बोधिसत्व वागीश्वरा | आमची ओळख आम्हाला द्या –
भारतीय मूर्ती कलेमध्ये बौद्ध मूर्तिकला हा स्वतंत्र अध्ययनाचा विस्तृत असा विषय आहे. बौद्ध धम्मात हातांची संख्या जास्त असणारी देवता, अनेक मुख असणारी देवता, हातात शस्त्र धारण केलेली देवता असणे हा खूप सखोल विषय असल्याने एका लेखात त्याची मांडणी करणे कठीण आहे. बौद्ध मूर्तीकलेत बोधिसत्वाचे अनेक प्रकार आढळतात. त्यातील बऱ्याचशा बोधिसत्वाच्या मूर्तीही आढळतात. त्यापैकी आजच्या लेखात आपण बोधिसत्व वागीश्वरा यांच्या शिल्पांची माहिती घेणार आहोत. प्रस्तुत शिल्प पश्चिम तिबेट मध्ये असून इ.स. बाराव्या शतकातील आहे.
प्रस्तुत शिल्पातील देवता ही द्विभुज असून सुखासनात कमल पुष्पावर विराजमान आहे. डोक्यावर किरीट मुकुट असून, तो रत्नजडित, कलाकुसरयुक्त आहे. त्याच्या दोन्ही बाजूस मुकुटाचे तुरे बाहेर हवेत तरंगल्याप्रमाणे दाखवलेले आहे. कानाच्या पातीची लांबी जास्त असल्याने कान खांद्यापर्यंत टेकलेले आहेत. त्याच्या मागून आलेली केशरचना दोन्ही खांद्यावर रुळलेली अंकित केलेली आहे. गळ्यात ग्रीवा, केयुर, कटकवलय, कटीसूत्र, गळ्यात यज्ञोपवीत सदृश्य साखळी यासारखे अलंकार शिल्पात अत्यंत उठावदार पणे अंकित केलेले आहेत. उजवा पाय वर उचलून तो काटकोन आकृती उंच केलेला आहे. त्यावर उजवा हात स्थिरावला आहे.
डावा पाय दुमडून समोर केला असून, डावा हात जमिनीवर टेकवला आहे. त्यात पूर्ण विकसित कमलपुष्प धारण केलेले आहे. चेहरा अतिशय प्रसन्न असून डोळे अर्धौंन्मिलीत आहेत. नेसूच्या वस्त्राचा सोगा बरोबर मध्ये सोडला आहे. शिल्पाच्या पाठशिळेवर दोन्ही बाजूस स्तूपांच्या प्रतिकृती आहेत. चेहऱ्यामागे सुंदरशी प्रभावळ आहे. बोधिसत्व वागीश्वर विराजमान असलेल्या कमलपुष्पाच्या खाली दोन्ही बाजूस सिंहाच्या छोट्या प्रतिमा अंकित केलेल्या आहेत. मुकुटाच्या वरच्या बाजूस छत्र आहे. एकंदरीत हे शिल्प सुस्थित असून बघता क्षणी नजरेत भरते. मूर्तीकडे पाहतांना चेहऱ्यावरील स्मित हास्याकडे नजर खिळून राहते हे विशेष होय.
डॉ. धम्मपाल माशाळकर,
मूर्ती अभ्यास, मोडीलिपी व धम्मलिपी तज्ञ ,सोलापूर