हा पोस्ट सोबत राजा रवी वर्मा यांनी काढलेले चित्र जोडले आहे)

संकलन – अभिषेक कुंभार

Leave a Comment