महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,08,887

राजवाड्यातून निघताना…

Views: 163
2 Min Read

राजवाड्यातून निघताना, गांधार शैली, इ.तिसरे शतक –

सिद्धार्थाच्या जन्मानंतर असित नावाचे मुनी राजवाड्यात आले आणि त्यांनी त्याची जन्मपत्रिका काढली. त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की, हा सर्व विद्यामध्ये पारंगत होऊन मोठा सम्राट होईल तसेच हा मुलगा जगाला अपूर्व धर्मज्ञान देईल. परंतु त्याने कुठलेही दुःख पाहिल्यास तो भौतिक जीवनाकडे पाठ फिरवून निघून जाईल. एकतर अनेक वर्षांनी पुत्ररत्न प्राप्त झालेले असल्यामुळे आणि त्याची खरी आई पण गेली असल्यामुळे त्याला अत्यंत लाडात वाढविण्यात आले. अनेक श्रेष्ठ गुरूंना बोलावून घेऊन त्यांच्याकडून त्याने भाषा, व्याकरण, वेदांगे आणि अन्य विषयांचे ज्ञान घेतले. अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेचा असल्यामुळे सोळाव्या वर्षीच तो विद्या कलांमध्ये पारंगत झाला. इतकेच नाहीतर अश्वारोहण, धनुर्विद्या आणि अन्य युद्ध कलांमध्ये तो निष्णात झाला. सोळाव्या वर्षीच एका धनुर्विद्येच्या स्पर्धेमध्ये त्याने सर्व स्पर्धकांना हरवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. या विजयाबद्दल त्याला कोलिय राजकुमारी यशोधरा ही मिळाली आणि तिच्याशी त्याचा विवाह झाला. विवाहानंतर शुद्धोदनाने त्याला तीन ऋतूंसाठी तीन मोठे प्रचंड राजवाडे बांधून दिले, ज्याच्या सजावटीमध्ये नृत्यांगना, गायक, वादक यांचाही समावेश होता. त्याला सतत सुखच दिसत राहावे याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला.

वयाच्या जवळजवळ २९ व्या वर्षापर्यंत त्याने बाहेरचे जग आणि कुठलेही दुःखच पाहिले नव्हते. त्याच वर्षी त्याला मुलगा झाला, ज्याचे नाव राहुल ठेवले गेले. त्यानंतर बाहेरचे जग बघण्याची त्याला इच्छा झाली. यावेळी त्याचे वडील त्याला थांबवू शकले नाहीत त्यांनी सिद्धार्थाला कोणतेही दुःख दिसू नये याची काळजी घेतली. तरीही वाटेत त्याने एक जर्जर म्हातारा, एक कुष्ठरोगी आणि एक प्रेतयात्रा पाहिली. त्यातूनच त्याला आपलं सुख हे क्षणभंगूर आहे, जन्माला आलेला प्रत्येकजण, आजचा प्रत्येक तरुण उद्या म्हातारा होणार आहे, हे नुसतंच म्हातारपण नाही तर हे शरीर व्याधींनी ग्रस्त होणारे आहे, आणि जन्माला आलेल्या प्रत्येकाला एकदिवस मरण प्राप्त होणार आहे, हे विचार उमगले. मानवी जीवनाचे अंतिम कटूसत्याची जाणीव झालेला सिद्धार्थ अंतर्मुख झाला. जन्माच्यावेळी झालेली भविष्यवाणी खरी ठरण्यावची भीती सर्वांना वाटू लागली.
आषाढ पौर्णिमेच्या रात्री सिद्धार्थाने पलंगावर झोपलेल्या यशोधरा आणि राहुल ला डोळे भरून पाहून घेतलं आणि तो राजवाड्यातून बाहेर जायला निघाला..

महेश तानाजी देसाई

Leave a Comment