महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,686

ब्रह्मा-विष्णू-महेश, गोळप

By Discover Maharashtra Views: 2719 4 Min Read

ब्रह्मा-विष्णू-महेश, गोळप –

रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी पासून दक्षिणेला जेमतेम १५ कि.मी. वर वसलेले छोटेसे गोळप हे गाव. पावस गावाचे जणू जुळे भावंडच. या गोळप गावात आहे निसर्गाच्या कुशीत वसलेले ‘हरिहरेश्वर मंदिर’. मंदिर परिसर फारच देखणा. सर्वबाजूंनी झाडांनी वेढलेले हे ठिकाण. मंदिरापर्यंत जायला एक जांभ्या दगडाची पाखाडी उतरून जावे लागते. पाखाडी उतरतानाच मंदिर परिसर दिसू लागतो. फरसबंदीयुक्त बंदिस्त प्राकार. एका छोट्या दारातून मंदिर प्रांगणात प्रवेश होतो. आत गेल्यावर उजव्या हाताला दिसते एक छोटेसे व्यासपीठ. उत्सवात इथे नाटके सादर केली जातात. लाकडी खांबांचा सभामंडप असलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती आहेत त्या ब्रह्मा विष्णू आणि महेशाच्या. मूर्ती फारच सुबक आणि देखण्या. मंदिरात त्या एकाशेजारी एक मांडून ठेवलेल्या. आपण दर्शन घेताना आपल्या सगळ्यात डाव्या हाताला आहे श्रीविष्णूची मूर्ती, मधोमध आहेत ब्रह्मदेव आणि आपल्या उजव्या हाताला शंकराची मूर्ती. वैशिष्ट्यपूर्ण आणि सालंकृत घडवलेल्या या मूर्ती प्रेक्षणीय आहेत.(ब्रह्मा-विष्णू-महेश, गोळप)

विष्णूची मूर्ती चार हातांची. वरद मुद्रेतील उजव्या खालच्या हातात पद्म, उजव्या वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात चक्र तर डाव्या खालच्या हातात गदा. मूर्तीशास्त्रानुसार अशा मूर्तीला ‘केशव’ विष्णू असे संबोधले जाते. किरीट मुकुट घातलेल्या देवाच्या कानात मकरकुंडले. त्रिवलयांकित गळा आणि गळ्यात एकावली, वैजयंतीमाला, फलकहार, त्यातला कौस्तुभ मणी छातीवर रुळलेला. खांद्यावर वैकक्षक, दंडात केयूर, कटीभागी मेखला. पायात पादांगद. अशा या सर्वांगसुंदर विष्णूमूर्तीच्या पाठीशी आहे प्रभावळ. आणि त्या प्रभावळीत कोरलेले दिसतात विष्णूचे दशावतार. उजव्या पायाशी खाली गरुड, तर दोन बाजूंना चवरी घेतलेले सेवक. सेवकांच्या पाठीशी आहेत हातात कमळ घेतलेल्या भूदेवी आणि श्रीदेवी.

मधली मूर्ती ब्रह्मदेवाची आहे. ब्रह्मदेवाची मंदिरे भारतात तुलनेने खूप कमी आढळतात. गोळप इथली ब्रह्मदेवाची मूर्ती अतिशय सुबक आणि देखणी आहे. चार तोंडे असलेल्या देवाची तीन तोंडे आपल्याला दिसतात, तर चौथे तोंड पाठीमागे कोरलेले आहे. ब्रह्मदेवाला पितामह समजले जाते. त्यामुळे त्यांना दाढी दाखवली जाते. या मूर्तीत ब्रह्मदेवाच्या तीनही तोंडांना दाढी दाखवलेली आहे. देवाचे नेत्र अर्धोन्मिलित आहेत. देवाचा उजवा खालचा हात वरद मुद्रेत असून त्यात अक्षमाला आहे, तर खालच्या डाव्या हातात कमंडलू दिसतो. वरच्या दोन हातात अनुक्रमे स्रुक आणि स्रुवा ही यज्ञासाठी लागणारी उपकरणे दाखवलेली आहेत. पायाशी दोन्ही बाजूंना सेवक दाखवलेले आहेत. ब्रह्मदेवाच्या पाठीमागे असलेल्या प्रभावळीत कुठल्याच मूर्ती नाहीत. मात्र त्याच्या आजूबाजूला दोन्ही खांबांवर साधक, तपस्वी यांच्या मूर्ती दिसतात.

आपल्याकडून बघताना सर्वात उजवीकडची मूर्ती आहे ती शिवाची. जटामुकुटधारी शिवाच्या कानात सर्पकुंडले आहेत. वरच्या उजव्या हातात डमरू तर वरच्या डाव्या हातात त्रिशूल दिसतो. खालच्या उजव्या हातात मातुलुंग हे फळ तर डाव्या हातात कापलेले शीर आहे. शिवाने ब्रह्मदेवाचे पाचवे शीर कापले आणि नंतर ते त्याच्याच हाताला चिकटून राहिले. पुढे १२ वर्षे भ्रमंती केल्यावर वाराणसी क्षेत्री ते गळून पडले अशी एक कथा आहे. त्या कथेनुसार इथे शिवाच्या डाव्या हातात कापलेले शीर दिसते आहे. एकावली, फलकहार, कटीभागी मेखला अशा अलंकारांसोबत दंडात नागबंध व्यवस्थितपणे कोरलेला दिसतो. देवाच्या पायाशी हातात पुष्पहार घेतलेले सेवक तर त्यांच्या मागे चवरीधारी सेवक दिसतात. उजव्या बाजूच्या सेवकाच्या पाठीशी शिवाचे वाहन नंदी कोरलेले आहे.

ब्रह्मा-विष्णू-महेशाच्या या मूर्ती सुबक असून त्या एकाच कलाकाराने कोरलेल्या दिसून येतात. मूर्तींची उभे राहण्याची पद्धत, त्यांच्या अंगावर असलेले अलंकार एकसारखे कोरलेले आहेत. या तीनही देवतांच्या हातातील आयुधे यथायोग्य कोरलेली आहेत. ब्रह्मदेवाची चार तोंडे, त्याला असलेली दाढी अगदी नेमकी दिसून येते. मात्र ब्रह्मदेवाचा मुकुट हा नेहमी शंकरासारखा जटामुकुट दाखवला जातो. मात्र याठिकाणी तो विष्णूसारखा किरीटमुकुट दाखवला आहे. हे या मूर्तीचे एक निराळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. साधारणतः तीन-चारशे वर्षे जुन्या असलेल्या या तीनही मूर्ती वाराणसीवरून आल्या गेल्या आहेत. अत्यंत सुबक, सुघड आणि देखण्या अशा या मूर्ती म्हणजे नुसत्या गोळपचेच नव्हे तर कोकणचे वैभव म्हणायला हवे.

आशुतोष बापट.

Leave a Comment